ड्रग्सच्या आहारी गेलेले लोक काहीही करतात, हे अनेक उदाहरणातून दिसून येते. नशेच्या आहारी गेल्यामुळे त्या लोकांना कसलीही शुद्ध राहत नाही. आणि त्यात ही सवय तरुणपणीच लागली तर संपूर्ण आयुष्य एक खेळ बनून जातो. ड्रग्ससारख्या अंमली पदार्थांची किंमत जास्त असल्याने अनेकदा लोक स्वतःच्या घरातील पैसे चोरण्यापासून ते अगदी चोऱ्या, दरोडे घालायलाही मागे पुढे पाहत नाहीत.

अशीच एक घटना दिल्लीत घडली. दिल्लीत नुकतेच पोलिसांनी तीन तरुणांना चोरीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चोर ड्रग्स विकत घेण्यासाठी लोकांच्या चारचाकी गाड्या चोरत असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे, तर चारचाकी वाहनांमध्येही या चोरांची प्रामुख्याने होंडा सिटी या गाडीवर नजर असायची. कारण या गाडीच्या बदल्यात त्यांना अधिक पैसे मिळत होते, असे पोलिसांनी चोरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले.

या चोरांकडून गाड्या विकत घेणाऱ्या माणसालाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तरुणांकडून चार चारचाकी गाड्या, त्यांचे स्पेअर पार्टस, आणि चार दुकाची गाड्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी हरी ओम उर्फ माँटी (२६), लक्ष्य सैनी (१९) आणि अखिल शर्मा (२१) या तिघांना अटक करण्यात आली. तसेच, या गाड्यांचा सौदा करून त्या विकत घेणाऱ्या सनी नावाच्या डिलरलाही अटक करण्यात आली आहे.

दिल्ल्ली शहराबाहेर हे चौघे जण भेटणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. हे चोर गाडीची मागची काच फोडून गाडीत घुसून मास्टर की च्या साहाय्याने गाडी पळवत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.