पीटीआय, द्रास, मिनीमार्ग
काश्मीर खोरे आणि लडाखला वर्षभर जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी झोजिला बोगदा प्रकल्पाने मंगळवारी महत्त्वाचा टप्पा गाठला. हिमालय पर्वतरांगांना छेद देत उभारण्यात येत असलेल्या या १३ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या खोदकामातील अखेरचे २.५ मीटर अंतर स्फोटाद्वारे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आशियातील सर्वांत लांब बोगद्याच्या मुख्य खोदकामाचे काम पूर्ण झाले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ‘ब्रेकथ्रू ब्लास्टिंग’ (दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या खोदकामाचा संगम घडवणारा अंतिम स्फोट) चे उद्घाटन करण्यात आले. समुद्रसपाटीपासून सुमारे ११,५७८ फूट उंचीवर उभारण्यात येणारा हा बोगदा सोनमर्गपासून २४ किलोमीटर आणि श्रीनगरपासून १०३ किलोमीटर अंतरावर आहे.
या आव्हानात्मक प्रकल्पाचे खोदकाम नियोजित वेळेच्या तब्बल ६ महिने आधीच पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून बोगदा फेब्रुवारी २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
उणे चार अंश तापमानात काम
हा प्रकल्प लडाख, लेह आणि जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. उणे चार अंश सेल्सियस तापमानात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रयत्नांमुळे हा टप्पा गाठता आला. या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के कामगार स्थानिक भागातील आहेत.
संरक्षण दलाला मोठा फायदा
दरवर्षी हिवाळ्यात होणारी प्रचंड बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी आणि हिमस्खलन यामुळे झोजिला खिंड सलग ३ ते ४ महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असते. त्यामुळे लडाखचा देशाच्या उर्वरित भागाशी असलेला संपर्क तुटायचा. मात्र, बोगदा सुरू झाल्यानंतर द्रास, कारगिल आणि लेहकडे जाणारी वाहतूक वर्षभर सुरू राहणार आहे. याचा संरक्षण दलाला मोठा फायदा होईल.
दीड तासाचा प्रवास केवळ १५ मिनिटांत
झोजिला बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर सध्या एक ते दीड तास लागणारा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे इंधन, वेळ आणि वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. नागरी वाहतुकीबरोबरच संरक्षण दलांच्या हालचालीही अधिक वेगवान होणार आहेत.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला १२,००० कोटी रुपयांच्या निविदा आल्या होत्या. परंतु, आम्ही फेरनिविदा काढून योग्य नियोजनाद्वारे हा प्रकल्प सुमारे ७,००० कोटी रुपयांमध्ये पूर्ण करत आहोत. यामुळे देशाचे ५,००० कोटी रुपये वाचले आहेत. -नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
झोजिला बोगद्याची वैशिष्ट्ये…
प्रकल्प खर्च : ६,८०० कोटी रुपये
बोगद्याची लांबी : १३.१५३ किमी
उंची : ११,५७८ फूट
प्रकार : दोन मार्गिकांचा एकल नळी बोगदा
जोडणी : सोनमर्ग ते मिनीमार्ग
एकूण प्रकल्प लांबी : ३१ किमी
कामाची प्रगती : ८५ टक्के
अपेक्षित पूर्णता : फेब्रुवारी २०२८
प्रवास वेळ : १ ते १.५ तासांवरून अवघ्या १५ मिनिटांपर्यंत
