महाराष्ट्रातल्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण उघडकीस आलं होतं. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला कठोर शिक्षाही केली जाईल. हे प्रकरण आठवण्याचं कारण मथुरा या ठिकाणच्या IIT बाबाला पोलिसांनी अशाच गुन्ह्यात म्हणजेच लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशिक्षित मुलींचा ब्रेनवॉश करुन हा आयआयटी बाबा त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

आयआयटी बाबाबद्दल पोलिसांनी काय सांगितलं?

IIT बाबा अशी ओळख असलेला अभिषेक मिश्रा हा युट्यूबवर प्रवचनं द्यायचा, ऑनलाइन येऊन प्रवचनं द्यायचा आणि मुलींना तसंच महिलांना आकर्षित करायचा. त्यांना भक्त बनवतो, दिक्षा देतो असं सांगायचा. गंधर्व विवाह करुन त्यांचा ब्रेनवॉश करायचा, त्यांच्याशी शरीर संबंध ठेवायचा. त्यानंतर त्यांचे नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायचा. एका पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर आरोपी अभिषेक मिश्रा उर्फ आदिकर्ता नारायण दासला अटक केली.

कशाप्रकारे मुलींना किंवा महिलांना जाळ्यात ओढायचा हा बाबा?

IIT बाबा अभिषेक बाबत पोलिसांनी सांगितलं की आत्तापर्यंत साधारण १२ हून अधिक मुलींशी याने गंधर्व विवाह केला. तिच्या नावासह आपलं नाव जोडलं. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास आणि तिचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. २०१७ ते २०२१ या कालावधीत हा बाबा आयआयटी रुरकी मध्ये होता. मॅकेनिकल इंजिनिअर झाला. त्यानंतर तो अध्यात्माच्या मागे लागला आणि ऑनलाइन प्रवचनांच्या माध्यमातून मुलींना आपल्या जाळ्यात ओढू लागला अशी माहिती पोलिसांनी दिली. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.

ओडिशाचा आहे अभिषेक मिश्रा

स्वताला आदिकर्ता नारायण दास म्हणवून घेणारा अभिषेक मिश्रा हा ओडिशाचा आहे. तो मथुरामध्ये वास्तव्यास होता. ज्या ठिकाणी तो राहात होता त्या आसपासच्या भागात २४ मुलीही वास्तव्य करत होत्या. पण हा अभिषेक काय करतो हे लक्षात आल्यावर या पैकी अनेकींनी त्यांचे अनुभव एकमेकींना सांगितले आणि इथून काढता पाय घेतला. या मुलींचं ब्रेनवॉश करुन त्यांच्याशी तो संपर्कात होता अशी माहिती पोलिसांनी दिली. अभिषेक मिश्राच्या फोनमध्ये काही मुलींचे फोटो, व्हिडीओ सापडले आहेत. छत्तीसगढमध्ये राहणाऱ्या एका मुलीने या बाबा विरोधात तक्रार केली. ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या बाबाला अटक केली.

युट्यूब चॅनल सुरु करत तरूणींना ओढलं जाळ्यात

आदिकर्ता नारायण दासने युट्यूबवर राधा कृपा अमृता नावाने एक चॅनल सुरु केलं होतं. या चॅनलवर तो त्याची प्रवचनं पोस्ट करत असे. हिंदी आणि इंग्रजी भाषांचं त्याला उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे प्रवचनाच्या आडून तो मुलींना टार्गेट करत होता. आदिकर्ता नारायणदासने त्याची LinkedIn प्रोफाईलही तयार केली होती. हा भोंदू बाबा बहुतांशवेळी इंजिनिअरिंग केलेल्या मुलींनाच त्याच्या जाळ्यात ओढत होता अशीही माहिती पोलिसांनी दिली. मथुरा येथील राधाकुंज भागात हा अभिषेक मिश्रा अर्थात आदिकर्ता नारायणदास वास्तव्य करत होता. मी कथावाचक आहे असं तो सांगत होता. व्हिडीओच्या द्वारे तो आधी तरुणींशी संपर्क साधायचा. मग त्यांचा ब्रेनवॉश करायचा. यानंतर या तरूणी त्यांचं घरदार सोडून याच्याकडे यायच्या याला सर्वस्व अर्पण करायच्या. मी तुमच्याशी गंधर्व विवाह करतोय असं तो सांगायचा. त्यांना प्रसाद म्हणून दूध प्यायला द्यायचा त्यात गुंगीचं औषध घातलेलं असायचं. त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करुन तो व्हिडीओ तयार करायचा, नग्नावस्थेत त्यांचे फोटो काढायचा. त्याद्वारे या तरुणींना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

अभिषेक मिश्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मथुरा पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अभिषेक मिश्राच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता कारवाईही केली जाते आहे. मथुरा पोलिसांनी असंही सांगितलं की या बाबाकडे एक मुलगी राहात होती. तिला घ्यायला सहा महिन्यांपूर्वी तिचे आई वडील आले होते. त्यावेळी अभिषेक अर्थात आदिकर्ता नारायण दास आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हंगामा केला होता. पोलिसांनी असं सांगितलं की सुरुवातीला अभिषेक मथुरा या ठिकाणी राहण्यासाठी आला तेव्हा त्याची आईही त्याच्यासह वास्तव्यास होती. पण मुलाचे प्रताप पाहून ती त्याची साथ सोडून निघून गेली. सुरुवातीला भाडे तत्वावरच्या घरात राहणाऱ्या या अभिषेकने नंतर स्वतःचं घरही खरेदी केलं होतं.

अभिषेक मिश्रा पीडितेकडून आणि तिच्या कुटुंबाकडून पैसे उकळत होता-पोलीस

पोलिसांनी असंही सांगितलं की ज्या मुलींचं शोषण हा अभिषेक मिश्रा करायचा त्यांना तो ब्लॅकमेलही करायचा. त्यांच्याकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून पैसेही घेत होता. तसंच राधा नगर भागात ज्या मुली वास्तव्य करतात त्यांना आकृष्ट करायचा प्रयत्न करत होता. १२ हून अधिक मुलींशी त्याने गंधर्व विवाह केला होता. आता पोलीस या बाबाची कसून चौकशी करत आहेत. त्याने नेमकं किती मुलींना भरीस पाडून त्यांना आपलं शिकार बनवलं आहे याचीही माहिती घेतली जाते आहे.