मित्रांनो, निवडणुकांचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पुन्हा एकदा निवडणूक पाहणी निकालांची बहारही त्या जोडीला सुरू झाली आहे. काळी जादूवाले, भविष्य वर्तवणारे, अंदाज वर्तवणारे यांना पुन्हा बरकतीचे दिवस आले आहेत. चहा, कॉफी व दारूच्या पेगवर निवडणूक चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.  माझाही पूर्वजन्म अशा निवडणूक अंदाज करणाऱ्यांचाच. त्या वेळी मी थापेबाजीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असे, खोटेपणा करून काही तरी वातावरणनिर्मिती करण्याचा खेळ करण्याचा मोह टाळत असे. त्यात मी किती यशस्वी झालो हे मला माहिती नाही; पण आज जेव्हा त्या खेळापासून दूर उभे राहून मी निवडणुकीच्या निकालांबाबत भविष्यवाणी व विश्लेषणे पाहतो तेव्हा मला राहून राहून हसू येते. दूरचित्रवाणी वाहिन्यांतील हे कथित लोक कुठलाही आधार नसताना एखादी छोटीशी गोष्ट असा मालमसाला लावून सांगतात व आभासी गूढ निर्माण करतात, की आपणही त्यांच्या मोहमायेत फसत जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातचेच उदाहरण घेऊ या. एक तर निवडणूक आयोगाने तेथील निवडणूक जाहीर करण्यास बराच वेळ घेतला. त्यामागे नेमके काय कारण होते याचे समाधानकारक स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही. ही सगळी फजिती झाल्यानंतर त्यांनी एकदाची निवडणुकीची घोषणा केली. हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणूक होणार आहे. कुठलीही विधानसभा निवडणूक लागली की, ती लोकसभेची रंगीत तालीमच असते तशी गुजरात व हिमाचलची निवडणूक ही लोकसभा निवडणुकांतील निकालांची नांदी आहे वगैरे वल्गना सुरू झाल्या आहेत. कुठलीही निवडणूक ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षाच असते तशी ती या निवडणुकांमध्येही आहे. नेहमीप्रमाणे निकालाचे एक गूढ या वेळी आहे. मी ज्यांना ज्यांना भेटतो तेव्हा सगळेच मला विचारतात की, तुम्ही तर निवडणूक अंदाजतज्ज्ञ आहात, मग गुजरातमध्ये काय निकाल लागेल ते सांगा. मग थेट हिंदुस्थानी शैलीत प्रश्नकर्ताच माझे तोंड उघडण्याची वाट न पाहता गुजरातमध्ये काय होईल यावर त्याचा ‘अंदाज अपना अपना’ सांगू लागतो.

गुजरातमध्ये काय होईल याबाबतचे गूढ तर मीही समजू शकतो, पण तेथून ज्या बातम्या येत आहेत त्यातून काही संकेत जरूर मिळत आहेत. पण निवडणूक अंदाजांचे आकडे वेगळेच काही तरी सांगत आहेत. एक सामान्य निरीक्षक व वाचक यांना हा गोरखधंदा उमगत नाही. त्यांना हे सगळे गूढ गहिरे वाटते, त्यात काही तरी कटकारस्थाने, डावपेच वाटतात. तसेही प्रसारमाध्यमांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या मोदी सरकारची प्रतिमा इतकी खराब आहे की, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या एखाद्या खऱ्या बातमीवरही आता विश्वास ठेवणे मुश्कील झाले आहे. निवडणूक आयोगानेही सरकारच्या पायाशी लोळण घेतल्याने आता ही शंका अधिक गडद होत चालली आहे.

