Ayatollah Khamenei Death Iran Israel Conflict: अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. ८६ वर्षीय खामेनी यांनी आपल्या हयातीत अमेरिका आणि इस्रायलचा कडवा विरोध केला होता. आता त्यांच्या मृत्यूपश्चातही इस्रायलला इराणकडून आव्हान दिले जात आहे. खामेनी यांच्या एक्स हँडलवरून त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिली पोस्ट शेअर केली आहे.
खामेनी यांच्या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये क्षेपणास्त्राच्या निर्मितीपासून तो वापराच्या टप्प्यापर्यंतची प्रक्रिया दाखविण्यात आली आहे. फोटोमध्ये क्षेपणास्त्राचे उत्पादन करणारे शास्त्रज्ञ, क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करणारे लष्करी अधिकारी लक्ष्यावर मारा करत असल्याचे दिसत आहे.
“झायनिस्ट राजवटीने मोठी चूक केली आहे. देवाच्या कृपेने आता याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील”, असा संदेश या फोटोबरोबर लिहिण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी २८ फेब्रुवारीच्या रात्री खामेनी यांचा खात्मा झाल्याची माहिती दिली. तर १ मार्च रोजी तेहराननेही या बातमीला दुजोरा दिला. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी तळ आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर काही तासांतच खामेनी यांची हत्या करण्यात आली.
आठवड्यापूर्वी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारले. त्यानंतर इराणनेही त्याला जशास तसे उत्तर देत अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या आखाती प्रदेशातील मुस्लीम राष्ट्रांवर क्षेपणास्त्रे डागली. कतार, ओमान, अबु धाबी, कुवैत, सौदी अरेबिया आणि युएईमधील अमेरिकेचे हवाई तळ, लष्करी प्रतिष्ठानांना तसेच तेल आणि वायू उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले.
अयातुल्ला अली खामेनी कोण होते?
अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म १९३९ साली इराणच्या उत्तरेकडील मशहद शहरात झाला. ते आठ भावंडांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील एक धर्मगुरू होते आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत खामेनी यांनी धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान त्यांनी कोम येथे धार्मिक अध्ययन केले आणि १९६२ साली अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या शाहविरोधी चळवळीत ते सहभागी झाले.
शाहच्या राजवटीदरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर ते प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले. १९८१ ते १९८९ या काळात त्यांनी इराणचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आणि इराण-इराक युद्धाच्या काळात देशाचे नेतृत्व केले. १९८९ साली अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी यांनी सर्वोच्च नेतेपद स्वीकारले.
