X

ही तर केवळ झलक!

शेतकऱ्यांची आजची जी दशा आहे, त्याचे खरे रूप तामिळनाडूचा शेतकरी नेता अय्याकन्नू याने मांडले.

दिल्लीच्या जंतरमंतरवर आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील शेतक ऱ्यांच्या वेदनांची जणू महायात्राच चालली होती. शेतकरी आंदोलनाचा नवा संकल्प व नवे रूप त्यातून साकार झाले. दु:ख, आक्रोश व नैराश्याच्या सागरात कधी बुडत, कधी तरंगत मी एक छोटीशी आशा त्यातही शोधत होतो. जंतरमंतरवरील शेतकरी आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात ती आशा सतत माझ्या मनात डोकावत होती. मनाला हिरवी पालवी फुटत होती.

शेतकऱ्यांची आजची जी दशा आहे, त्याचे खरे रूप तामिळनाडूचा शेतकरी नेता अय्याकन्नू याने मांडले. त्याची तुलना कुणाशीच होऊ शकणार नाही, इतक्या जिवंतपणे त्याने शेतक ऱ्यांची वेदना समाजासमोर मांडली. गेली १४० वर्षे तामिळनाडूत कधी पडला नव्हता एवढा दुष्काळ यंदा पडला होता. त्यामुळे सरकारला तेथील शेतक ऱ्यांच्या व्यथेची जाणीव करून देण्यासाठी अय्याकन्नू तीन महिने आधीच काही शेतक ऱ्यांना घेऊन दिल्लीत आला होता. त्याने आपल्याबरोबर मृत शेतक ऱ्यांच्या कवटय़ा व हाडे आणली होती, त्याने त्या कवटय़ा सर्वाना दाखवल्या. वस्त्रहीन अवस्थेत हे शेतकरी होते, त्यांनी डोक्याचे मुंडन केले, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाना युक्त्या वापरल्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी अय्याकन्नूला शेतक ऱ्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले खरे पण नंतर जेव्हा हे शेतकरी राज्यात परत गेले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच केले नाही. मग हे शेतकरी पंतप्रधानांच्या घराजवळ येऊन थडकले. त्यांनी तेथे आंदोलन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक मार्ग वापरले. आज जेव्हा मी अय्याकन्नूकडे बघत होतो तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की एवढा सगळा आकांत मांडणाऱ्या या शेतक ऱ्यांची व्यथा सरकार अखेर ऐकून घेणार की नाही? तेवढय़ात आम्हाला तेथे एक बातमी कळली ती शेतक ऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी होती. ती बातमी अशी, की तामिळनाडूच्या आमदारांचे वेतन भत्ते दुप्पट करण्याचा आदेश तेथील सरकारने जारी केला होता. खरोखर हा देश धन्य आहे असे म्हणावे नाही तर काय.. ज्या शेतक ऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आपल्या पोळीवर तूप ओढण्यातच मशगूल आहेत.

याच वेळी आमच्या आंदोलनात उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक शेतकरी आले होते. त्यांनी बटाटय़ाचे विक्रमी उत्पादन करून दाखवले, पण परिणाम काय तर बटाटय़ाचे बाजारभाव कोसळले. चांगला भाव मिळेल या आशेने शेतक ऱ्यांनी बटाटे शीतकपाटांमध्ये साठवले. आता तर बटाटय़ाचे भाव एवढे पडले आहेत, की बटाटे टिकवण्यासाठी शीतकरण व्यवस्था करणाऱ्यांना द्यायला शेतक ऱ्यांकडे पैसे नाहीत. आग्रा, इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद यांसारख्या जिल्ह्य़ांतून शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आमचे आंदोलन सुरू असताना येतच होत्या. शेतकरी बटाटे रस्त्यावर फेकून देत होते. उत्तर प्रदेश सरकारने बटाटे खरेदी करण्याची योजना तर आखली पण शेतक ऱ्यांनी पिकवलेल्या बटाटय़ांपैकी एका टक्काही बटाटे खरेदी केले नाहीत. परिस्थिती अशी आहे, की पाणी शेतक ऱ्यांच्या नाकातोंडात जाऊ लागले आहे, उत्तर प्रदेशची जी कथा आहे तीच तेलंगणच्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची आहे. कांदा उत्पादकांचीही तीच स्थिती आहे.

जंतरमंतरवर आमचे जे आंदोलन झाले, त्यात महाराष्ट्रातून आलेल्या मुलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक जिल्ह्य़ातील आधारतीर्थ आश्रमातल्या मुलांशी माझी गाठभेट खरे तर किसान यात्रेच्या वेळी आधीच झाली होती. या आश्रमात ज्या शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचीच मुले राहतात. या मुलांनी तेथे छोटी नाटिको सादर करून शेतक ऱ्यांची वेदना जिवंत करण्याचा प्रयत्न केला. ‘विष खाऊ नका’ हे गीत त्यांनी सादर केले ते ऐकताना मलाही आतून हलल्यासारखे झाले. पुरेशी समजही न आलेली ती चिमुरडी मुले आपल्या शेतकरी माता-पित्यांची वेदना समजू शकत होती, पण आपले सरकार मात्र त्यातले काहीही समजू शकत नाही, ही एक शोकांतिका आहे. ती मुले बोलली काहीच नाहीत. त्यांना तसे करण्याची गरजही नव्हती, एवढी प्रभावी अभिव्यक्ती त्यांच्याकडे होती, हे वेगळे सांगायला नको. त्यांचे तिथले अस्तित्वच आपल्या देशातील शेतक ऱ्यांची व्यथा-वेदना मांडत होते. नकळत माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. जंतरमंतरवर मी देशाचे भवितव्य माझ्या डोळ्यांनी पाहत होतो.

