कटू सत्य सांगणाऱ्याला इतरांकडून बरेच काही ऐकून घ्यावे लागते, कारण असे सत्य हे नेहमीच दाहक असते. कटू सत्य जितके सखोल तितके त्रासदायकही असते. त्यामुळे नको असलेले काही वाचण्या किंवा ऐकण्यापेक्षा ते ऐकवणाराच लोकांना नको असतो. माजी मंत्री जयराम रमेश यांच्या बाबतीत असेच काहीसे होते आहे असे मला वाटते. आजच्या काळात काँग्रेस पक्षासमोर अस्तित्वाचे संकट आहे हे कटू सत्य सांगितले हा रमेश यांचा जणू अपराधच, काँग्रेसपुढचे संकट हे केवळ निवडणुकीतील पराभवाचे नाही, कारण पराभवाची संकटे तर काँग्रेसने १९७७, १९८९ व १९९८ अशी तीनदा झेलली होती. पण आज काँग्रेस समोरचे संकट गहिरे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाची सल्तनत गेली, पण सुलतानी दृष्टिकोन मात्र गेला नाही, असे जयराम रमेश यांनी एका मुलाखतीत सांगितले. आता त्यांनी जे सांगितले ते कुणालाच माहिती नाही असे थोडेच आहे? प्रत्येक नेता, काँग्रेसचा कार्यकर्ता, त्यांनी जे निरीक्षण मांडले तेच भले वेगळ्या शब्दात सांगेल. पण जयराम रमेश यांचा अपराध एकच आहे, की जे बंद खोलीत बोलायचे ते त्यांनी जाहीरपणे सांगितले. ते बोलले ते कटू सत्य होते त्यामुळे ते सर्वानाच बोचले. काँग्रेसचे लहान-थोर नेते आता जयराम रमेश यांच्यावर तुटून पडले आहेत. काहींनी जयराम रमेशच सुल्तान आहेत, असे सांगून टाकले तर काहींनी रमेश यांना मागच्या दाराने काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश मिळाला. त्यामुळे त्यांना आता या गोष्टी बोलण्याची उपरती होत आहे असाही आरोप केला. काहींनी त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली, पण ते जे बोलले ते खोटे आहे असे कुणीच म्हटले नाही. यात जयराम रमेश हा खरा प्रश्नच नाही, कारण त्यांनी जे वक्तव्य केले त्यावरून उठलेले वादळ काँग्रेसी खाक्याने दडपून टाकले जाईल व पुन्हा अशा मुद्दय़ांवर चर्चा करण्याची कुणी हिंमत करणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली जाईल, कारण काँग्रेसचा तो इतिहास आहे.

जयराम रमेश यांनी जे प्रश्न केले त्याचा सामना न करता ते दडपून टाकण्याचा खटाटोप काँग्रेस करील, पण त्यांनी विचारलेले प्रश्न देश तर टाळू शकत नाही. देशाच्या पुढील वाटचालीत, भवितव्यात काँग्रेसची भूमिका काय हा खरा प्रश्न आहे. आज ना उद्या काँग्रेस देशात एक समर्थ राजकीय पर्याय ठरू शकेल का? देश ज्या मूल्यांच्या पायावर उभा आहे त्यावरच हल्ले होत असताना ते रोखण्यासाठी काँग्रेस महत्त्वाची भूमिका पार पाडणार का?  हे प्रश्न काँग्रेसपुरते मर्यादित नाहीत, तर देशाच्या भवितव्याचा प्रश्न त्याच्याशी निगडित आहे.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी आपण काही गैरसमजांतून मुक्त होण्याची गरज आहे. काँग्रेसची समस्या केवळ नेतृत्वाशी निगडित आहे असे अनेक लोकांना वाटते. दबक्या आवाजात राहुल गांधी यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांची काँग्रेसमध्ये कमी नाही. समाजमाध्यमांची मुशाफिरी केलीत तर काँग्रेसच्या सगळ्या समस्यांना राहुल गांधीच कारण आहेत असे वाटेल यात शंका नाही, पण असा विचार आपली वैचारिक अपूर्णता दाखवतो असे मला वाटते. प्रसारमाध्यमे राहुल गांधी यांची जी प्रतिमा निर्माण करीत आहेत तेवढे ते भोंदू किंवा नीतिभ्रष्ट नाहीत. काँग्रेसला ज्याची नितांत आवश्यकता आहे ती राजकीय समज राहुल गांधी यांना नाही हे मात्र खरे आहे, पण काँग्रेससारख्या पक्षावर राहुल गांधी यांचे वर्चस्व आहे, ही खरी समस्या आहे असे मला वाटत नाही. राहुल गांधी यांच्यासारखा नेता आजच्या काँग्रेसवर वर्चस्व गाजवू शकतो अशी परिस्थिती त्या पक्षात आहे हे मोठे संकट आहे. वैचारिक बैठक असलेली व्यक्ती या पक्षाचा प्रमुख बनू शकत नाही यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राहुल गांधी हे संकट नाहीत तर त्याचे प्रतिबिंब आहेत. आजच्या परिस्थितीत काँग्रेसवर संकटांचे ढगच ढग आहेत. शीर्षस्थ नेत्यापासून गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेस पक्षात कुठलाच संकल्प, निर्धार दिसत नाही. आज भाजपत काहीही असो नसो, सत्तेची भूक तर अनावर आहे. काँग्रेसने सत्तेची फळे चाखलेली आहेत, त्यांना सत्तेची लालसा आहे पण ती मिळवण्यासाठी जिवापाड मेहनत करण्याची त्यांची तयारी नाही.

