पीटीआय, क्वालालंपूर
‘दहशतवादाबाबत आमची भूमिका स्पष्ट असून, कुठलाही दुटप्पीपणा आणि कुठलीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियामध्ये केले. ते दोन दिवसांच्या मलेशियाच्या दौऱ्यावर होते. दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचे आवाहन पंतप्रधान मोदींसह मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहीम यांनी केले. दोन्ही देशांत या वेळी सेमीकंडक्टर क्षेत्रासह इतर क्षेत्रांत महत्त्वाचे ११ करार झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहीम यांच्यात रविवारी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा आणि सीमापार दहशतवादासह दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा एकसुरात आणि तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता ठेवण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. तसेच, दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. मूलतत्त्ववादाचा आणि हिंसक अतिरेकीवादाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली.
दहशतवादाला निधी पुरवणे आणि नवतंत्रज्ञानाचा दहशतवादासाठी वापर रोखण्यावरही काम करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रे आणि ‘फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’मध्ये (एफएटीएफ) सहकार्य करण्याची हमी उभय देशांनी दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जागतिक अस्थिरतेच्या आजच्या काळात भारत आणि मलेशियामधील वाढती मैत्री दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे. आजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, यावर आम्हा दोघांत चर्चा झाली. दहशतवादाबाबत कुठलाही दुटप्पीपणा अथवा तडजोड न करण्याचा आमचा संदेश स्पष्ट आहे.’
विविध क्षेत्रांमध्ये करार
भारत आणि मलेशियाने रविवारी व्यापार, संरक्षण, ऊर्जा, सेमीकंडक्टर क्षेत्रासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संबंध दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. दोन्ही देशांत ११ करार या वेळी झाले. मलेशियामध्ये भारताचा महावाणिज्य दूतावास सुरू करण्याची मोदींनी या वेळी घोषणा केली. संयुक्त राष्ट्रसंघात सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला मलेशियाने या वेळी पाठिंबा दिला. व्यापारामध्ये भारताचा रुपया आणि मलेशियाचे रिंगिट चलन वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांना इब्राहीम यांनी दाद दिली.
दहशतवादविरोधी, गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, सागरी सुरक्षेमध्ये सहकार्य दृढ केले जाईल. संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही वाढविले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाबरोबरच सेमीकंडक्टर, आरोग्य, अन्नसुरक्षा क्षेत्रामध्येही भागीदारी मजबूत केली जाईल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक आणि व्यापारामध्ये भारताची वेगाने प्रगती होत आहे. द्विपक्षीय स्तरावर स्थानिक चलन वापरण्याचा निर्णय मोठा टप्पा आहे.- अन्वर इब्राहीम, पंतप्रधान, मलेशिया
मलेशिया भेटीत कुणाच्या भेटी?
– आझाद हिंद फौजेचे जेयराज राजा राव यांची पंतप्रधानांकडून भेट
– मलेशियामधील भारतीय वंशाच्या मंत्र्यांची भेट आणि त्यांच्या कार्याचे कौतुक. यामध्ये डिजिटल मंत्री तुआन गोबिंद सिंग देव, मानव संसाधन मंत्री रमणन रामकृष्णन, पंतप्रधान कार्यालयातील उपमंत्री एम. कुलसेगरन आणि राष्ट्रीय एकात्मता उपमंत्री आर. युनेस्वरन यांचा समावेश.
– मलेशियातील आघाडीच्या उद्योजकांशी भेट. भारतामध्ये गुंतवणुकीला दिलेल्या प्राधान्यामुळे त्यांचे कौतुक. या उद्योजकांमध्ये ‘पेट्रोनास’चे अध्यक्ष तेंगकू मुहम्मद तौफिक, बर्जया कॉर्पोरेशन बर्हाडचे संस्थापक विन्सेंट टॅन ची यिऊन. खझाना नॅशनल बर्हाडचे व्यवस्थापकीय संचालक अमीरुल फैसल वान झाहिर आणि ‘फायसन इलेक्ट्रॉनिक्स’चे संस्थापक पुआ खिन सेंग यांचा समावेश.