गेल्या काही काळात गुजरातमधून ज्या बातम्या येत आहेत त्या भाजपसाठी उत्साहवर्धक निश्चितच नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या त्यांच्या उत्तराधिकारी आनंदीबेन पटेल राजकारण व प्रशासन या दोन्ही आघाडय़ांत फार यशस्वी झाल्या नाहीत. नंतर त्यांच्या जागी विजय रूपानी आले. त्यांनी भाजपवरचे संकट रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही फार चांगले काम दाखवता आले नाही. आरक्षण मागणीच्या निमित्ताने पटेल समाजाच्या संतापाचे गुजरातमधील भाजप सरकारला वेळोवेळी धनी व्हावे लागले. आरक्षणासाठी लाखोच्या सभा झाल्या, हिंसा झाली, हार्दिक पटेलच्या रूपाने एक अपरिचित, नवखा चेहरा सामोरा आला. दलित समाजाचा छळ झाल्याच्या घटना घडल्या, उना येथे दलितांना जी मारहाण झाली त्यातून दलितांचा नेता म्हणून जिग्नेश मेवानी पुढे आले. शेतकऱ्यांचा गुजरातमधील भाजप सरकारवरचा रागही काही नवा नाही. गेल्या तीन वर्षांत हा राग वाढलाच आहे. दोन वर्षांत दुष्काळ पडला, या वर्षी पूर आला. पिकांचे नुकसान झाले, पण भरपाई योग्य प्रकारे मिळाली नाही. जेव्हा पीक चांगले आले तेव्हा त्याला योग्य भाव मिळाला नाही. व्यापारीही जीएसटीमुळे भाजप सरकारवर नाराज आहेत. सूरतमध्ये त्याच मुद्दय़ावर भाजपविरोधात मोठे मेळावे झाले.

या सगळ्या घटनांची डोकेदुखी भाजप नेतृत्वाला असेल तर नवल नाही. ती दिसतेच आहे. निवडणूक आयोगावर दबाव टाकून गुजरात निवडणुकांची घोषणा वारंवार लांबणीवर टाकण्यात आली त्यात भाजपची ही डोकेदुखी हेच कारण होते. पंतप्रधान मोदी वारंवार गुजरात दौरे करू लागले. काश्मीर व पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करू लागले, त्यातून हीच चिंता डोकावत होती. गुजरात निवडणुकीआधी कुठली तरी दुर्घटना व्हावी व अचानक त्यातून दहशतवादी षड्यंत्र असल्याचा निष्कर्ष काढला जावा, असे काही घडले तरी आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. त्यानंतर सगळीकडे घबराट निर्माण होईल व त्याचा फायदा घेतला जाईल. गुजरातमधील मागच्या निवडणुकांमध्ये हेच घडले आहे. हे सगळे संकेत पाहूनच नेते व पत्रकार गुजरातमध्ये भाजपची नौका या वेळी बुडेल अशी भविष्यवाणी करतात.

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील निवडणूक निकाल अंदाजाबाबतच्या पाहण्या आपल्याला याच्या नेमके उलटे चित्र दाखवत आहेत. अडीच महिन्यांपूर्वी सीएसडीएसने एबीपी वाहिनीसाठी निवडणूक पाहणी केली आहे. माझ्या पूर्वजन्मी मी त्यांच्याच चमूतला एक होतो, पण आज माझा अशा भविष्यवाणी करणाऱ्या कुठल्याही संस्थेशी संबंध उरलेला नाही. तर या वेळी ऑगस्टच्या अंदाजानुसार भाजप काँग्रेसच्या खूप पुढे होती. त्यांच्यात तीस टक्के मतांचे मोठे अंतर होते. निवडणुकीच्या इतक्या आधी वर्तवलेल्या या अंदाजांचे काही खरे नाही. त्यात मतांची टक्केवारी जास्तच दिसत असते, अशी चर्चा नेहमीच होते; पण इतके मोठे ‘मतांतर’ दुर्लक्षता येणारे नव्हते. गेल्या दोन आठवडय़ांत काही वाहिन्यांनी विश्वासार्ह पाहण्या केल्या आहेत. त्यांच्या मते भाजपची आघाडी आता जास्त राहिली नाही, पण काँग्रेसपेक्षा त्यांना १० टक्के मतांची आघाडी आहे. ही दहा टक्क्यांची आघाडीच गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपला दोनतृतीयांश जागा मिळवून देत आली आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.

असा मतमतांतरांचा गलबला सुरू झाला, की मन शंकेने भरून जाते. वाहिन्या चर्चेचा आखाडा बनतात; पण या चर्चा मला अस्वस्थ करतात. मी गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये जाऊन आलो आहे. दूरवरून का होईना तिथली परिस्थिती पाहून आलो आहे. त्यामुळे भाजप हरेल व भाजप पुन्हा जिंकेल असे दोन्ही संकेत खरे वाटून मलाही गोंधळायला होते; पण यात शंका नाही की, गुजरातेत भाजप सरकारबाबत खूप नाराजी आहे. मला ज्या विश्वासार्ह वाटतात त्या पाहण्यांमध्ये भाजपलाच आघाडी दाखवण्यात आली आहे हेसुद्धा खरे आहे.

