Zakir Naik Taliban girls education remarks face heavy backlash : भारताने फरार घोषित केलेल्या इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याने अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणावरील तालिबानच्या निर्बंधांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जाव लागलं आहे. यासंदर्भाथील झाकीर नाईकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वातावरण सुरक्षित नाही
झाकीर नाईक म्हणाला, “प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. प्राथमिक शिक्षण सर्व महिलांसाठी उपलब्ध आहे. फक्त उच्च शिक्षण थांबवलं आहे. कारण तिथले वातावरण सुरक्षित नाही. सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत त्यांनी हे थांबवून ठेवलं आहे.” तालिबानच्या राजदूतांशी बोलणं झाल्याचा दावा करत तो म्हणाला, “त्यामुळे योग्य शिक्षिका मिळेपर्यंत जर कोणी शिक्षण पुढे ढकलत असेल, तर त्यात काहीच अडचण नाही.”
नाईकच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया
शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्या मलाला युसूफझाई हिचे वडील आणि ब्रिटनमध्ये राहणारे पाकिस्तानी कार्यकर्ते झियाउद्दीन युसूफझाई यांनी नाईकने तालिबानच्या निर्बंधांचं समर्थन करणं अत्यंत चिंताजनक आणि निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिलं, “डॉ. झाकीर नाईक यांच्यासारख्या जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या इस्लामिक विद्वानाने तालिबानने मुलींना शिक्षणातून पद्धतशीरपणे बाहेर काढण्याच्या निर्णयाचं समर्थन करणं अत्यंत चिंताजनक आणि निराशाजनक आहे.”
युसूफझाई पुढे म्हणाले की, या निर्बंधांना शिक्षणाचं केवळ पुढील ढकलणे असं स्वरूप देणे हा विश्वासार्ह बचाव नाही. “एका अनिश्चित काळासाठी घातलेल्या बंदीला केवळ शिक्षण पुढे ढकलणे असं सांगणं आणि महिला शिक्षिकांची टंचाई कशी दूर केली जाईल हे न सांगता केवळ त्याचं कारण देणं योग्य नाही. अशा युक्तिवादांमुळे तालिबानच्या लैंगिक भेदभावाला मान्यता मिळण्याचा आणि एका मोठ्या अन्यायाला धार्मिक वैधता मिळण्याचा धोका निर्माण होतो”, असं ते म्हणाले.
भारतीय इस्लामिक विचारवंत ए. फैजूर रहमान यांनी युसूफझाई यांच्या या टिप्पणीला रीपोस्ट करत, झाकीर नाईकला आपल्या देशात राहू दिल्याबद्दल मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
