Donald Trump On Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील संघर्षाला तब्बल दोन वर्षांपासून अधिक काळ झाला आहे. अद्यापही हा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे लाखो युक्रेनियन विस्थापित झाले आहेत. एवढंच नाही तर दोन्ही देशातील संघर्षाचा जगभरातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्न करत आहेत. पण अद्याप त्यांच्या प्रयत्नला यश आलेलं नाही.

डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता होती. मात्र, त्या बैठकीत देखील ठोस निर्णय झाला नव्हता. त्यानंतर आता रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने एक शांतता प्रस्ताव दिला आहे. हा शांतता प्रस्ताव एका आठवड्याच्या आत स्वीकारावा, असं आवाहन ट्रम्प यांनी युक्रेनला केलं आहे.

या सर्व घडामोडींबाबत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. तसेच रशिया-युक्रेन संघर्षात अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दिला. मात्र, अमेरिकेच्या पाठिंब्याबद्दल युक्रेनला शून्य कृतज्ञता आहे, साधं धन्यवाद म्हणत आभारही मानले नाहीत, असा संताप डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्यांनी रशिया-युक्रेन युद्धासाठी थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरलं आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, “मजबूत आणि निष्पक्ष अमेरिकन आणि युक्रेनियन नेतृत्व असतं तर हे युद्ध कधीच सुरू झालं नसतं. हा संघर्ष माझ्या दुसऱ्या कार्यकाळाच्या खूप आधी, बायडेन प्रशासनाच्या काळात सुरू झाला होता आणि तेव्हापासून तो सतत वाढत गेला.”

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पुन्हा एकदा युक्रेनवर रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त न केल्याचा आरोप केला. तसेच सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी या युद्धामुळे झालेल्या मानवी विध्वंसाबद्दल निराशा व्यक्त केली. तसेच रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबाबत युरोपवरही टीका केली.

अमेरिकेचा शांतता प्रस्ताव युक्रेन स्वीकारणार का?

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेला शांतता प्रस्ताव एका आठवड्याच्या आत स्वीकारावा, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना बजावलं आहे. अमेरिकेच्या या आग्रहामुळे आपली कोंडी झाल्याचं झेलेन्स्की यांनी सूचित केलं आहे. दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी अजूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गेई रायबकोव्ह यांनी दिलेली आहे.