Zelenskyy Ukraine Drone Help update : युक्रेन आणि रशिया युद्धाला चार वर्षे पूर्ण होत असताना आता युक्रेनने आपल्या ड्रोन कौशल्याचा वापर जागतिक राजकारणात प्रभावीपणे करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, मध्यपूर्वेतील देशांना इराणच्या घातक ‘शाहेद’ ड्रोनपासून वाचवण्यासाठी युक्रेन मदत करेल, पण त्या बदल्यात युक्रेनला निधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. राऊटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
झेलेन्स्की यांनी पत्रकारांना सांगितले की, ड्रोन संरक्षण प्रणाली कशी कार्य करते याचे मूल्यांकन आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी युक्रेनने तीन पथके मध्यपूर्वेत पाठवली आहेत. कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर ही पथके पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हे कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी होण्याबद्दल नाही. आमचे इराणशी युद्ध सुरू नाही”, असंही त्यांनी नमुद केले.
अनेक देशांनी युक्रेनकडे मदत मागितली
या मदतीच्या बदल्यात युक्रेनला नेमके काय मिळेल यावर चर्चा होणे अद्याप बाकी आहे, परंतु तंत्रज्ञान आणि निधी या दोन्ही गोष्टी युक्रेनसाठी महत्त्वाच्या असल्याचे झेलेन्स्की म्हणाले. मध्यपूर्वेतील देशांनी इराणी ‘शाहेद’ ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे, तर युक्रेन दररोज रात्री स्वस्त ड्रोन किंवा जॅमिंग उपकरणांच्या मदतीने रशियन ड्रोन पाडत आहे. तर, झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसह युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील देशांनी या ड्रोन हल्ल्यांचा प्रतिकार कसा करायचा, याबाबत युक्रेनकडे मदत मागितली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या या मदतीची गरज नसल्याचे म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी ३५ ते ५० अब्ज डॉलरच्या एका मोठ्या कराराचा प्रस्ताव दिला होता, ज्यावर वॉशिंग्टनने अद्याप स्वाक्षरी केलेली नाही.
शांतता चर्चेवर परिणाम
संरक्षण क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील नियोजित शांतता चर्चा, जी युएईमध्ये होणार होती, ती इराणवरील हवाई हल्ल्यांमुळे उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे लांबणीवर पडली आहे.