काँग्रेसचे संकट हे दूरदृष्टीच्या अभावाचे आहे. कुठल्या मुद्दय़ावर काय भूमिका आहे किंवा घ्यावी हे काँग्रेसवाल्यांना माहिती नाही. मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी कृत्यांना विरोध करणे सोपे आहे, पण आणीबाणी लादणारा, तिचे गुणगान करणारा व गांधी परिवाराशी सतत बांधला गेलेला काँग्रेस पक्ष लोकशाहीचे खरेच रक्षण करू शकतो का, याबाबत शंका आहेत. नोटाबंदी, जीएसटीवर भाजपच्या धोरणांना विरोध करणे ठीक आहे, पण त्याला पर्यायी कुठली धोरणे काँग्रेसकडे आहेत का? डॉ. मनमोहन सिंग नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांचा मूलाधार असलेल्या आर्थिक विचारातून काँग्रेस बाहेर पडण्यास तयार आहे का, असे अनेक प्रश्न यात उपस्थित होतात.

आज भाजप व काँग्रेस यांच्यात एकच फरक राहिला आहे असे मला वाटते. भाजप खुलेआम मुस्लीमविरोधी आहे, सर्व अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेष पेरण्याचे काम करीत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मानसिकता यापेक्षा वेगळी नाही, पण काँग्रेसचे नेते अल्पसंख्याकांची बाजू घेतात व आपण धर्मनिरपेक्ष आहोत असा लटका आव आणतात हा दुटप्पीपणा आहे. काँग्रेसच्या या धर्मनिरपेक्षतेत वैचारिक आग्रहापेक्षा अल्पसंख्याकांच्या मतांचा जोगवा मिळवण्याची लाचारी अधिक आहे. काँग्रेसची अडचण दुहेरी आहे; एकतर त्यांना धर्मनिरपेक्ष भारतासाठी पाठिंबा मिळवता येत नाही व दुसरीकडे अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावनाही निर्माण करता येत नाही. धर्मनिरपेक्ष भारताचा विचार करण्याऐवजी काँग्रेस आता त्या विचारालाच बदनाम करण्यास कारण ठरत आहे. जेथे दूरदृष्टी नाही तेथे दिशाहीनता ठरलेली असते, तसे काँग्रेसचे झाले आहे.  बिहारमधील आघाडीचा प्रश्न असो, २०१९ मधील निवडणुका असोत, काँग्रेसकडे आता कुठलेच धोरण किंवा डावपेच उरलेले नाहीत. गुजरातमध्ये आपल्याच दरबारी नेत्यासाठी (अहमद पटेल) पक्षाच्या आमदारांची मते पदरात पाडून घेऊन त्याचा विजय सुनिश्चित करणे ही आता त्या पक्षासाठी एक मोठी कामगिरी बनली आहे.

भाजपला सत्तेत राहण्याची हमी काँग्रेसनेच त्यांच्या नसलेल्या ध्येयधोरणातून दिली आहे. आता काँग्रेस भाजपला पर्याय देऊ शकत नाही व कुठला दुसरा पर्याय सामोरा येत असेल तर त्यातही काँग्रेस अडथळे आणत आहे. देशात आज शेतकरी, युवक, दलित, आदिवासी, विद्यार्थी यांची आंदोलने होत आहेत. काँग्रेस या आंदोलनांना राजकीय दिशा देण्यात असमर्थ आहेच, शिवाय त्यातून एक नवे पर्यायी राजकारण उदयास येत असेल तर त्यातही अडसर ठरत आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा भले काँग्रेसमुक्त भारताच्या बाता मारत असले तरी भारत काँग्रेसमुक्त व्हावा असे त्यांनाही मनातून वाटत नसेल हे सत्य आहे. त्यांना प्राणच गेलेली, मृतावस्थेतील काँग्रेस तशीच पडून राहावी असे वाटत असावे, कारण त्यामुळे भाजपला समर्थ असा पर्याय निर्माणच होणार नाही याची त्यांना खात्री आहे.

अशा जर्जर अवस्थेतील काँग्रेसला एकच सल्ला देता येईल, तो खरे तर महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वीच दिला होता. तो म्हणजे देशहितासाठी काँग्रेस पक्ष विसर्जित करा. वर्तमान परिस्थिती पाहिली तर काँग्रेसचे विसर्जन हेच देशहिताचे असणार आहे याबाबत मला तरी शंका वाटत नाही.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

 

 

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jairam ramesh comment on congress party
First published on: 10-08-2017 at 02:55 IST