जेएनयूमधील गेल्या वर्षीची बहुचर्चित ध्वनिचित्रफीत खरी नव्हती हे सिद्ध झाले आहे. त्यात तोडमोड करून वेगळ्याच प्रक्षोभक गोष्टी घुसडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणाबाजीच केली असेल तर पोलीस आजपर्यंत त्याचे पुरावे न्यायालयात देऊ शकले असते.  न्यायालयाच्या परिसरात कन्हैय्याकुमारला मारहाण झाली. एक वर्ष उलटले. पोलिसांना त्या घटनेतील दोषींना हजर करता आलेले नाही. एकंदर जेएनयूच्या चर्चेत ना ‘राष्ट्रभक्त’ जिंकले ना ‘देशद्रोही’ हरले..

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ९ फेब्रुवारीला घडलेल्या घटनेला आता एक वर्ष झाले त्यानिमित्ताने इंदूरहून आलेल्या एका फोनची आठवण आली. त्या काळात सगळा देश राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोहींवर उलटसुलट टीका करीत होता, त्यावर चर्चा करीत होता. त्यांचे लक्ष्य जेएनयूवाले, झोळीवाले व दाढीवाले असे सर्वच जण होते. मीसुद्धा त्या वेळी दूरचित्रवाणीवरील चर्चेत सहभागी होतो. राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही यापेक्षा वेगळा असा तिसरा काही दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करीत होतो, त्याच वेळी आलेला तो फोन अजून स्मरणात आहे.

मी तुमचा खूप सन्मान करतो, तुम्ही शहाणपणाची व योग्य भूमिका घेत आहात. तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाची बाजू घेण्याऐवजी देशाचे हित पाहात आहात, पण जेएनयूच्या मुद्दय़ावर तुम्ही देशद्रोहींच्या बाजूने का उभे आहात, दूरध्वनी करणारा प्रामाणिक भावनेतून विचारत होता. मग मी त्याला कन्हैयाकुमारला न्यायालयात झालेल्या मारहाणीबाबत विचारले. मी असे स्पष्ट केले की, राष्ट्रवादाबाबत जेएनयूच्या काही लोकांच्या मताशी मी सहमत नाही, पण या घटनेतील काही बाबी लक्षात घेता मी जेएनयूवाल्यांचे समर्थन करीत आहे; पण मी त्याच्या प्रश्नांची कदाचित समाधानकारक उत्तरे देऊ शकलो नसेन, त्याला नेमके काय घडले यात रस नव्हता. इकडे भारतमातेचा अपमान होत असताना तुम्ही प्रत्यक्षात त्या वेळी काय घडले हे सांगत आहात; पण खऱ्या प्रश्नावर तुम्ही काहीच सांगत नाही. कदाचित ती व्यक्ती चिडलेल्या अवस्थेत होती. कधी तरी त्या व्यक्तीचे डोके शांत असताना त्याच्याशी बोलता आले तर बरे, अशी माझी भाबडी अपेक्षा. नंतर असा संवाद होऊ शकला नाही. इंदूरची आठवण तर आली; पण फोन कुणी केला, त्याचा फोन नंबर काय होता हे आठवत नाही. जेएनयू घटनेला वर्ष पूर्ण झाले तेव्हा मी मनातल्या मनात त्या व्यक्तीशी संवाद साधू लागलो. तुम्हीही ऐका.

मी त्या व्यक्तीला सांगू लागलो की, ज्या वेळी तुम्ही बोललात तेव्हा संतप्त होतात, पण आता आपणच बघा जेएनयूमधील त्या घटनेतून सत्य काय बाहेर आले. ज्या ध्वनिचित्रफितीवर आपण तावातावाने बोलत होतात ती खरी नव्हती हे सिद्ध झाले आहे. त्यात तोडमोड करून वेगळ्याच प्रक्षोभक गोष्टी घुसडण्यात आल्या होत्या. तुम्हीच विचार करा, एक वर्ष उलटून गेले. जर जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणाबाजीच केली असेल तर पोलीस आजपर्यंत त्याचे पुरावे न्यायालयात देऊ शकले असते. तुम्हीच बघा, दिवसाढवळ्या न्यायालयाच्या परिसरात कन्हैयाकुमारला मारहाण झाली. एक वर्ष उलटले. पोलिसांना त्या घटनेतील दोषींना हजर करता आलेले नाही. असे तर नाही की, तुमच्यासारख्या लोकांच्या भावनांशी खेळून एका छोटय़ाशा गोष्टीचे अवडंबर माजवले जात आहे व जे खरोखर घडले त्याची झाकपाक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटनेची चर्चा करून मी काही गोष्टी वेगळ्याच दिशेने फिरवत आहे असा समज करून घेऊ नका.

