Zoharan Mamdani : मीरा नायर यांचा मुलगा जोहरान ममदानी हा कम्युनिस्ट आहे. त्याच्याशी स्पर्धा करताना मला मजा येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे त्याची खिल्ली उडवली होती. मात्र आता जोहरान ममदानी यांनी मी कम्युनिस्ट नाही असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर दिलं आहे. जोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदाची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं?
फॉक्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की जोहरान ममदानी न्यूयॉर्कचा महापौर झाला तर आम्ही शहराला मिळणाऱ्या निधीमध्ये कपात करु. कारण तो एक कम्युनिस्ट माणूस आहे. मी स्पष्ट करु इच्छितो जर जोहरानने त्याची वागणूक सुधारली नाही तर न्यूयॉर्कला आम्ही तेवढा निधी देणार जेवढा द्यायला हवा. दरम्यान ट्रम्प यांच्या खोचकपणला जोहरान ममदानी यांनी उत्तर दिलं आहे.
जोहरान ममदानी यांनी नेमकं काय उत्तर दिलं?
जोहरान ममदानी ट्रम्प यांना उद्देशून म्हणाले, मी ट्रम्प यांना सांगू इच्छितो की मी कम्युनिस्ट नाही. मी कोण आहे, कसा दिसतो, कुठून आलो आहे यावर ट्रम्प कशाला बोलत आहेत? याचं कारण एकच आहे ते म्हणजे मूळ मुद्द्यांवरुन त्यांना लक्ष हटवायचं आहे. त्या लोकांची दिशाभूल करायची आहे ज्यांच्यासाठी मी लढतो आहे असं म्हणत तिखट शब्दांत ममदानी यांनी ट्रम्पना उत्तर दिलं आहे.
माझ्यावर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांचा प्रभाव – ममदानी
जोहरान ममदानी म्हणाले, “माझ्यावर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांचा प्रभाव आहे. त्यांनी म्हटलं होतं लोकशाहीत लोकशाहीयुक्त समाजवाद असला पाहिजे. देशाच्या सगळ्या लोकांना समान हक्क प्रदान झाले पाहिजेत. त्यामुळेच माझी इच्छा आहे की अरबपतींवर जास्त कर लादला गेला पाहिजे. असे अनेक लोक आहेत ज्यांना जास्त कर द्यावा लागतो. मात्र त्यांची कमाई कमी आहे आणि घरही छोटं आहे. बाहेरुन आलेल्या लोकांनी इथे श्रीमंत होऊन मोठी घरं बांधली आहेत. अशा लोकांकडून जास्त कर घेण्याबाबत मी सकारात्मक आहे असंही त्यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
ममदानी अरबपतींबाबत काय म्हणाले?
ममदानी म्हणाले मला मुळीच वाटत नाही की आपल्याला अरबपतींची गरज आहे. त्यांच्यामुळे भेदभाव वाढतो. शहरात समानता आणण्याचाच माझा प्रयत्न असेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.