उत्तर प्रदेशातील कासगंज येथील सदर कोतवालीच्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला एक तरुण मंगळवारी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. तरुणावर एका मुलीसोबत पळून गेल्याचा आरोप असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले असून तरुणाचे कुटुंबीय मात्र खुनाचा आरोप करत आहेत.
चांद मियाँ असे मृत तरुणाचे नाव असून तो सदर कोतवाली परिसरातील नागला सय्यद अहरोली येथील रहिवासी होता. चांद मियाँचे वडील अल्ताफ यांनी सांगितले की, “मी सोमवारी संध्याकाळी माझ्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अवघ्या २४ तासांनंतर मला माहिती मिळाली की त्याने गळफास लावून घेतला आहे.”
पोलिसांनी सांगितले की, “चौकशीदरम्यान चांद मियाँने शौचालयात जायचे असल्याचे सांगितले. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने पोलीस कर्मचार्यांनी चौकशी केली असता तो शौचालयातील पाईपला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. चांद मियाँने हुड असलेले जॅकेट घातले होते आणि त्याला स्ट्रिंग होते. त्या दोरीने त्याने जमिनीपासून दोन उंच असलेल्या पाईपला गळफास लावून घेतला,” असा दावा पोलिसांनी केला आहे. घटनेनंतर लगेचच एसपी रोहन प्रमोद बोत्रे यांनी निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले असता काही काळ उपचार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे बोत्रे यांनी सांगितले. प्राथमिक तपासात पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.
चांद मियाँने त्याच्या हुडीच्या स्ट्रिंगचा वापर करून स्वतःला फासावर लटकवले होते या पोलिसांच्या सांगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तसेच ज्या पाईपसोबत चांद मियाँने गळफास घेतली ती जमिनीपासून केवळ दोन फूट उंचावर आहे. पोलिसांच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आज तकच्या टीमने पोलिस स्टेशनला भेट दिली. टीमला बाथरुममध्ये फक्त एक पाईप (वॉटर आउटलेट) असल्याचे आढळले. ते जमिनीपासून फक्त दोन फुट उंचावर होते. तिथे दुसरा पाइप किंवा इतर काहीही नव्हतं, ज्याला गळफास घेता येईल. शिवाय पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासासाठी अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, प्रकरण चांगलेच चिघळले असून काँग्रेससह विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर आरोप करत आहेत.