मेंदूरोगाच्या संशयास पुष्टी, लॅटिन अमेरिकेत अनेक नवजात बालकांच्या मेंदूतील पेशींमध्ये दोष
झिका विषाणूमुळे मेंदूचे रोग होतात, असे आता संशोधनातून निष्पन्न झाले आहे. लॅटिन अमेरिकेत या विषाणूमुळे अनेक नवजात बालकांच्या मेंदूतील पेशींमध्ये दोष निर्माण झाले आहेत. त्यात चेतापेशींवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या नियतकालिकात स्लोव्हेनियाच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, झिका विषाणूचा अंश मृतावस्थेतील गर्भातही आढळून आला आहे, त्यामुळे मायक्रोसेफली हा मेंदूचा रोग झिकामुळे होतो असे जवळपास स्पष्ट झाले आहे. या रोगामुळे मेंदू व कवटी कमी विकसित होतात व प्रसंगी मृत्यू,अपंगत्व येऊ शकते.
ब्राझीलमध्ये अनेक मातांना झिकाचा संसर्ग झाल्यामुळे गर्भपात केला असता गर्भातही विषाणूचे अंश दिसून आले, असे सांगण्यात आले. आता हा रोग लॅटिन अमेरिका व कॅरिबियातही पसरला आहे. झिका विषाणूचे घातक परिणाम आता जास्त स्पष्टपणे सामोरे येत असून जुबालिजाना रूग्णालयात याबाबत केलेल्या संशोधनात मेंदूवरील घातक परिणामांचा उलगडा होत आहे. मेंदूच्या उतींमध्ये हा विषाणू आढळला असून त्यामुळे मेंदूत विकृती निर्माण होते, असे या संशोधनात दिसून आले. झिका व मायक्रोसेफलीमध्ये यांच्यातील संबंधाचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अद्याप सापडला नसला तरी संशोधन त्याच दिशेने निर्देश करीत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मायक्रोसेफली हा रोग झिका विषाणूने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगावर अजून कुठलीही लस उपलब्ध नाही व त्यामुळे फार सौम्य लक्षणे दिसतात. परिणामी उपचार करेपर्यंत गर्भाची बरीच वाढ झालेली असते. परिणामी गर्भपात करणेही महिलांच्या जिवावर बेतते. मृत गर्भामध्ये झिका विषाणू आढळला असला तरी त्यामुळे मायक्रोसेफली रोग होतो असा अंतिम निष्कर्ष अजून काढण्यात आलेला नाही. निर्णायक पुरावा देण्यात अजून वेळ लागणार आहे. अमेरिकी रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या वैज्ञानिकांनी मायक्रोसेफली झालेल्या मातांनी जन्म दिलेल्या दोन बालकांचा वीस तासात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मेंदूची तपासणी केली व इतर दोन गर्भाची तपासणी केली. यातील चारही मातांना झिका रोग झालेला होता, त्यांच्या नवजात अर्भकांच्या मेंदूतही झिका विषाणू आढळून आला,
त्यामुळे झिका व मायक्रोसेफली यांचा संबंध आहे असा वैज्ञानिकांचा दावा आहे. झिका विषाणूमुळे मेंदूत जन्मदोष येतात व गर्भपातही होऊ शकतो, त्यामुळे नाळेच्या उतींचे नमुने घेऊन आणखी तपासणी करण्याची गरज आहे.