झोमॅटोच्या कस्टमर केअर एजंट अर्थात ग्राहक सेवा प्रतिनिधीने एका तामिळ ग्राहकाला रिफंड नाकारल्याचं प्रकरण गेल्या २४ तासांत बरंच व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर या प्रकरणानंतर लागलीच नेटिझन्स व्यक्त होऊ लागल्यानंतर झोमॅटोनं चक्क जाहीररीत्या संबंधित ग्राहकाची माफी मागितली होती. तसेच, संबंधित एजंटला कामावरून बडतर्फ केल्याचं देखील ट्वीट झोमॅटोकडून करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर काही तासांतच झोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी या सगळ्या वादात आपली भूमिका मांडली आहे. इतकंच नाही, तर संबंधित महिला कर्मचाऱ्याची बाजू घेत देशातील सहनशीलतेची पातळी वाढायला हवी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
ग्राहकाचं ट्वीट आणि कंपनीकडून माफीनामा
हा सगळा प्रकार सुरू झाला सोमवारी संध्याकाळी. १८ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूमधील एका ग्राहकानं झोमॅटोवरून खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते. मात्र, ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ मिळालेच नसल्यामुळे विकास नामक या ग्राहकाने झोमॅटोकडे पैसे रिफंड करण्याची मागणी केली. मात्र, संबंधित हॉटेलकडून योग्य तो प्रतिसाद येत नसल्याचं कारण झोमॅटोच्या महिला कस्टमर केअर एजंटनं दिलं. तसेच, हॉटेलवाल्याशी तामिळ भाषेमुळे संवाद साधणं अवघड झाल्याचं देखील ही एजंट म्हणाली.
दरम्यान, कंपनीनं तामिळ भाषा येणारेच कर्मचारी तामिळनाडूमध्ये नेमायला हवेत, असं विकासनं म्हणताच एजंटनं “हिंदी ही राष्ट्रभाषा असून प्रत्येकाला थोडीफार हिंदी तरी यायला हवी”, असं उत्तर दिलं. या संवादाचे स्क्रीनशॉट विकासनं ट्विटरवर टाकताच त्यावर नेटिझन्सनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करायला सुरुवात केली.
या प्रकरणानंतर झोमॅटोकडून जाहीर माफीनामा देण्यात आला. ट्विटरवर इंग्रजी आणि तामिळ अशा दोन्ही भाषांमध्ये हा जाहीरनामा देण्यात आला. तसेच, संबंधित महिला कर्मचाऱ्याला आपण बडतर्फ करत असल्याचं ट्विटरकडून जाहीर करण्यात आलं.
मात्र, याच्या काही तासांमध्येच झोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी ट्वीट करत संबंधित महिला कर्मचाऱ्याची बाजू घेतली आहे. तसेच, देशातील सहनशीलतेची पातळी वाढायला हवी, अशी देखील टिप्पणी केली आहे. “एका अन्नपदार्थ वितरण कंपनीच्या सपोर्ट सेंटरमधल्या व्यक्तीची एक चूक सध्या राष्ट्रीय मुद्दा बनली आहे. देशात आत्ता असलेली सहनशीलतेची पातळी खूप जास्त वाढायला हवी. या प्रकरणात नेमका कुणाला दोष देणार?” असा सवाल दीपेंदर यांनी केला आहे.
महिला कर्मचाऱ्याची पुन्हा नियुक्ती
दरम्यान, काही तासांपूर्वीच बडतर्फ करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याची पुन्हा नियुक्ती केल्याचं दीपेंदर यांनी जाहीर केलं. “आम्ही संबधित एजंटला पुन्हा कामावर रुजू करून घेत आहोत. ही घटना म्हणजे अशी बाब नाही ज्यासाठी तिला कामावरून काढून टाकलं जावं. यापुढे अधिक चांगलं काम करण्यासाठी यातून धडा घेण्यासारखी ही बाब आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये दीपेंदर म्हणाले आहेत.
“कॉल सेंटर एजंट भाषातज्ञ नाहीत”
कॉल सेंटरवरील महिला कर्मचाऱ्याची बाजू घेताना दीपेंदर गोयल यांनी ते भाषातज्ञ नसल्याचा उल्लेख केला आहे. “आमचे कॉल सेंटर एजंट हे तरुण आहेत. ते त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्याच टप्प्यात आहेत. ते भाषा किंवा प्रादेशिक भावनांचे तज्ञ नाहीत. तसा तर मीही तज्ञ नाही”, असं ते म्हणाले आहेत.
आपण सर्व समान आहोत…
दरम्यान, या विषयावर शेवटचं ट्वीट करताना दीपेंदर गोयल यांनी तामिळनाडूच्या जनतेला देखील आवाहन केलं आहे. “आपण एकमेकांच्या कमतरता सहन करायला हव्यात. तसेच, एकमेकांच्या भाषा आणि प्रादेशिक अस्मितांचा देखील आदर करायला हवा. तामिळनाडू, आमचं तुमच्यावर प्रेम आहे. जसं आमचं संपूर्ण भारतावर आहे. त्यापेक्षा जास्त नाही आणि त्यापेक्षा कमी नाही. आपण सर्व तेवढेच समान आहोत, जेवढे आपण वेगळे आहोत”, असं दीपेंदर गोयल यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेवटी म्हटलं आहे.
या वादानंतर सोशल मीडियावर #Hindiisournationalanguage आणि #Hindiisnotournationallanguage हे दोन ट्रेंड ट्रेंडिंगमध्ये आले आहेत.