फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने ट्विटरवर जाहीर माफी मागितली आहे. तमिळनाडूच्या एका ग्राहकाने सोशल मीडियावर तक्रार केल्यानंतर झोमॅटोने माफी मागितली आहे. हिंदी येत नसल्यामुळे कस्टमर केअर एजंट रिफंड नाकारल्याची तक्रार विकास नावाच्या ग्राहकाने केली होती. हिंदी ही राष्ट्रभाषा असून प्रत्येकाने थोडी तरी हिंदी शिकून घ्यावी, असं एजंटने म्हटल्याचंही विकासने सांगितलं. विकासची ही तक्रार सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. खुद्द डीएमके खासदारांनी या प्रकरणाचा निषेध केला होता.
“झोमॅटोवरून अन्न ऑर्डर केले पण ते मला मिळालेच नाही. कस्टमर केअर म्हणतं की मला हिंदी येत नसल्याने रक्कम रिफंड केली जाऊ शकत नाही. भारतीय असल्याने मला हिंदी माहित असायला हवी, असंदेखील शिकवलं,” असं या ग्राहकाने म्हटलं होतं. त्याने या चॅटिंगचे स्क्रीनशॉट देखील ट्विटरवर शेअर केले आहेत. चेन्नई हे तमिळनाडूमध्ये आहे, त्यामुळे तिथे सेवा पुरवणाऱ्यांना तमिळ कसं येतं नाही, असं या ग्राहकाचं म्हणणं होतं.
दरम्यान, विकासचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आणि डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केलं. “काही कंपन्यांची ग्राहक सेवा फक्त निवडक भाषांमध्येच चालते. कंपन्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत ग्राहकांना सेवा देणे बंधनकारक केले पाहिजे. ग्राहकाला हिंदी किंवा इंग्रजी माहित असणे आवश्यक नाही,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
कनिमोळींच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात, झोमॅटोने इंग्रजी आणि तमिळ भाषेमध्ये निवेदन जारी करत माफी मागितली. त्यांनी म्हटलं की, “आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या कस्टमर केअर एजंटला कामावरून काढले आहे. एजंटचे वर्तन आमच्या कंपनीच्या संवेदनशीलतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध होते. तसेच एजंटचा प्रतिसाद, भाषा आणि विविधतेबद्दलच्या त्याच्या भूमिकेचे कंपनी प्रतिनिधित्व करत नाहीत,” असे निवेदनात म्हटले आहे.
कृपया झोमॅटोला रिजेक्ट करू नका, माफी मागत अशी विनंतीही या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.