याचे कारण असे की, केवळ मतदारांची नाराजी हे कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या पराभवाचे कारण असत नाही. जेव्हा मतदारांपुढे सत्ताधारी पक्षाला तेवढाच भक्कम पर्याय समोर असतो तेव्हाच सरकारची निष्क्रियता व त्याविरोधातील असंतोष निवडणुकीतील पराभवास कारण ठरतो, पण हेही तितकेच खरे की, काही वेळा मतदारांचा राग एवढा टिपेला पोहोचलेला असतो की, मग विरोधी पक्ष कुठलाही असो ते त्याला मत देण्यास तयार होतात. उत्तर भारतात १९७७ मध्ये काँग्रेसविरोधी वादळात हे घडले होते. राज्य पातळीवरील निवडणुकांत मतदारांनी कुठल्याही परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना घरी पाठवल्याची किमया अनेकदा करून दाखवली आहे.

गुजरातकडे बघितले तर थकली भागलेली काँग्रेस हा काही भाजपला समर्थ पर्याय आहे असे वाटत नाही. काँग्रेसला तेथे कोणती दिशा तर नाहीच, पण भरोसा ठेवता येईल असा नेताही नाही. त्यातच शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला रामराम केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात नाराजी व राग असूनही काँग्रेस पक्ष बदलाचे प्रतीक ठरू शकत नाही अशी स्थिती आहे. गुजरातमध्ये मतदार भाजप सरकारवर नाराज आहेत की नाहीत हा प्रश्नच नाही. ते नाराजच आहेत, पण त्यांची नाराजी चेहरा नसलेल्या, दिशाहीन व संकल्पहीन काँग्रेसला निवडून देण्याच्या टोकाला गेली आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. गुजरातमध्ये जर नाराजीने एवढे टोक गाठले असेल तर त्यातून जे वादळ येईल त्यात भाजपला पायउतार व्हावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा पोटनिवडणुकांत भाजपला काही धक्के बसले, पण पराभव पत्करावा लागलेला नाही. याच दरम्यान पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपने काँग्रेसवर १० टक्के किंवा त्याहून थोडी अधिक मतांची आघाडी घेतली. काँग्रेसची भिस्त असलेला क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुसलमान यांच्या आघाडीचा भक्कम खांबही केव्हाच कलथून गेला आहे. सीएसडीएसच्या पाहणीचा विचार केला तर भाजप आता क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुसलमान या वर्गातही चंचुप्रवेश करीत आहे. राज्यात संघटन यंत्रणा, प्रसारमाध्यमांवर ताबा व धनशक्ती यात भाजपचा हात कुणी धरू शकत नाही.

खरे सांगायचे तर एके काळी पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीची जी मक्तेदारीची स्थिती होती ती गुजरातमध्ये भाजपची आहे. त्याआधी देशात काँग्रेसची मक्तेदारी होती. अशा परिस्थितीत एखाद्या पक्षाचा विजय ही बातमीच असू शकत नाही हे तर खरे, पण सत्ताधारी पक्ष जर त्या परिस्थितीत निवडणूक हरला तर तो मात्र भूकंप असतो हे विसरून चालणार नाही. केंद्र सरकार व मोदी यांच्या लोकप्रियतेची कथित अग्निपरीक्षा गुजरात निवडणुकीत होणार नाही. जर २०१९ च्या अंतिम फेरीची उपांत्य फेरी पाहायची असेल तर गुजरात निवडणुकीकडे मुळीच बघू नका. राजस्थान व मध्य प्रदेशची निवडणूक  होण्याची वाट पाहा. तोपर्यंत दूरचित्रवाणीवर जे काही सांगतात ते तूर्त खरे मानायला माझी काही हरकत नाही.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party vs bjp in gujarat legislative assembly election
First published on: 02-11-2017 at 02:24 IST