YouTuber Dhruv Rathee detained: यूट्यूबर ध्रुव राठी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जर्मनीहून भारतात आला होता. आज दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचे त्याने जाहीर केले होते. मात्र आज सकाळी त्याला गुरुग्राममधील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या एक्स हँडलवरून याची माहिती दिली आहे.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुग्राममधील सेक्टर ५६ मधील ध्रुव राठीच्या निवासस्थानातून त्याला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी रात्रीच दिल्ली पोलिसांचे पथक गुरुग्राममध्ये पोहोचले होते. आज सकाळी पोलिसांनी दार ठोठावले असता ध्रुव राठीच्या आईने दार उघडले. त्यानंतर पोलिसांनी घरात शिरून ध्रुव राठीला ताब्यात घेतले.
ध्रुव राठीने शुक्रवारी रात्री इंडिया गेटच्या बाहेर एक व्हिडीओ चित्रीत केला होता. मी उद्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले होते. “आमच्या पंतप्रधानांनी जय्यत तयारी केली आहे. ५० हून अधिक मेट्रो स्टेशन्स बंद केले आहेत. ट्रेन, बस बंद आहेत. आमच्या आंदोलनामुळे दिल्लीत जवळपास लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. एका बाजूला भाजपाचा आयटी सेल सांगतो की, आमच्या आंदोलनात कुणीही येणार नाही, गर्दी होणार नाही. मग दिल्लीत एवढा बंदोबस्त कशासाठी केला आहे?”, असा सवाल ध्रुव राठीने उपस्थित केला होता.
ध्रुव राठीने पुढे म्हटले, “मला तर वाटते पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. देशातील जनता आता जागृत झाली आहे. मित्रांनो मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा. जय हिंद”
जर्मन नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह
भाजपा नेता आणि निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून यूट्यूबर ध्रुव राठीचे नागरिकत्व आणि व्हिसा स्टेटसची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भास्कर राव यांनी पत्रात मागणी केली की, यूट्यूबर ध्रुव राठीने यापूर्वी कधी भारतातील आंदोलनात सहभाग घेतला होता का? तसेच त्याच्या कृतीमुळे परदेशी नागरिक कायदा, १९४६ चे उल्लंघन होत आहे का? याचा तपास केला जावा. तसेच गरज भासल्यास योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी सुचवले आहे.
भास्कर राव यांचे आरोप काय?
राव यांनी पत्रात केलेल्या दाव्यानुसार, बंगळुरूमधील आंदोलनात ध्रुव राठीने निवडणूक आयोगावर जाहीर टीका केली. एसआयआर प्रक्रियेत पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचा अभाव असल्याचे ते म्हणाले. एखाद्या विदेशी नागरिकाला भारतात येऊन राजकीय आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न भास्कर राव यांनी उपस्थित केला.

‘संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदींचा त्रास’
दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनात ध्रुव राठीने हजेरी लावली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या ध्रुव राठी यांनी यावेळी म्हटले, “मी पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी झालो आहे. मी काल बंगळुरूत आलो, तेव्हा सोशल मीडियावर ध्रुव राठी सरकार उलथवून लावायला येत आहे, अशा पोस्ट व्हायरल झाल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल की, माझा त्यांच्याशी काही वैयक्तिक वाद आहे; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, संपूर्ण देशालाच आता त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.”
