न्यूयॉर्क : न्यूयॉर्कचे भारतीय वंशाचे महापौर महापौर झोहरान ममदानी यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्याबरोबर भेटीत कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी करू, असे वक्तव्य केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राजे चार्ल्स तृतीय यांचा अमेरिका दौरा गुरुवारी संपला. त्यांच्या दौऱ्याबद्दल विचारले असता, “मी ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्याशी स्वतंत्रपणे संभाषण केले तर त्यांना कोहिनूर हिरा परत करण्यास प्रोत्साहन देईन,” असे विधान झोहरान ममदानी यांनी बुधवारी केले होते. मात्र, त्यांची ही टिप्पणी असभ्य होती, अशी टीका होत आहे. तसेच त्यांना ब्रिटनच्या वसाहतवादाबद्दलची तीव्र भावना बाजूला ठेवता आली, असेही टीकाकारांचे म्हणणे आहे.
या टिप्पणीनंतर काहीच तासांनी ९/११ स्मृतीस्थळी ममदानी आणि राजे चार्ल्स यांची भेट झाली होती. न्यूयॉर्कमधील तीन हजारांपेक्षा जास्त मृतांना श्रद्धांजली वाहण्यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी ममदानी यांचे हे वक्तव्य अनावश्यक होते, अशी टीका ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या संपादकीयात करण्यात आली आहे. त्यांची ही टिप्पणी सभ्य नव्हती, असे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने म्हटले आहे.
कोहिनूर हा १०५.६ कॅरटचा हिरा महाराजा दुलीप सिंग यांनी १८४९मध्ये राणी व्हिक्टोरिया यांना दिला होता. त्यांनी तो १९३७मध्ये आपल्या मुकुटात परिधान केला होता. तो हिरा ब्रिटनने परत करावा अशी मागणी अधूनमधून होत असते.
