X

शिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव

भगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली

भगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली, त्यात नेहमीप्रमाणे कार्यक्रम, आदरांजली, पुष्पहार, भाषणे असे सर्व काही झाले. भगतसिंग यांच्यासारख्या महान क्रांतिकारकाला जे अजिबात रुचले नसते ते सगळे आपण केले. नेहमीच करत आलो आहोत. गेल्या काही वर्षांत आपण भगतसिंग यांना एका किरकोळ प्रतीकापर्यंत खाली आणण्याचा वेडेपणा चालवला आहे. विशिष्ट विचारसरणी नसलेला एक प्रखर राष्ट्रवादी एवढीच प्रतिमा आपण मांडत आलो आहोत पण भगतसिंग यांचे काम त्यापेक्षा मोठे होते. त्यांची वेगळी विचारसरणी होती त्याकडे आपण दुर्लक्ष केले आहे.

या वेळी त्यांची ११०वी जयंती साजरी झाली. त्यात खरे तर ते दूरदृष्टीचे क्रांतिकारक होते हे ठसवणे आवश्यक होते. त्यांचे खरे स्मरण भूतकाळात जाऊन होणार नाही, त्यांच्या गोष्टी सांगून होणारे नाही तर त्यासाठी वर्तमान व भविष्याबाबत एकच प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे, आपले युवक देशाला नव्याने कसे घडवू शकतील?

हा प्रश्न विचारण्याची ही समर्पक वेळ आहे, असे मला वाटते. बनारस हिंदू विद्यापीठात आतापर्यंतचे अभूतपूर्व असे निषेध आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व विद्यार्थिनींनी केले व युवक राजकारणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. गेली दोन वर्षे विद्यापीठांच्या आवारांमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली. त्यात पुण्याचे एफटीआयआय, अलाहाबाद विद्यापीठ, कोलकात्याचे जादवपूर विद्यापीठ, हैदराबादचे केंद्रीय विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व आता बनारस हिंदू विद्यापीठ यांचा समावेश आहे. ही सगळी निषेध आंदोलने वेगवेगळी होती, की त्यात काही समान धागा आहे. जर तसे असेल, तर त्यात भविष्यासाठी काही ठोस आहे का; असा प्रश्न मला पडतो.

मी विचारलेला हा प्रश्न टाळणे खूप सोपे आहे पण आजच्या विद्यार्थ्यांची घडण व पिंड बघितला, तर ते करिअरकेंद्री, सहजगत्या सर्व गोष्टींना सामोरे जाणारे, गमतीजमतीलाही जीवनात स्थान देणारे आहेत. त्यांना सामाजिक बदलांपेक्षा समाज माध्यमात जास्त स्वारस्य आहे, असा केस पिकलेल्या सर्वच अनुभवी ज्येष्ठांचा समज आहे, आपली नेमकी समस्या येथेच आहे. प्रत्येक पिढीत त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीत यश व कीर्ती संपादणारे तरुण असतात. व्यवस्था झुगारणारे व तिला नव्या दिशेने वळवू पाहणारे अल्पसंख्य तरुण असतात. आजचा युवक त्यापेक्षा वेगळा आहे. माझ्या सार्वजनिक जीवनातील अनुभवावरून तरी आजच्या पिढीत आदर्शवादी तरुणांची कमी नाही. ते त्यांच्या मूल्यांची जपणूक करताना जोखीम पत्करणारे आहेत, व्यक्तिगत प्रगती साधण्यापेक्षा मोठे काही तरी करण्याची त्यांची इच्छा आहे. अशा व्यापक ध्येये बाळगणाऱ्या तरुणांची संख्या पूर्वीपेक्षा आता जास्त आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण जुने निकष आजच्या तरुणांना लावून त्यांना त्या चौकटीतून पाहणे योग्य नाही.

यात आणखी एक सांगितले जाऊ शकते ते म्हणजे विद्यापीठ आवारात झालेल्या आंदोलनाच्या घटनांमध्ये कुठलाच समान धागा नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. एफटीआयआयमध्ये अकार्यक्षम अध्यक्षांविरोधात आंदोलन झाले. हैदराबादचे निषेध आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येतून सुरू झाले. बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलन हे लिंगभेद व लैंगिक छळवणुकीच्या प्रकारातून सुरू झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व दिल्ली विद्यापीठात राष्ट्रविरोधी घटनांमुळे आंदोलन झाले इतर ठिकाणची आंदोलने स्वयंस्फूर्त होती. त्या आंदोलनांचे राजकारण वेगळे होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचाराच्या तरुणांनी तर हैदराबाद विद्यापीठात आंबेडकरवाद्यांनी आंदोलन केले. पण विद्यार्थी आंदोलनांवर असे शिक्के इतर ठिकाणीही मारता येणे शक्य नाही.

