Zelenskyy agrees to Orthodox Easter ceasefire: ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली. युक्रेनने देखील या युद्धविरामाचे पालन करावे अशी अपेक्षा रशियाकडून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, आता युक्रेनकडून देखील युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. शनिवारी दुपारपासून सुरु होणारा युद्धविराम रविवारी सायंकाळपर्यंत लागू राहणार आहे.

दोन दिवसांचा युद्धविराम

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त शुक्रवारी पहाटे दोन दिवसांच्या कालावधीसाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे. “ऑर्थोडॉक्स इस्टरच्या येऊ घातलेल्या सणाच्या निमित्ताने, ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते १२ एप्रिल रोजी दिवसअखेरपर्यंत युद्धविराम जाहीर करण्यात येत आहे,” असे क्रेमलिनच्या घोषणेत म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रायलायने याबाबातची माहिती प्रसिद्ध केली आहे.

३२ तास हल्ले न करण्यास सहमती

गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या माध्यमातून वाटाघाटी सुरु आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून यासाठी वाटाघाटी सुरु होत्या. पण, अमेरिका इराणबरोबर युद्धात अडकल्याने या चर्चांना लगाम लागला. मध्यपूर्वेतील संघर्ष शस्त्रसंधीमुळे थंडावला असताना रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामाला देखील महत्व प्राप्त झाले आहे. पुतिन यांनी ३२ तासांसाठी जाहीर केलेल्या युद्धविरामाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

ऑर्थोडॉक्स इस्टरचे महत्व

व्लादिमीर पुतिन यांनी गेल्यावर्षी देखील ३० तासांसाठी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्याचधर्तीवर यावर्षी देखील ऑर्थोडॉक्स इस्टरच्या निमित्ताने हा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांमध्ये ऑर्थोडॉक्स इस्टरचे मोठे महत्व आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आठवड्याभरापासून इस्टरच्या दिवशी युद्धविराम करण्याची मागणी केली होती. तसा प्रस्ताव त्यांच्याकडून मांडण्यात आला होता, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.