Sridhar Vembu : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारताचा ‘नरक’ असा उल्लेख केला होता. ट्रम्प यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य जन्मसिद्ध (बर्थराईट) नागरिकत्वावरुन भारत आणि चीनबद्दल केलं होतं. ट्रम्प यांनी केलेल्या या उल्लेखानंतर भारताने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले होते.
आता याच मुद्यांवरून झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी एक खुलं पत्र लिहित अमेरिकेतील भारतीयांना मायदेशी परतण्याचं आवाहन केलं आहे. ‘भारत मातेला तुमची गरज असून तुम्ही मायदेशी परत या’, असं भावनिक आवाहन श्रीधर वेम्बू यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे.
श्रीधर वेम्बू यांनी काय म्हटलं?
“भारतातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, जसं मी ३७ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो, तसंच तुम्हीही पैशांशिवाय, पण चांगलं शिक्षण आणि भारताचा सांस्कृतिक वारसा घेऊन अमेरिकेत गेला असाल. त्यानंतर तुम्ही मोठं यशही मिळवलं असेल. यासाठी आपल्याबरोबर अमेरिकेने चांगला व्यवहार केला असेल, तर आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण कृतज्ञता हाच आपला भारतीय स्वभाव आहे. पण आज अनेक अमेरिकन लोकांना (कदाचित बहुसंख्य नसतील) असं वाटतं की भारतीय लोक अमेरिकेतील त्यांच्या नोकऱ्या हिरावून घेतात आणि ही धारणा निवडणुकीच्या चक्रांमुळे बदलण्याची शक्यता नाही”, असं श्रीधर वेम्बू यांनी म्हटलं.
“पुढील निवडणुकीत ही परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटत असेल. मात्र, तुमची निवड आपल्या भारतीय संस्कृतीचा द्वेष करणाऱ्या लोकांमध्ये असेल. कारण हीच ‘कट्टर उजवे’ विरुद्ध ‘जागरूक डावे’ अशी लढाई आहे. तुम्ही त्या संघर्षाचे फक्त प्रेक्षक आहात. एक गोष्ट आजही खरी आहे आणि भविष्यातही खरी असेल. जगभरात भारतीयांना मिळणारा आदर हा मोठ्या प्रमाणावर भारताच्या भवितव्यावरच अवलंबून असेल”, असं श्रीधर वेम्बू यांनी म्हटलं आहे.
“जर भारत गरीब राहिला तर जागृत डावे आपल्याला नैतिक उपदेश देतील आणि कट्टर उजवे तिरस्काराने (नरक) नैतिक उपदेश देतील. मात्र, आपण यापैकी कशालाही आदर समजण्याची चूक करता कामा नये. आजच्या जगात आदर, समृद्धी आणि सुरक्षिता हे सर्व एकाच स्रोतातून येतात, ते म्हणजे राष्ट्राचं तांत्रिक सामर्थ्य. तेच सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी भारत पुरेशी बुद्धिमत्ता निर्माण करत आहे. मात्र, दुर्दैवाने आपण त्यातील बरीच प्रतिभा, विशेषतः अमेरिकेला निर्यात केली. जसं आपण भारतात ते सामर्थ्य विकसित करू, तसं आपलं सांस्कृतिक सामर्थ्य सिद्ध होत जाईल. तुमच्यापैकी अनेकांना याचा विचार करणं कठीण असलं तरी कृपया मायदेशी परत या. भारत मातेला तुमच्या प्रतिभेची (ज्ञानाची) गरज आहे”, असं श्रीधर वेम्बू यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘भारत-चीन ही तर नरकाची द्वारं’, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध (बर्थराईट) नागरिकत्वावरुन भारत आणि चीनबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ट्रम्प यांनी यासंबधित एक व्हिडीओ ‘ट्रुथ सोशल’वर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेजने, “मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळावं यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन कायद्यांचा फायदा घेण्यासाठी शेवटच्या महिन्यात अमेरिकेत येतात”, असा दावा केला होता. या व्हिडीओत त्याने भारत आणि चीन यांचा उल्लेख ‘नरक’ असा केला होता.
व्हिडीओनुसार, “इथे जन्मल्यानंतर मुलाला लगेच नागरिकत्व मिळतं आणि नंतर ते चीन, भारत किंवा जगातील इतर कोणत्याही नरक (हेलहोल) जागेतून आपल्या संपूर्ण कुटुंबाला अमेरिकेत घेऊन येतात”, असं मायकल सॅव्हेज या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. ट्रम्प यांनी हा व्हिडिओ शेअर करून एकप्रकारे या विचारांचं समर्थन केलं.

“तुम्हाला हे अनुभवण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. इथं इंग्रजी आता बोललं जात नाही. ते (स्थलांतरीत) या देशाप्रती इमानदार नाहीत”, असं सॅव्हेज पुढे म्हणतो. याच व्हिडीओत अमेरिकेतील विशेषतः कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर भरतीवर भारतीय आणि चिनी लोकांचं वर्चस्व आहे, असा दावा करण्यात आला.“गोऱ्या लोकांना नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज नाही. कारण सर्व अंतर्गत यंत्रणा भारतीय आणि चिनी लोकांकडून चालवल्या जातात”, असं या व्हिडीओत म्हटलं होतं. भारतीयांचा मी समर्थक होतो, पण इथं जे सुरु आहे ते पाहून माझे डोळे उघडले असं सॅव्हेज या व्हिडीओत म्हणत आहे. ट्रम्प यांनी या शोची स्क्रिप्ट देखील शेअर केली आहे.

श्रीधर वेम्बू कोण आहेत?
श्रीधर वेम्बू हे झोहोचे संस्थापक आहेत. श्रीधर वेम्बू हे मूळचे तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील एका गावातील आहेत. श्रीधर वेम्बू यांनी भारतातील आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील एका विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर काही काळ श्रीधर वेम्बू यांनी अमेरिकन कंपनी क्वालकॉममध्ये काम केलं. काही वर्षांनी अमेरितील जॉब सोडून भारतात परतले आणि झोहो कॉर्पोरेशन कंपनी सुरू केली. या कंपनीची आता वर्षाला कोट्यवधींची उलाढाल आहे.