कधी माझी दृष्टी मंचावर धावत होती तर कधी ती समोर गर्दी केलेल्या शेतक ऱ्यांच्या डोळ्यातील भाव टिपत होती. खच्चून भरलेल्या मंचावर नव्या-जुन्या पिढीतील शेतकरी नेत्यांचा संगम होता. त्यात महेंद्रसिंग टिकैत, शरद जोशी, ननजुन्दास्वामी यांच्यासारख्या शेतक ऱ्यांच्या झुंजार नेत्यांबरोबर काम केलेले शेतकरी नेते होते. नव्या पिढीतील काही राजकीय प्रतिनिधीही होते. शेतकरी नेत्यांबरोबरच शेतमजूर, आदिवासींचे नेतेही व्यासपीठावर होते. महिलांची संख्या कमी होती पण पूर्वीच्या शेतकरी आंदोलनांपेक्षा नक्कीच जास्त होती. शेतकरी व शेतमजूर एकतेच्या घोषणा देत होते, त्यामुळे मंच दणाणला होता. दलित आदिवासी शेतक ऱ्यांचे प्रश्नही हिरिरीने मांडले जात होते. बँकांच्या कर्जाबरोबरच सावकारी पाशातून मुक्तीची हाक दिली जात होती. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा ही मागणी केवळ स्वामिनाथन आयोगाने दिलेल्या शिफारशींपुरती मर्यादित राहिली नव्हती, या आंदोलनात त्याची सविस्तर व वैविध्यपूर्ण मांडणी केली गेली. सरकार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव कसा देऊ शकते हे अन्नदाते शेतकरीच सांगत होते. अनेकदा शेतमालाची खरेदी होत नाही त्या वेळी सरकारने भरपाई द्यावी, असेही त्यांचे गाऱ्हाणे होते. शेतक ऱ्यांनाही आता सरकारची फसवी भाषा समजू लागली आहे, आता ते केवळ घोषणाबाजीला भुलत नाहीत, त्यांना धोरणात बदल हवा आहे. शेतक ऱ्यांना आलेली ही समज पाहून मला खरेतर मनातून आनंद झाला.

समोर बसलेल्या शेतक ऱ्यांमध्ये एक बदलाची झलक दिसत होती. पंजाबमधील जाट शेतकरी तर त्यात होतेच शिवाय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून आदिवासी शेतकरीही आले होते, पण ते येताना अनेक मुद्दय़ांचे गाठोडे घेऊन आले होते. त्यात भूअधिकार, भूमी अधिग्रहण व वनउत्पादने अशा अनेक समस्या अजूनही त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. हिरवी टोपी व हिरव्या झेंडय़ाबरोबरच लाल झेंडेही फडकत होते. जंतरमंतरवर दलित आंदोलनाचे निळे झेंडे तर दिसत नव्हते पण गेल्या आठवडय़ात मेहसाणात आम्ही गेलो होतो, तेव्हा हिरवे व निळे झेंडे एकमेकांची साथ करत फडकत होते. या शेतकरी आंदोलनात काही महिला खासदार उपस्थित होत्या, ते पाहून मला जास्त समाधान वाटले. शेतीत सत्तर टक्के मेहनत स्त्रियाच करीत असतात. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व यात महत्त्वाचे होते. एरवी शेतकरी आंदोलनात महिला क्वचित दिसतात, पण आमच्या आंदोलनात राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या विविध राज्यांतून आलेल्या शेतकरी महिला सगळे लक्षपूर्वक ऐकत होत्या. घोषणाच्या ललकारीत निर्धाराने उंचावलेल्या मुठींमध्ये त्यांच्या हातातील बांगडय़ाही चमकत होत्या. या वज्रमुठी आता कुणी वाकवू शकणार नाही, शेतकरी आता मागे हटणार नाहीत.

आमचे हे आंदोलन पावसाळ्यात चालू होते, पण  दिल्लीत निदान या वेळी तरी पाऊस आला नाही पण उकाडा खूप होता. त्यामुळे सगळ्यांचीच तगमग होत होती. घोषणा देऊन सगळ्यांचेच घसे कोरडे पडले होते. पण त्या वातावरणातही एक जादूभरा उत्साह होता. त्यामुळे चित्त सुखावून गेले. ध्वनिवर्धकावर मला माझ्याच आवाजाचे प्रतिध्वनी ऐकू येत होते. मी सांगत होतो.. ही फक्त झलक आहे. पूर्ण चित्रपट सरकारला दाखवण्यासाठी आम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहोत.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com