Andhra Pradesh Violence News: आंध्र प्रदेश राज्यात वायएसआर काँग्रेसच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा हिंसाचार उसळला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मंत्री एन. लोकेश नायडू यांच्याविरोधात केलेल्या विधानांमुळे राज्यात मोठा गोंधळ उडाला आहे. कृष्णा जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. जोगी रमेश यांच्या वक्तव्यानंतर इब्राहिमपट्टणममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वादाचे कारण काय?

रविवारी (दि. १ फेब्रुवारी) रोजी इब्राहिमपट्टणम अंजनेय स्वामी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जोगी रमेश यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. या वक्तव्यादरम्यान त्यांनी तिरुपती लाडू वाद आणि एसआयटी चौकशीबाबत मंत्री लोकेश आणि सरकारवर टीका केली. त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोगी रमेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाविरुद्ध वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यामुळे हिंसाचार झाला.

तिरुपती लाडू वाद हा बऱ्याच काळापासून सरकारवर आरोपांचा विषय आहे. तिरुपती लाडू वादावर केलेल्या कथित टिप्पणीसाठी अंबाती रामबाबूंवर यापूर्वी हल्ला करण्यात आला होता. या वक्तव्यांना मुख्यमंत्र्यांचा अपमान मानण्यात आले होते. यासाठी रामबाबूंना अटक करण्यात आली होती.

‘वायएसआरसीपी’कडून हल्ल्याचा निषेध

‘वायएसआरसीपी’ (YSRCP) पक्षाने जोगी रमेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि तो हल्ला घृणास्पद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. एका निवेदनात, वायएसआरसीपी नेते भूमना करुणाकर रेड्डी म्हणाले की, जमावाने रमेश यांच्या घरावर उधळलेल्या बैलांसारखा हल्ला केला आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, जरी त्यांनी यापूर्वी त्यांच्या टिप्पण्या स्पष्ट केल्या होत्या.

सर्वांना गप्प करण्याचे प्रयत्न केले जात आहेत – जगन मोहन रेड्डी

‘वायएसआरसीपी’चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी म्हणाले की त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे गेलेल्या पक्षाच्या दोन नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी आरोप केला की ही परिस्थिती राज्यातील ‘जंगल राज’ दर्शवते. त्यांनी आरोप केला की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे आणि सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कोणालाही गप्प करण्यासाठी हल्ले केले जात आहेत.