मला आठवते की, ही गोष्ट केवळ तथ्य काय होते याची नाही, मीसुद्धा त्याच्याशी सहमत आहे. तुमच्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाही प्रश्न नाही. खुलेआम देशविरोधी घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करण्यासारखी परिस्थिती नाही हेही मी मान्य करतो. एक मोठा व आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला देश अशा कृत्यांवर हसला तर नवल नाही, पण अजून आपण तेथपर्यंत पोहोचलेलो नाही. तुम्ही म्हणाला होतात की, तुम्ही देशाबाबत एकनिष्ठ आहात की नाही. मी हाच प्रश्न वेगळा विचारीन की, तुमची देशाबाबत भावना काय असली पाहिजे, देशप्रेम हा धर्म असू शकतो का.. तुम्ही म्हणालात की, आम्ही तुमच्या बोलण्याचा सन्मान करतो. त्यामुळे मान्य करा किंवा करू नका, पण लक्षपूर्वक ऐका. खरे तर गेल्या वर्षी जेएनयूमध्ये जे दोन गट चर्चेत गुंतले होते ते देशधर्मास अनुकूल नव्हते. जे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवत होते ते व ज्यांना राष्ट्रविरोधी ठरवले जात होते ते असे दोन्ही गट उसनी विचारसरणी घेऊन वाद घालत होते. देशाचा डंका पिटणाऱ्यांची राष्ट्रवादाची संकल्पना ही युरोपची नक्कल होती. राष्ट्रवादाच्या त्या चर्चेत भारतीयत्व काहीच नव्हते. राष्ट्रभक्त किंवा राष्ट्रवाद्यांचा गट आंधळी देशभक्ती मागत होता. माझा देश बरोबर की चूक, हा प्रश्न त्यांच्या गावीही नव्हता. देशप्रेमाचा अर्थ देशाशी संबंधित कुठल्याही गोष्टीला विरोध करणे असा लावला गेला. माझा देश महान आहे, कारण भारताला मातृभूमी, पितृभूमी व श्रेष्ठ भूमी मानलेच पाहिजे, तेच या देशाचे मालक अन्यथा भाडेकरू. गेल्या वर्षी राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला गट विजयी मुद्रेने हिंडत होता. सगळ्यांची राष्ट्रभक्तीची परीक्षा घेत सुटला होता.

दुसरा गट जो कधी धर्मनिरपेक्ष किंवा उदारतावादी म्हणवून घेतो तो निष्प्रभ ठरला होता. राष्ट्रवादी त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून हिणवत होते. मी तर राष्ट्रनिरपेक्ष असा शब्द त्यांच्यासाठी वापरेन. त्यांच्या मते देशाने आमच्या अमर्याद निष्ठेवर हक्क सांगू नये. कुटुंबापासून विश्वापर्यंत आम्ही वेगवेगळ्या धर्माचे, वंशांचे, चालीरीतींचे लोक आहोत. प्रत्येक पातळीवर आपली काही तरी जबाबदारी असते. कुठल्या एका निष्ठेच्या लोकांकडे दुर्लक्ष करून एखाद्या गोष्टीचे समर्थन करणे कसे शक्य आहे. या गटाचा देशाला विरोध नव्हता. गेल्या वर्षी हा गट बचावात्मक भूमिका घेत पराभूत झाल्यासारखा होता.

या दोन्ही गटांची राष्ट्रवादाची भूमिका ही युरोपकडून उधार घेतलेली होती. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवाद हा एक साकल्याने केलेला विचार होता. एक राष्ट्र, एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक वंश. युरोपात राष्ट्रीय एकतेचा अर्थ एकरूपता असा होता. जर्मनी व इटलीच्या राष्ट्रवादाची नक्कल गेल्या वर्षी राष्ट्रवादाची हाकाटी करणारे भारतात करू पाहात होते. गेल्या वर्षी या राष्ट्रवादाला विरोध करणारा एक गटही राष्ट्रवाद ही संकीर्ण संकल्पना मानत होता. जर उदार व्हायचे असेल तर राष्ट्रवाद सोडून आंतरराष्ट्रीयता आपलीशी करावी लागेल. खरे तर हे दोन्ही गट उधार विचारसरणी व आजारी मानसिकतेचे दोन चेहरे आहेत. खरा राष्ट्रधर्म समजण्यासाठी आपल्याला युरोपात जायची गरज नाही. भारतातील स्वातंत्र्यलढा आपल्याला राष्ट्रवादाचा खरा अर्थ समजून देतो. या राष्ट्रवादात राष्ट्रीय एकता म्हणजे राष्ट्रीय एकरूपता असा अर्थ अभिप्रेत नव्हता.

युरोपीय राष्ट्रवादाच्या विचारसरणीपेक्षा वेगळा असलेला आपला राष्ट्रवाद हा बहुविविधतेचा सन्मान करणारा आहे. आपण अनेकतेत एकतेचे दर्शन घडवलेले आहे. भारतीय राष्ट्रवाद जात, पंथ, वंश यांच्याशी संबंधित नाही. ब्रिटिश केवळ गोऱ्या कातडीचे, बाहेरचे होते म्हणून त्यांना विरोध केला गेला नाही, तर आपला राष्ट्रवाद हा राजकीय व आर्थिक गुलामगिरी विरोधातील होता. त्यातून आपण आफ्रिका, आशियातील गुलामगिरीचे शिकार बनलेल्यांना आपल्या राष्ट्रवादाशी जोडले. आपला राष्ट्रवाद आपल्याला दुसऱ्या देशांविरोधात उभे करीत नाही, तर आपल्याच देशातील विविध जाती, प्रांत व धर्म यांना जोडतो आहे. आपल्याला आठवत असेल की, मी त्या माणसाशी फोनवर बोलत असताना त्याच्या सगळ्या गोष्टी मला पटत नव्हत्या. मला आशा आहे की, मी असे का म्हणालो हे या विवेचनावरून तुम्हाला पटले असेल. गेल्या वर्षी जेएनयूच्या चर्चेत ना ‘राष्ट्रभक्त’ जिंकले ना ‘देशद्रोही’ हरले. इंदूरहून फोनवर बोलणाऱ्या त्या माणसाचा पत्ता किंवा फोन नंबर माझ्याकडे नाही; पण देशप्रेम तर अशा अनामिक लोकांशी नाते जुळल्यानेच बहरत जाते नव्हे का..

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com