23 November 2017

News Flash

लपू नका, आत्मपरीक्षण करा!

भाजपच्या मते २००९ मध्ये मतदान यंत्रात घोटाळा होता

योगेंद्र यादव | Updated: May 18, 2017 3:42 AM

गेली काही वष्रे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे समर्थक व विरोधक यांच्यात एक निर्थक चर्चा सुरू आहे ती म्हणजे या यंत्रात घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जातात. मतदान यंत्रावर सगळे खापर फोडण्याच्या कोत्या मनोवृत्तीच्या खेळात आपण लोकशाहीला किती नुकसान पोहोचवत आहोत याचा विचार पहिल्यांदा भाजपने व हल्ली विरोधकांनी केलाच नसेल. २०१४ मधील निवडणुकांच्या आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे असतानाही आम्ही निवडणुका जिंकलो होतो हे काँग्रेस व समाजवादी पक्ष आता सांगत नाहीत. आम आदमी पक्षाचा हिशेब सोपा आहे, जेव्हा ते निवडणूक जिंकतात तेव्हा त्यांच्या मते निवडणूक आयोग व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सगळे ठीक असते व जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा मात्र मतदान यंत्रात त्यांना गडबड वाटू लागते. भाजपच्या मते २००९ मध्ये मतदान यंत्रात घोटाळा होता, पण आता त्यांच्या मते यंत्रे सुधारली आहेत. ‘निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे’ असा मुद्दा भाजप आता मांडत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ‘जेम्स मायकेल िलगदोह’ यांचा संपूर्ण नामोल्लेख करून त्यांच्यावर दोषारोप करणारे पहिले राजकीय नेते नरेंद्र मोदीच होते, ही गोष्ट टीव्हीचे वृत्तनिवेदक तर विसरून गेले आहेत.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत जी चर्चा चालू आहे ती अशासाठी अर्थहीन आहे की, सगळेच पक्ष दुतोंडी आहेत. दोन्ही बाजूचे लोक चुकीच्या प्रश्नांवर चर्चा करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात हेराफेरी करता येते की नाही हा खरा चच्रेचा मुद्दा आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे समर्थक सांगतात त्यानुसार, या यंत्रात फेरफार किंवा कुठले बदल करता येत नाहीत किंबहुना तसे शक्य नाही. याच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रविरोधी लोक असे सांगतात की, मतदान यंत्रे दोषरहित नाहीत, त्यात काही फेरफार करून निवडणूक निकाल हवा तसा घडवून आणणे मुळीच अशक्य नाही. या प्रश्नाचे सरळ साधे उत्तर असे की, जगात कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन वा यंत्र असे नाही की, ज्यात फेरफार किंवा बदल करता येत नाहीत. मी कुणी अभियंता नाही पण मला एवढे जरूर समजते की, चिप किंवा मदरबोर्ड बदलून कुठल्याही यंत्रात काहीही करता येऊ शकते. आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअरच्या मदतीने अगदी बारीक बदलही त्यात करता येतात. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात हेराफेरी किंवा हवे तसे बदल करणे अशक्य नाही हे खरे सत्य आहे, पण आपल्या निवडणूक यंत्रणेत तशी शक्यता जवळपास अशक्य आहे. सद्धांतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या गुणदोषांची चर्चा होण्यात गर काही नाही पण त्याचा अतिरेक होतो आहे. मोबाइल फोनची शेकडो ‘मॉडेल’ असतात तशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रेही वेगवेगळ्या प्रकारची असतात. दुसऱ्या देशात कुठल्या यंत्राच्या बाबतीत कुणाचा काय अनुभव आहे याची चर्चा आपल्यासाठी फायद्याची नाही. प्रश्न असा आहे की, आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफारांची शक्यता किती आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे अगदी मूलभूत प्रारूप (मॉडेल) आपल्याकडे वापरले जाते. त्यात इंटरनेट किंवा मोबाइलचा कुठलाच संदेश वापरला जात नाही किंवा येत नाही. त्यामुळे यंत्राचे सॉफ्टवेअर म्हणजे आज्ञावली बदलल्याशिवाय त्यात बदल करणे अवघड आहे. कारखान्यातच यंत्राच्या चिपमध्ये फेरफार किंवा बदल करणे कुठल्या पक्षाच्या फायद्याचे नाही कारण यंत्र चिन्हे किंवा पक्षाचे नाव ओळखत नाही. यंत्र केवळ उमेदवार ओळखते. निवडणुकीच्या दोन आठवडे आधीही कुठल्या मतदारसंघात कुठल्या पक्षाचा कुठला उमेदवार असेल व इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेत तो कितव्या क्रमांकावर असेल हे सांगता येत नाही. जर सर्व यंत्रांमध्ये एक क्रमांकाच्या उमेदवाराबाबत