Dhruv Rathee Bengaluru Protest latest updates on CJP rally: निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकला जात आहे. काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधक गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक झाले असतानाच कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आज बंगळुरू येथे मोठा मोर्चा काढला जाणार आहे. आजच्या बंगळुरूतील मोर्चामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी सहभागी होणार आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि ध्रुव राठी यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे याची माहिती दिली आहे.
आजच्या बंगळुरूमधील मोर्चाद्वारे कॉक्रोच जनता पार्टी दोन दिवसांनी म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या भव्य मोर्चाची रंगीत तालीम करत असल्याचे सांगितले जात आहे. आजच्या मोर्चात यूट्यूबर ध्रुव राठी आणि अभिनेते प्रकाश राज हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. प्रकाश राज हे मुळचे कर्नाटकमधील असल्यामुळे त्यांच्या राज्यात होणाऱ्या मोर्चाला कशाप्रकारे पाठिंबा मिळतो, यावरदेखील नजर असेल.
ध्रुव राठी आणि कॉक्रोच जनता पार्टीने एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे म्हणतात की, मी बंगळुरूतील मोर्चासाठी आलो आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी सरप्राइज आहे. यानंतर अभिजीत दिपके बाजूला वळतात आणि पाठमोरा बसलेला ध्रुव राठी कॅमेऱ्याच्या समोर वळतो.
आली रे आली…
कॅमेऱ्याकडे वळल्यानंतर ध्रुव राठी म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, ही लोकशाही वाचविण्याची लढाई आहे. ८ ऑक्टोबरला आपण बंगळुरूच्या फ्रिडम पार्कमध्ये भेटुया. जे दिल्लीत राहतात त्यांनी १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर यायला विसरू नका.” यानंतर अभिनेते प्रकाश राज पुढे येतात आणि सिंघममधील शैलीत म्हणतात, “आली रे आली, ज्ञानू (ज्ञानेश कुमार) आता तुझी वेळ आली”
ध्रुव राठी, प्रकाश राज आणि कॉक्रोच जनता पार्टीने तयार केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या माध्यमातून दिल्लीतील मोर्चासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे.
व्यापक आंदोलनाचा ‘सीजेपी’चा निर्धार
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक व्यापक करण्याचा निर्धार कॉक्रोच जनता पार्टीने व्यक्त केला आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तरी आंदोलन थांबणार नसून, निवडणूक व्यवस्थेत व्यापक सुधारणा होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ‘सीजेपी’चे सह-संयोजक सौरव दास यांनी दिला. दिल्लीतील मोर्चाआधी ७ तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनामध्ये देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही विद्यार्थी नेते आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषदेत केले.
