पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींच्या हिंदू अल्पसंख्यांकांबाबतच्या वक्तव्यानंतर जावेद अख्तर यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला पार पडला. त्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे काही व्हिडीओ समोर आले. या व्हिडीओ दरम्यान आसिफ अली झरदारी असं म्हणाले की पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश आहे. या देशात ३ ते ४ टक्के हिंदू आहेत ज्यांना आम्ही सहन करतो आहोत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी आसिफ अली झरदारींना खडे बोल सुनावत पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. तुम्ही कायमच असंवेदनशील असता कारण तुम्हाला तुमच्या १० टक्क्यांशी घेणंदेणं असतं असंही अख्तर यांनी म्हटलंय.

आसिफ अली झरदारी काय म्हणाले होते?

आसिफ अली झरदारी हे व्हिडीओत असं म्हणाले होते की आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही अशा विचारांचे मुस्लिम आहोत जे आमच्या मुस्लिम बहुल पाकिस्तानात ३ ते ४ टक्के हिंदू लोकांना सहन करत आहात. आमच्या देशात हे हिंदू लोक तेवढेच स्वतंत्र आहेत जेवढे कुठल्या इतर ठिकाणी असू शकले असते. मात्र ते तिथे राहण्यापेक्षा आमच्या देशात राहणं पसंत करतात. असं विधान झरदारी यांनी केलं होतं. त्यावर जावेद अख्तर यांनी झरदारी यांना आरसा दाखवला आहे. आसिफ अली झरदारी यांना जावेद अख्तर यांनी मिस्टर १० पर्सेंट असंही म्हटलं आहे. झरदारी असंही म्हणाले होते की भारताचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांचा आपला एक अजेंडा आहे आणि ते अखंड भारतावर विश्वास ठेवतात. मात्र या दरम्यान अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा त्यांना विसर पडलाय. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

जावेद अख्तर यांनी काय म्हटलं आहे?

जावेद अख्तर म्हणाले मिस्टर १० पर्सेंट झरदारी तुम्ही बेनझीर भुत्तोंशी लग्नानंतर चर्चेत आला होतात. ते म्हणत आहेत की आमच्या देशात ३ ते ४ टक्के हिंदू आहेत आणि आम्ही त्यांना सहन करतो. मिस्टर झरदारी तुम्ही कायमच अशा लोकांबाबत असंवेदनशील आहात, ज्यांची लोकसंख्या १० टक्क्यांहून कमी आहे.

पाकिस्तान कुरापती काढणं सोडत नाही-जावेद अख्तर

मागच्या वर्षी एका कार्यक्रमातही जावेद अख्तर यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पाकिस्तानने सीमेवरचा वाढता दहशतवाद वाढवला असं विधान केलं होतं.भारताने कायमच पाकिस्तानशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने कायमच कुरापती काढल्या. आम्हीही पाकिस्तानातील कलाकारांशी सांस्कृतिक संबंध ठेवले होते. पण टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या परिस्थितीत काही बदल होईल असं वाटत नाही असंही जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी आसिफ अली झरदारींना खडे बोल सुनावले आहेत.