नवी दिल्ली : कानपूरमध्ये ५७ वर्षीय व्यक्तीला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे २२ ऑक्टोबर रोजी आढळून आल्यानंतर केंद्राचे बहुवैद्यशाखीय आरोग्य पथक येथे पाठवण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, या पथकात आरोग्य तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे व सेंटर  फॉर डिसीज कंट्रोलचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे. केंद्र सरकार राज्याला या प्रकरणात मदत करीत असून झिका विषाणूच्या नियंत्रणासाठीची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबर आम्ही समन्वयाने काम करू असे केंद्राच्या पथकाने म्हटले आहे. दरम्यान हे पथक प्रत्यक्ष झिका विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा संसर्ग कसा झाला असावा याबाबत अभ्यास करणार आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची कृती योजना तयार केली असून सार्वजनिक आरोग्याच्या पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात येत आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण संस्थेचे सदस्यही केंद्राच्या आरोग्य पथकात समाविष्ट आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर झिका संसर्ग नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत.