अनुपम मिश्रजींची भाषा विचारांची पालखी वाहणारी आहे. आपल्या पुस्तकांतून अनुपमजींनी पाण्याबाबतचे परंपरागत ज्ञान, त्याबाबतची त्यांची जाणकारी जागोजागी दाखवली आहे. त्यांचा साधेपणा त्यांच्या पुस्तकांसारखाच अभिरुचीसंपन्न व मर्यादशील होता. असाही विचार येतो की, साधेपणा व संकल्प असलेले एखादे आंदोलन सुरू केले जावे ज्यामुळे अनुपमजींच्या स्मृती ताज्या राहतील..

माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ते नकळत येऊन बसले होते. कुठल्या खुच्र्या न हलवता, जरासाही आवाज न करता अनुपम मिश्र अवतरले अन् गेलेही. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मला नंतर हळूहळू होत गेली, ते गेल्यानंतर त्यांचे असणे जाणवले. गेले दोन महिने मला त्यांची सतत आठवण येते आहे. मी वारंवार स्वत:ला विचारू लागलो, ते गेले आहेत, पण तरी आपण त्यांना आपल्यात कसे शाश्वत स्थानी ठेवू शकतो, त्यांचे विचार जिवंत ठेवू शकतो..

अनुपम मिश्र यांना मी अनेक परिप्रेक्ष्यांतून पाहिले. पहिल्यांदा त्यांच्याविषयी जाणून घेतले, नंतर त्यांच्या विचारांनी वेगळी जाणीव माझ्यात निर्माण केली. त्यांच्या व्यक्तित्वाचा स्पर्शही अनुभवला. ‘आज भी खरे हैं तालाब’ या त्यांच्या पुस्तकाच्या आखीव-रेखीव स्वरूपानेच प्रथम मन मोहून गेले. चांगला टंक, प्रासंगिक व सुंदर चित्रे, मनमोहक मांडणी असा या पुस्तकाचा बाहेरचा तोंडवळा. या पुस्तकाचे वैचारिक मोल तर काही वेगळेच आहे. मी मराठी व बांगला भाषेत अनेक सुंदर पुस्तके पाहिली होती, पण हिंदीत इतकी सुंदर मांडणी असलेले पुस्तक पाहिले नव्हते. हिंदीतील पुस्तकोंची मांडणी सहसा फारशी चांगली नसते. त्यामुळे हिंदूी ही दरिद्री भाषा आहे असा चुकीचा संदेश समाजात जात होता; पण अनुपम यांच्या पुस्तकाने वैचारिक बोधाबरोबरच रचनेच्या सौंदर्याचेही भान राखले. त्यात उगाच काही रंगांची उधळण नव्हती. केवळ लक्ष आकर्षित करण्याचा हेतू नव्हता, तर त्या पुस्तकाच्या मांडणी व रचनेतही एक विचार होता. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सोडले तर हे पुस्तक कृष्णधवल रूपात आहे, पण तरीही त्यात एक साधेपणा व सुंदरता यांचा अद्भुत नमुना पेश केला आहे. नंतर या पुस्तकाच्या भाषेवर विचार करू लागलो. अत्यंत सोप्या भाषेत अंतर्मुख करायला लावणारे चिंतन हे या पुस्तकाचे वैशिष्टय़. छोटी वाक्ये, मोठे विचार. जसे आपण बोलतो तसे लिहिण्याचे तंत्र वापरून अनुपम मिश्र यांनी त्यांचा प्रत्येक लेख म्हणजे हिंदीतील सुंदर लेखनाचा नमुना म्हणूनच पेश केला आहे. अवघड शब्द, उधार-उसनवारीचे वाक्प्रचार यात दबलेल्या हिंदी लेखनाने त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने मोकळा श्वास घेतला आहे. मी इंग्रजीतून लिहिणाऱ्यांना ‘द इकॉनॉमिस्ट’ची शैली आत्मसात करण्याचा सल्ला देतो तसेच हिंदीतून लिहिणाऱ्या युवा लेखकांना मी अनुपम मिश्र यांचे लेखन वाचण्यास सांगेन. अनुपम मिश्र यांच्या श्रद्धांजली सभेला मी गेलो होतो तेव्हा त्यांचे सहकारी सोपान जोशी हे अनुपमजींच्या लेखनावर आधारित लेखनशैली पुस्तिका तयार करीत आहेत असे कळले. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून हिंदी लेखनात एक नवीन घराणे किंवा शैली उदयास येईल अशी आशा पल्लवित झाली.

नंतर या पुस्तकाचे मुखपृष्ठ सोडून मागचे पान पाहिले. त्यात प्रकाशनासंबंधी सूचनांत या पुस्तकाचा कुठलाही स्वामित्व हक्क नसल्याचे वाचले. कुणीही या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करू शकतो. एक छोटीशी अपेक्षा त्यात आहे, ती म्हणजे लेखकाला त्याची सूचना दिल्यास ते अधिक चांगले होईल. प्रकाशनाच्या जगात आज नफेखोरी, पैसा हे सगळे आले असताना अनुपमजींचा साधेपणा, निरपेक्ष बुद्धी मोहवणारी आहे. त्यांचे हे आवाहन वाया गेले नाही. अनेकांनी ‘आज भी खरे हैं तालाब’ या पुस्तकाच्या प्रती छापल्या. याचा अर्थ त्यांच्या पुस्तकांच्या अनेक प्रती, आवृत्त्या निघाल्या व त्या विकल्या अन् वाचल्या गेल्या हेही उघड आहे. हिंदी प्रकाशनाच्या इतिहासात साहित्य वगळता गंभीर विषयावर लिहिलेल्या पुस्तकाला एवढे वाचक क्वचितच मिळाले असतील. अनुपमजींची भाषा विचारांची पालखी वाहणारी आहे. ‘आज भी खरे हैं तालाब’ व त्यानंतर लिहिलेले ‘राजस्थान की रजत बुंदे’ तसेच इतर अनेक लेख यात अनुपमजींनी पाण्याबाबतचे परंपरागत ज्ञान, त्याबाबतची त्यांची जाणकारी जागोजागी दाखवली आहे. राजस्थान हा पाण्याची टंचाई असलेला प्रदेश आहे. तेथे पाणीबचत, संवर्धन, वापर याबाबतच्या योग्य पद्धतींचा शोध त्यांनी घेतला. यातून एक स्पष्ट संदेश मिळतो तो म्हणजे, आपल्याला टिकून राहायचे असेल तर पाणी वाचवले पाहिजे. त्यासाठी आधुनिक अभियांत्रिकी ज्ञान नव्हे, तर परंपरागत ज्ञान आत्मसात केले पाहिजे. याच विचारातून प्रेरणा घेऊन राजेंद्र सिंह यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जुने तलाव, सरोवरे, बंधारे, विहिरी यांचा जीर्णोद्धार केला. हे पुस्तक अनेक मरणासन्न नद्यांच्या पुनर्जन्मास कारण ठरले हे विशेष.

पाणी हा अनुपमजींनी ज्यावर विचार मांडले त्यातील एक भाग होता, पण त्यांचे विचार आपली परंपरागत समज, कौशल्ये या सगळ्यांना व्यापणारे होते. त्यांना पर्यावरणवादी किंवा गांधीवादी या चौकटीत बांधणे हा अन्याय ठरेल. त्यांच्या विचारात समाज केंद्रस्थानी आहे. स्वावलंबी, श्रमजीवी, ज्ञान पारखून घेणारा समाज आपली सुख-दु:खे समजून घेण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्याला स्वत:लाच ती जाणून घ्यावी लागतात, असे त्यांचे म्हणणे. परंपरागत समाजाचे हे शहाणपण सुरुवातीला वेगळे वाटू शकते, पण मोकळेपणाने विचार करणारा समाज ही कल्पना समता व न्यायाच्या स्वप्नाशी नाते सांगणारी आहे. अनुपम मिश्र यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जरा उशिराच जाणून घेतले. जेवढे जाणून घ्यायला पाहिजे तेवढे घेतलेही नसेल कदाचित. अनुपम मिश्र हे हिंदीतील महान कवी भवानी प्रसाद मिश्र यांचे पुत्र, पण त्याचा उल्लेख त्यांच्या संदर्भात कधीच आला नाही. संकोची, नम्र, शालीन, सत्यनिष्ठ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांना कुठल्याही मुद्दय़ावर प्रचारकी थाटाचे बोलणे, लिहिणे किंवा ढोंगबाजी यांचा तिटकारा होता. अनुपमजींचा साधेपणा आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही; पण त्यांचा साधेपणा हा आजच्या डंका पिटून आपण साधे आहोत, असे सांगणाऱ्यांसारखा नव्हता. आज काही लोक साधेपणाचा आव इतका आणतात की, आपल्या नजरेत उतरण्यासाठी ते त्यांची तपश्चर्या, अपरिग्रह यांचा बाजार मांडतात. आंदोलनकारी लोक नेहमी अव्यवस्था व साधनहीनता यांनाच साधेपणाचे रूप देत हाकाटी करतात. अनुपमजींचा साधेपणा तसाही उथळ नव्हता. अनुपमजींचा साधेपणा त्यांच्या पुस्तकांसारखाच अभिरुचीसंपन्न व मर्यादशील होता. आपल्या मर्यादांची जाणीव ठेवताना त्या मर्यादांमध्ये राहून आपली जबाबदारी पार पाडण्याचा त्यांचा संकल्प होता. १९ डिसेंबरला अनुपमजी गेले. त्यानंतर मी वेळोवेळी विचार करतोय की, अशा खऱ्या अर्थाने अनुपम (सुंदर) व्यक्तीच्या स्मृती कशा जिवंत ठेवता येतील. अनुपमजींच्या नावाने ठिकठिकाणी विहिरी असाव्यात, त्यांना आपण ‘अनुपम की बावडी’ असे नाव देऊ या, असे वाटते. त्या विहिरीच्या जलप्रवाहात अनुपम यांच्या स्मृती व विचार सदैव जिवंत राहतील. दुसरा असाही विचार येतो की, साधेपणा व संकल्प असलेले एखादे आंदोलन सुरू केले जावे, ज्यामुळे अनुपमजींच्या स्मृती ताज्या राहतील. अनुपमजी हसताहेत. जाता जाता सांगत आहेत, काही घाई नाही, जेव्हा निवांत वेळ मिळेल, उसंत मिळेल तेव्हा विचार कर.

 

योगेंद्र यादव

 yywrites5@gmail.com