अगदी जवळून या सगळ्या घटनांकडे बघितले, तर असे दिसते की आपण नाकारले तरी त्या आंदोलनांमध्ये एक समान धागा आहे. तो या विद्यार्थी निदर्शनांना जोडणारा आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक नवीन व्यवस्था लादण्याचा जो प्रयत्न सध्याच्या राजवटीने चालवला आहे, त्याला विरोध हे या आंदोलनांचे सूत्र आहे. ही लादण्यात येत असलेली नवी व्यवस्था म्हणजे केवळ शिक्षणाचे भगवेकरण एवढीच नाही. त्यापेक्षा पलीकडे जाऊन सध्याची राजवट उच्च शिक्षणाचे सरसकट अवमूल्यन करीत चालली आहे. नवीन शिक्षणक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची वेगळी घडण या राजवटीला अपेक्षित आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थांतील राजकारण ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उच्च शिक्षणात वेगवेगळे गट तट निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. हे गट तट वेगळ्या पद्धतीने जोपासले जात आहेत. उच्च शिक्षण संस्थांत कधी न ऐकलेल्या सुमार बुद्धिवंतांची वर्णी लावली जात आहे, आता ही बाब नवीन राहिलेली नाही. काँग्रेस व डाव्यांच्या काळातही ही पापे झालीच होती. भाजपने मात्र आता यात अगदीच खालची पातळी गाठली आहे. संघ परिवाराला देशातील पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतील बुद्धिवंतांना आपल्या गटात खेचता आले नाही त्यामुळे आता सुमार दर्जाची माणसे विद्यापीठातील अध्यापन व प्रशासकीय पदांवर आणण्यावाचून त्यांना पर्याय नाही.

विद्यार्थ्यांसाठी ही कंपूशाही म्हणजे त्यांचे बालकीकरण करण्याचा प्रयत्न ठरतो. प्रौढ नागरिकांना बालबुद्धी समजून सरकार वागते आहे. विशेष करून महिलांना शाळकरी मुले समजून त्यांच्याशी वागते आहे. त्या जोडीला अराजकीयीकरण केले जात आहे. विद्यापीठांमध्ये खुल्या चर्चा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य व विद्यार्थ्यांच्या निषेध आंदोलनांना वाव नाही. मतभेदाचे सूर दडपण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर केला जात आहे. उच्च शिक्षणाचे अप्रत्यक्ष खासगीकरण होत असताना शैक्षणिक संधींमध्ये असमानतेची बीजे पेरली जात आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन या सगळ्याच्या विरोधात आहे. ते उच्च शिक्षणातील नवीन व्यवस्था व गटातटांच्या निर्मितीला विरोध करीत आहेत. नोकरशाही व एकाधिकारशाही करणाऱ्या उच्च शिक्षण नियंत्रकांविरोधात त्यांचे बंड आहे. त्यांच्यावर लादली जाणारी विचारसरणी त्यांना पचनी पडायला तयार नाही. ते त्याबाबत गप्प बसू शकत नाहीत.

उच्च शिक्षण संस्थांतील ही निषेध आंदोलने काय दर्शवतात. यातून ठोस निष्कर्ष लगेच काढता येणार नाही. यातून लगेच काही अर्थ काढण्याचा मोह टाळला पाहिजे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे आतापर्यंत सध्याची राजवट युवकांना अंगठय़ाखाली दाबण्यात अपयशी ठरली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, गुवाहाटी विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ व हैदराबाद विद्यापीठात ज्या निवडणुका झाल्या, त्यातील निकाल तरी हेच सांगत आहेत. प्रत्येक विद्यापीठातील विजेते वेगवेगळे आहेत पण अखिल भारतीय परिषदेला सगळीकडे पराभव पत्करावा लागला. विद्यार्थिनींनी व वंचित गटातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणे हा योगायोग नाही. विद्यापीठांमधून सध्याची राजवट लादू पाहत असलेल्या विचारसरणीला प्रखर विरोध होतो आहे.

विद्यापीठांमधील या आंदोलनांनी देशाच्या राजकारणाला नवे स्वरूप मिळेल का, तर या प्रश्नाचे उत्तर या विद्यार्थी आंदोलनांना कुठल्या दिशेने नेले जाते यावर अवलंबून आहे. ही आंदोलने संघटनात्मक पातळीवर समन्वयाने चालू आहेत का, विद्यापीठाबाहेर तरुणांमध्ये असलेला असंतोष राजकीय पातळीवर विद्यापीठातील आंदोलनात प्रतिबिंबित होतो आहे का, असमान शिक्षण संधी, कमी झालेल्या रोजगार संधी हे प्रश्न त्यात आहेत का, यावर बरेच काही ठरणार आहे. यातून भारताची नवी दिशा दृग्गोचर होईल का हा प्रश्नही यात आहे.

हे सगळे मोठे प्रश्न आहेत, ते प्रश्न विचारण्यास भगतसिंग यांनीच आपल्याला शिकवले. जर आज ते हयात असते तर त्यांनी हे प्रश्न विचारले असते, बनारस हिंदू विद्यापीठातील मुलींनी पुकारलेल्या बंडाला त्यांनी पाठिंबा दिला असता याबाबत माझ्या मनात शंका नाही.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com