काही फेरफार केलाच, तर वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना फायदा होईल. उमेदवारांच्या घोषणेनंतर यंत्रात फेरफार अवघड आहे, कारण निवडणूक आयोग मतदानाच्या तीन-चार दिवस आधीही कुठले यंत्र कुठल्या मतदारसंघातील कुठल्या भागात जाईल हे सांगत नसते. मतदान सुरू होण्याच्या आधी सकाळच्या वेळी प्रत्येक पक्षाच्या मतदान केंद्र प्रतिनिधीला यंत्राचे बटन दाबून त्याची तपासणी करण्याची संधी दिलेली असते. आम आदमी पक्षाने याशिवाय मतदान यंत्रात घोटाळा करण्याची आणखी एक शक्यता सांगितली आहे. त्यानुसार निवडणुकीच्या आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा मदरबोर्ड बदलला तर सकाळी तपासणी झाल्यानंतर कुणी मतदार एखादा सांकेतिक क्रमांक दाबून हेराफेरी सुरू करू शकतो. हे अशक्य नाही पण अशी हेराफेरी किंवा घोटाळा करण्यासाठी काय काय करावे लागेल याचा विचार करा. दिल्ली महापालिकेसारख्या अगदी छोटय़ा निवडणुकीतही किमान पंधरा हजार मतदान यंत्रे उघडून त्याचे सुटे भाग बदलावे लागतील, मग हजारो मतदान केंद्रांवर किमान एका व्यक्तीने जाऊन त्यात त्यांना हवा तो संकेतांक टाकावा लागेल. आपल्यासारख्या देशात कुणी असा दीघरेद्योग केला आणि कुणीच त्याचे पितळ उघडे पाडले नाही असे होण्याची शक्यता मला कमी वाटते. हजारो लोकांत कुणीच बोलणार नाही किंवा एकाही मतदान केंद्रावरची ही लबाडी पकडली जाणार नाही हेही जरा अवघडच. यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात हेराफेरी किंवा घोटाळे करणे शक्य आहे की नाही, या सैद्धांतिक प्रश्नावर चर्चा बंद करावी. आपण त्यापेक्षा निवडणुकीत असा घोटाळा झाला आहे की नाही यावर चर्चा करावी. त्यावरही समाधान झाले नाही तर असे काही होत असल्यास ती शक्यता नष्ट करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा. पहिल्या प्रश्नावर सध्या तरी कुठल्याही राजकीय पक्षाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात हेराफेरी करता येते की नाही याचे पुरावे दिलेले नाहीत. मुंबईत एका उमेदवाराने त्याला त्याच्याच केंद्रावर एकही मत न मिळाल्याची तक्रार केली. मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात गडबड करण्यात आल्याचे आरोप माध्यमांच्या चौकशीत खोटे सिद्ध झाले. आताच्या निवडणुकांत घोटाळ्याची तक्रार निवडणूक निकालानंतर आली. निवडणुकीच्या दिवशी राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधींनी इलेक्ट्रॉनिक यंत्रे तपासली तेव्हा त्यांची कुठलीच तक्रार नव्हती, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जर उत्तर प्रदेश निवडणुकीत घोटाळा झाला असता तर जेथे ‘मत-पावती’सह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (व्हीव्हीपीटी- व्होटर व्हेरिफाइड पेपर ट्रेल) वापरली गेली निदान तेथील निवडणूक निकाल वेगळे असायला हवे होते! पण तसे झालेले नाही. दिल्ली महापालिका निवडणुकीत असे कुठलेच पुरावे मिळालेले नाहीत. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या  दोघांनी दिलेच आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात अगदी काही प्रमाणात जरी हेराफेरीची शक्यता असेल तर ती नष्ट करण्यासाठी मतदान चिठ्ठी असलेली व्हीव्हीपीटी यंत्रे वापरावीत यावर कुणाचेच दुमत नाही. नवीन यंत्रासाठी पुरेसा पैसा यूपीए किंवा आताच्या भाजप सरकारने दिला नव्हता.

या चर्चेचा एक फायदा मात्र जरूर झाला आहे की, आता सगळ्या निवडणुका मत-पावती (व्हीव्हीपीटी) वापरून होतील त्यामुळे निदान आता तरी मतदान यंत्रातील घोटाळ्यांच्या शक्यतेची निर्थक चर्चा बंद होईल अशी आशा आहे. दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही – स्वराज पार्टीनेही- लढवली होती, आम्ही एकही जागा जिंकली नाही. अपेक्षेपेक्षा मतेही खूप कमी मिळाली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांनीच दगा दिला असे आमच्या उमेदवारांनाही वाटत होते, पण आम्ही पराभवाचे खापर यंत्रांवर फोडले नाही, पराभवाची कारणमीमांसा करताना या यंत्रांमागे लपलो नाही तर आत्मपरीक्षणाचा मार्ग निवडला. बाकीचे राजकीय पक्षही असेच काही करतील ही माफक अपेक्षा.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

 

 

First Published on May 18, 2017 3:42 am

Web Title: electronic voting machines marathi articles narendra modi