वृंदावनच्या पवित्र आणि प्राचीन निधिवनराजमध्ये मध्यरात्री व्हिडिओ शूट करणाऱ्या यूट्यूबर गौरव शर्माला पोलिसांनी दिल्लीतून अटक करून तुरुंगात पाठवले आहे. १० नोव्हेंबर रोजी गौरव शर्माने ठाकूर बांके बिहारींच्या पवित्र स्थळी श्रीनिधिवनराजमध्ये भिंतीवर चढून व्हिडिओ शूट केला होता. आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला होता. यामुळे कित्येक भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यानंतर मंदिराचे सेवक रोहित कृष्णाचा मुलगा भिक चंद्र गोस्वामी याने १३ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी कारवाई करत गौरव शर्माला दिल्लीतील पंचशील पार्कमधून अटक केली आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आणि त्याची रवानगी तुरुंगात केली.

गौरव शर्मा हा गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीमध्ये राहतो. गौरव झोन नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तो बऱ्यापैकी कमाई करतो. सहा नोव्हेंबरला तो मथुरामध्ये आपल्या काकाकडे आला होता. त्याच्या चुलत भावाने त्याला सांगितले, की वृन्दावनमध्ये एक अशी जागा आहे, जिथे रात्री देव स्वतः येऊन लीला करतात. त्यामुळे कोणतीही व्यक्ती रात्रीच्या वेळी तिथे थांबू शकत नाही. मंदिर प्रशासनाने याबाबत कडक सूचना दिल्या आहेत. तरीही कोणी व्यक्ती तिथे रात्री थांबल्यास तिचा मृत्यू होतो, किंवा ती व्यक्ती दिव्यांग होते. हे ऐकून गौरवने याठिकाणी जाऊन व्हिडिओ काढण्याचा निर्णय घेतला.

गौरव, त्याचा भाऊ प्रशांत आणि त्याचे मित्र मंदिराच्या भितींवरून उडी मारून आत गेले. गौरवने आपल्या मोबाईलने १५-२० मिनिटे व्हिडीओ रेकॉर्ड केला. यानंतर गौरवने आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर वृन्दावनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल झाल्याचे समजल्यानंतर त्याने आपल्या चॅनलवरून हा व्हिडिओ हटवला होता, तसेच मोबाईल मधूनही डिलीट केल्याचे त्याने सांगितले.