सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून स्वतःच्याच जिवाशी खेळण्याचा एक धक्कादायक प्रकार तामिळनाडूमध्ये समोर आला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरच्या घरी प्रसुतीचा करण्याचा प्रयत्न एका २४ वर्षीय महिलेच्या जिवावर बेतला आहे. तिरुपूर जिल्ह्यातील उथुकुलीजवळील थलावाईपालयम् येथे ही घटना घडली. शशिकला असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेत तिचे नवजात बाळ सुखरूप वाचले आहे.

नेमकं काय घडलं?

शशिकला यांचे हे दुसरी प्रसुती होती. त्यांचे पहिले बाळ सिझेरियन पद्धतीने झाले होते. त्यामुळे दुसऱ्या वेळेस आपली प्रसूती नैसर्गिक नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, अशी शशिकला आणि त्यांच्या पतीची इच्छा होती. यासाठी त्यांनी कोणत्याही डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न घेता, थेट घरच्या घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी यूट्यूबवरील प्रसुतीचे मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली.

२५ जून रोजी शशिकला यांना प्रसूती कळा येऊ लागल्या. त्यानंतर त्यांचे पती आणि सासू यांनी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत, केवळ यूट्यूब व्हिडिओच्या आधारे घरातच प्रसुती करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेदरम्यान बाळाचा जन्म तर झाला, परंतु नैसर्गिकरित्या बाहेर पडणारी ‘वार’ गर्भाशयातून व्यवस्थित वेगळी होऊ शकली नाही. यामुळे शशिकला यांना प्रचंड आणि अनियंत्रित म्हणजेच प्रसूतीनंतरचा अतिरक्तस्त्राव सुरू झाला.

वैद्यकीय निष्काळजीपणा पडला महाग

शशिकला यांची प्रकृती झपाट्याने खालावल्याने त्यांना तातडीने पेरुंदुराई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोइम्बतूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी शशिकला यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बाळाची प्रकृती स्थिर

या संपूर्ण गंभीर परिस्थितीत डॉक्टरांनी तत्परता दाखवत नवजात बाळाला सुरक्षित वाचवले. सध्या या बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी उथुकुली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

इंटरनेट आणि सोशल मीडियावरील माहिती ही केवळ सर्वसाधारण ज्ञानासाठी असते, ती वैद्यकीय उपचारांचा पर्याय असू शकत नाही. विशेषतः प्रसुतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत किरकोळ चूकही जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या घरगुती प्रयोगांपासून दूर राहावे आणि केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच रुग्णालयात प्रसूती करावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.