13 July 2020

News Flash

आमचा देश, आमची लोकशाही, आमचे मुद्दे!

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी त्यांचा उद्देश साध्य करण्यात यशस्वी झाले काय?

निवडणुकीमुळे विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र वापरून राजकीय प्रचार करण्यात आला

|| योगेंद्र यादव

इतर सर्व मुद्दे दडपले जाणे आणि फक्त दहशतवाद्यांनी तयार केलेल्या अजेंडय़ावर निवडणूक लढवली जाणे, हे दहशतवाद्यांनाच खूश करणारे आहे.. प्रत्यक्षात ही निवडणूक भारतीयांची, तिचे मुद्दे परक्यांनी आखलेले नकोत.. ते आमचेच हवे!

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी त्यांचा उद्देश साध्य करण्यात यशस्वी झाले काय? हल्ल्याच्या जवळपास एक महिन्यानंतरही आम्ही या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकत नाही. आमच्या हवाई दलाने तर या हल्ल्याचे चोख उत्तर दिले, पण आमचे नेते आणि जनता यांनीही दहशतवाद्यांची योजना अयशस्वी ठरवण्यायोग्य उत्तर दिले काय? देशात निवडणुकीच्या घोषणेनंतरही हा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा आहे.

जरा विचार करा, ज्या दहशतवाद्याने व त्याच्या पाकिस्तानी सूत्रधारांनी पुलवामा हल्ल्याची योजना आखली, त्यांचे हेतू काय असावेत? दहशतवाद्यांचे दोन हेतू असावेत असा अंदाज आपण करू शकतो. पहिले आणि तात्कालिक लक्ष्य तर हे असावे की या हल्ल्यात आमचे अनेक जवान शहीद होतील. त्यांनी असा विचार केला असावा की आम्ही चिडू, पण आमची सुरक्षा दले पाकिस्तानच्या आत जाऊन त्यांचे काही बिघडवू शकणार नाहीत. त्यांचा दुसरा आणि मोठा हेतू हा असावा की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असा हल्ला केल्यामुळे आमची लोकशाही रुळांवरून घसरेल. इतर सर्व मुद्दे दडपले जातील आणि फक्त दहशतवाद्यांनी तयार केलेल्या अजेंडय़ावर निवडणूक होईल. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर भांडण सुरू होईल. दहशतवाद्यांना जे हवे ते आम्ही होऊ दिले; तर ते यशस्वी होतील, नाही तर आम्ही यशस्वी होऊ.

आमच्या सैन्याने तर योग्य ते उत्तर दिले. आमच्या हवाई दलाने आपल्या प्रत्युत्तरातून दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला, की सीमेपलीकडून वार कराल तर आम्ही तिथेही पोहचून वार करू शकतो. अडीचशे दहशतवादी मेले की अडीचही मेले नाहीत, ही सारी चर्चा निर्थक आहे. अडीचशे ते तीनशे दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, असा दावा परराष्ट्र मंत्रालय, भूदल आणि वायुदल यांनी कधीही केलेला नाही. त्यांनी एवढेच म्हटले आहे, की त्यांना जी कामगिरी सोपवण्यात आली ती त्यांनी पूर्ण केली. भाजपच्या नेत्यांनी हा फालतू दावा करायला नको होता आणि विरोधी पक्षांनीही याचे पुरावे मागायला नको होते. वस्तुस्थिती अशी आहे, की आम्ही सीमेपलीकडे जाऊनही तुम्हाला धडा शिकवू शकतो; अणुबॉम्बच्या भेकड धमकीला आम्ही घाबरणार नाही, हे भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना दाखवून दिले.

पण आपले नेते व जनता यांनी दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले काय? दहशतवाद्यांना सणसणीत उत्तर तेव्हाच मिळू शकले असते, जर आम्ही या मुद्दय़ावर राष्ट्रीय सहमती साधली असती आणि दाखवून दिले असते की एखादा बॉम्ब आमच्या एकतेत फूट पाडू शकत नाही, आमच्या निवडणुकांची गाडी रुळांवरून घसरवू शकत नाही. यात पहिली जबाबदारी आमच्या पंतप्रधानांची होती. त्यांनी हे दाखवून द्यायला हवे होते, की या मुद्दय़ावर ते संपूर्ण देशाचे नेते आहेत, केवळ भाजपचे नाहीत. सैनिक कारवाईच्या यशाचे श्रेय त्यांनी सैन्य आणि संपूर्ण देशाला द्यायला हवे होते. या प्रसंगी आपल्या डोक्यावर विजयाचा मुकुट घालून आणि यापूर्वीच्या सरकारवर हल्ला चढवून मोदी यांनी त्याच खेळाची सुरुवात केली, जो दहशतवाद्यांना हवा होता. उत्तरात विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पंतप्रधानांवर आरोप केले आणि सरकारला असे प्रश्न विचारले जे या प्रसंगी आवश्यक नव्हते. सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याऐवजी भाजपने असा फासा टाकला की ज्यात विरोधी पक्षांनी पाय घालावा आणि त्यांना देशद्रोही म्हटले जावे. देशांतर्गत राजकीय विरोधकांनाच देशद्रोही ठरवण्याचा हा खेळ बघून दहशतवादी नक्कीच खूश झाले असतील.

दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानी सूत्रधार या गोष्टीमुळे आणखी खूश झाले असतील की, आता आमची संपूर्ण निवडणूक त्यांनीच ठरवलेल्या प्रश्नांवर लढवण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच भाजपने पुलवामाच्या हौतात्म्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे खासदार शहिदांच्या अंत्ययात्रेत असे चालत होते की, जणू एखादा रोड शो सुरू आहे. बालाकोटच्या कारवाईच्या दिवशी पंतप्रधानांनी शहिदांची छायाचित्रे पडद्यावर लावून निवडणुकीचे भाषण दिले. भाजपचे खासदार मनोज तिवारी हे सैनिकांचा नकली गणवेश घालून प्रचार करत होते. गेल्या आठवडय़ापर्यंत देशात भाजपचे जे पोस्टर आणि होर्डिग लागले होते, त्यावर सैन्य, हवाई हल्ला, इतकेच नव्हे तर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र लावून पक्षाचा राजकीय प्रचार करण्यात आला. हवाई दलाच्या हल्ल्यामुळे भाजपच्या अमुक इतक्या जागा कर्नाटकात वाढतील, असे पक्षाचे तेथील नेते येडियुरप्पा म्हणाले. तिकडे सैनिकांचे रक्त वाहत होते, तर इकडे नेत्यांच्या तोंडातून लाळ वाहत होती. कुणी खरा राष्ट्रवादी असेल तर त्याची खरी कसोटी हीच असू शकते की, तो राष्ट्रहितासाठी आपल्या स्वार्थाचा- आपल्या राजकीय हिताचा- त्याग करण्यास तयार आहे की नाही. असे न झाल्यास हा राष्ट्राच्या सुरक्षेचा नव्हे, खुर्चीच्या सुरक्षेचा खेळ असेल. आजही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष मिळून हे ठरवू शकतात, की सैन्य आणि सुरक्षा दलांना निवडणुकीतील वादविवादाचा मुद्दा बनवले जाणार नाही; निवडणुकीत कुठलाही पक्ष किंवा नेता सैनिक कारवाईचे श्रेय घेणार नाही, तसेच परिस्थिती सामान्य होईपर्यंत कुठलाही पक्ष सैनिक कारवाईवर टीका किंवा दोषारोपण करणार नाही. पण अशी अपेक्षा करणे अनाठायी आहे. कटू सत्य हेच आहे, की नेता व पक्ष या कसोटीच्या प्रसंगी अनुत्तीर्ण झाले आहेत.

आता आशा करायची झाली, तर ती जनतेकडून करायला हवी. कुणी तुमचे मत मागायला आले, तर त्याला एवढेच सांगावे की थेट मुद्दय़ावर या- ‘तुम्ही काय केले आहे आणि पुढे काय करणार आहात?’ त्यांना विचारावे रोजगाराबद्दल, महागाईबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल, विचारा वीज- रस्ते- पाणी यांबद्दल, रुग्णालय आणि शिधावितरण दुकानांबद्दल विचारावे. जे सरकारमध्ये आहेत त्यांना विचारा की पुढच्या पाच वर्षांत तुम्ही काय कराल, याची हमी द्या. आणि कुणी शहीद सैनिकांची प्रतिमा दाखवून, त्यांची शौर्यकथा ऐकवून आणि सैन्याचा गणवेश घालून मत मागेल, तर त्याला थेट विचारावे- तुम्ही युद्ध लढताहात की निवडणूक लढताहात.. की युद्धाच्या आडून निवडणूक लढताहात?

दहशतवादाच्या विरोधात युद्ध लढायचे असेल तर संपूर्ण देश एक आहे. येथे भाजप नाही, की काँग्रेस नाही; सारा देश ‘भारत’ या एकाच बाजूचा आहे. मात्र निवडणूक लढायची असेल, तर निवडणुकीसारखी लढा. प्रत्येक गोष्टीचे उत्तर द्यावे लागेल आणि केलेल्या कृत्याचा हिशेब द्यावा लागेल. पण युद्धाच्या आडून निवडणूक लढायची असेल, शहिदांची ढाल करून सत्तेसाठी मत मागायचे असेल, तर मी तुमच्यासोबत नाही. शहिदांची तिरडी आणि जवानांच्या रक्ताच्या आधारे मत मागणे देशभक्ती नाही, तर देशद्रोह आहे.

दहशतवाद्यांना सगळ्यात कणखर उत्तर हेच आहे : देश माझा, मत माझे, मुद्देही माझे.

yyopinion@gmail.com

लेखक स्वराज अभियानाचे प्रमुख आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2019 12:08 am

Web Title: elections 2019 in india
Next Stories
1 राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकीयीकरणाचे धोके..
2 हा ‘सन्मान’ की अपमान?
3 पालट होणार की पर्याय मिळणार?
Just Now!
X