Epstein Files mention Mira Nair: एपस्टीन फाईल्सशी संबंधित नवीन कागदपत्रे अमेरिकेच्या विधी विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. या नव्या कागदपत्रात न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या आई आणि चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांच्या नावाचा उल्लेख आलेला आढळत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेच्या न्याया विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांच्या ताज्या दस्तऐवजामध्ये २००९ सालातला हा ईमेल आढळला आहे. हा ईमेल पब्लिसिस्ट पेगी सीगल यांनी २१ ऑक्टोबर २००९ रोजी जेफ्री एपस्टीनला पाठवला होता. या ईमेलमध्ये एपस्टीनची जोडीदार गिसलेन मॅक्सवेलने न्यूयॉर्कमधील टाऊनहाऊस येथे आयोजित केलेल्या आफ्टरपार्टीचा उल्लेख यात केला होता.
जेफ्री एपस्टीनची जोडीदार गिसलेन मॅक्सवेल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरली असून ती सध्या कारावासात आहे. तिला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमेलिया चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर एका पार्टीसंदर्भात हा ईमेल होता. सीगल यांनी ईमेलमध्ये लिहिले, “गिसलेन थोड्यावेळापूर्वीच टाऊनहाऊसमधून निघाल्या. बिल क्लिंटन आणि जेफ बेझोसही या पार्टीला होते. दिग्दर्शक मीरा नायर, जीन पिगोजी हेही उपस्थित होते. चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी महिलांना मात्र तो भावला.”
एपस्टीन फाईल्सच्या ताज्या दस्तऐवजात काय?
डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लांच यांनी सांगितले की, विधी विभाग एप्स्टाइन फाइलची ३० लाखांपेक्षा जास्त पाने प्रसिद्ध करत आहे. तसेच २००० हून अधिक व्हिडीओ आणि १८,००० फोटोही जारी करण्यात आले आहेत. या फाइल विभागाच्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये यापैकी काही नोंदी रोखून धरल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत ५२ लाख कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांचे पुनरावलोकन केले जात आहे.

