Freedom Fighter YC Revanna delivers a powerful Message to Gen Z: वय वर्षे अवघे १५ असताना शाळेच्या खिडकीतून उडी मारून थेट ‘भारत छोडो’ आंदोलनात उडी घेणारे स्वातंत्र्यसैनिक वाय. सी. रेवण्णा आज ९९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. म्हैसूर परिसरातील हयात असलेल्या मोजक्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक असलेले रेवण्णा आजही त्याच ऊर्जेने आणि निर्धाराने देशातील तरुण पिढीला संदेश देतात. स्वराज्य ही फक्त एक चळवळ होती, रामराज्य मिळेपर्यंत तरुणांनी लढा दिला पाहिजे, असा सल्ला रेवण्णा यांनी दिला आहे.
“सत्ता कोणाचीही असो, जिथे अन्याय दिसेल तिथे तरुणांनी पुढे येऊन लढा दिलाच पाहिजे. देशाच्या कल्याणासाठी आंदोलने आणि संघर्ष कधीही थांबता कामा नयेत”, असेही ते म्हणाले.
लहान वयातच चळवळीचे आकर्षण
१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा काळ आठवताना रेवण्णा सांगतात की, त्याकाळी देवराज अर्स, एस. निजलिंगप्पा आणि ‘लायन्स ऑफ म्हैसूर’ म्हणून ओळखले जाणारे एम. एन. जोईस यांसारख्या नेत्यांनी शाळकरी मुलांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले होते. ब्रिटिश सत्तेला देशातून हुसकावून लावण्यासाठी आणि स्वराज्य मिळवण्यासाठी तरुणांमध्ये त्यांनी मोठा उत्साह संचारला होता.
त्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना ब्रिटिश पोलिसांच्या दडपशाहीचा सामना करावा लागला. अल्पवयीन आंदोलकांना अटक करून म्हैसूरपासून सुमारे ७३ किमी अंतरावर असलेल्या घनदाट आणि हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या ‘काकना कोटे’च्या (सध्याचा नागरहोळे व्याघ्र प्रकल्प) जंगलात अंधाऱ्या रात्री सोडून दिले जायचे. रेवण्णा आणि त्यांच्या मित्रांनाही अशाच प्रकारे जंगलात सोडण्यात आले होते; तिथून वाट काढत घरी परतण्यासाठी त्यांना काही दिवस लागले. मात्र, तरीही त्यांनी माघार न घेता पुन्हा आंदोलनात सहभाग घेतला आणि अखेर तुरुंगवासही भोगला.

गांधीवादी विचारसरणी आणि ‘म्हैसूर चलो’चा लढा
जानेवारी १९३४ मध्ये वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी महात्मा गांधींचे घेतलेले दर्शन आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव रेवण्णा यांच्यावर आयुष्यभर राहिला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी तत्कालीन म्हैसूर संस्थानामध्ये लोकशाही सरकार स्थापनेसाठी संघर्ष सुरूच होता. महाराजा जयचामराजा वडियार यांनी भारतात विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली होती, मात्र जबाबदार लोकशाही सरकार देण्यास टाळाटाळ सुरू होती. याविरोधात के. सी. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ऐतिहासिक ‘म्हैसूर चलो’ सत्याग्रहात रेवण्णा यांनी के. आर. नगर येथून सुमारे एक हजार तरुणांच्या पदयात्रेचे नेतृत्व केले. या आंदोलनादरम्यान त्यांना अटक झाली आणि २४ सप्टेंबर १९४७ रोजी संस्थानात अंतरिम सरकार स्थापन करण्याचे मान्य झाल्यानंतरच त्यांची सुटका झाली.
निवृत्तीनंतरही समाजकार्यात सक्रिय
स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सरकारी शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावली आणि १९८३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. म्हैसूर स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. सेवानिवृत्तीनंतरही ते सातत्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व याविषयी प्रबोधन करत राहिले.
‘स्वराज्य मिळाले, पण रामराज्य अजून बाकी आहे’
सध्या म्हैसूरमधील शारदादेवी नगर येथे शांत जीवन व्यतीत करणाऱ्या रेवण्णा यांनी आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटूनही आपण केवळ ‘स्वराज्य’ मिळवले आहे, ‘रामराज्य’ अजून बाकी आहे. आज देश जात आणि धर्माच्या नावावर विभागला गेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आज दुर्मिळ झाले आहे. या गोष्टी पाहिल्यावर कधीकधी खूप वेदना होतात; मात्र आजची तरुण पिढी ही परिस्थिती नक्की बदलेल, असा विश्वास मला वाटतो”, असे ते म्हणाले.

देशात जिथे जिथे अन्याय, दडपशाही किंवा विषमतेची परिस्थिती निर्माण होईल, तिथे तरुणांनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने आवाज उठवला पाहिजे, असा ठाम विचार त्यांनी मांडला आहे.
