Youtuber House Burglary Gold Theft Case: सोशल मीडियावर सोन्याचे दागिने आणि नोटांची बंडले दाखवून प्रसिद्धी मिळवणे तमिळनाडूतील एका युट्यूबर दांपत्याला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी कन्याकुमारीजवळील नागरकोईल परिसरातील घरात घुसून तब्बल ११८ तोळे (सुमारे ९४४ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिखाऊपणा करण्याचाही भुर्दंड पडू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण प्रस्थापित झाले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार माहितीनुसार, थम्माथूकोनम येथील व्हीआयपी गार्डन परिसरात युट्यूबर विनोद कुमार पत्नी मधुमिता यांच्यासह वास्तव्यास आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोकड घेऊन चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच राजाक्कंमंगलम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस परिसरातील आणि घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासत आहेत. चोरीपूर्वी आणि चोरीनंतर संशयितांच्या हालचाली कशा होत्या, तसेच ते परिसरात कसे दाखल झाले? याचा शोध तांत्रिक तपासाच्या आधारे घेतला जात आहे.
? Kanyakumari influencer Madhumitha often flaunted her gold jewellery and cash in reels, even talking about how much gold she bought every month.
— Megh Updates ?™ (@MeghUpdates) September 25, 2026
Now, thieves have reportedly broken into her house and fled with 118 sovereigns of gold worth nearly ₹1 crore, along with cash.…
दरम्यान पोलीस तपासात या दांपत्याच्या सोशल मीडिया खात्यांचीही बारकाईने तपासणी केली जात आहे. हे दाम्पत्य आपल्या व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आणि नोटांचे प्रदर्शन करत असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओंमुळेच घरात मौल्यवान ऐवज असल्याची माहिती चोरट्यांना मिळाली असावी आणि त्यानंतर त्यांनी हा डल्ला मारला का, या दिशेनेही पोलीस अधिक तपास करत आहेत.
मधुमिता कोण आहे?
मधुमिता ही कोईबंतूरमधील यूट्यूबर आहे. लाइफस्टाइल आणि फॅशनशी निगडित व्हिडीओ ती पोस्ट करत असते. तिच्या व्हिडीओत अनेकदा कौटुंबिक क्षण, सोन्याची खरेदी, दागिने आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडित गोष्टी दाखवल्या जातात.
मधुमिताचा पती व्यावसायिक विनोद कुमार याने १० महिन्यांपूर्वीच नागरकोविळजवळील थम्माथूकोनम येथे एक घर विकत घेतले होते. मधुमिता आपल्या रिल्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दाखवितानाचे व्हिडीओ पोस्ट करत असे. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत तिच्या एका खोलीत ती सोने ठेवताना दिसत आहे.
