जेव्हा गौरी लंकेश यांची भ्याड हत्या झाल्याची बातमी आली तेव्हा त्यांची हत्या कुणी केली असावी, असा प्रश्न वारंवार मनातल्या मनात रुंजी घालत राहिला. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर आपली सर्वाचीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीला आपण किती निकटची आहे असे मानतो यावर अवलंबून असते. त्यात त्या मृत व्यक्तीला आपण ओळखण्याची आवश्यकता नसते. जेव्हा आपण रोज एखाद्या रस्त्यावरून जात असतो, ज्या रेल्वेतून रोज प्रवास करीत असतो तेथे झालेली कुठलीही दुर्घटना आपल्या मनाला खोलवर स्पर्शून जाते. त्या दुर्घटनेतील मृतांमध्ये कदाचित मी असू शकलो असतो या विचाराने आपण त्या दुर्घटनेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो.
कदाचित त्यामुळेच गौरी लंकेश यांच्या हत्येची बातमी येताच माझ्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला. मी त्यांना अनेक वेळा भेटलो आहे. त्यांच्याशी माझी मैत्री होती असे मी म्हणणार नाही, पण भेटलो अनेकदा. गेल्या वर्षी मंगळूरु येथे त्या भेटल्या होत्या. गांधी जयंतीच्या दिवशी आयोजित एका संमेलनात आम्ही एकत्र होतो. या महिन्यात मी मंगळूरुला जाणार होतो तेव्हा पुन्हा त्यांची भेट होईल असा विचार मनात डोकावत होता, त्यातच त्यांच्या हत्येची बातमी मन विचलित करणारी ठरली.
अशी एखादी बातमी येते तेव्हा मन चौखूर उधळू लागते. कसे घडले असेल हे सगळे, हा विचार मन कुरतडू लागतो. इतक्या संवेदनशील व साध्या महिलेची निर्घृण हत्या कशी केली जाऊ शकते, हा प्रश्न पाठ सोडत नाही. या हत्येमागे कुठला व्यक्तिगत मुद्दा तर नव्हता.. याचा संबंध भाजप नेत्यांनी न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याशी तर नाही ना.. या प्रश्नांचे ठोस उत्तर देणे आपल्याला शक्य नाही. अशा हत्यांच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा वृत्तपत्रातील रकाने व दूरचित्रवाणीवरील चर्चातून करण्याचा प्रयत्न करणे फार शहाणपणाचे नाही. हत्या प्रकरणातील धागेदोरे, आरोपींची ओळख पटवणे, त्यांना शिक्षा घडवण्यासाठी योग्य दिशेने तपास करणे ही पोलिसांची कामे आहेत.
असे असले तरी या सगळ्या प्रश्नावर काहीच चर्चा न करता गप्प बसणे हेही योग्य नाही. त्यावर चर्चा वेगळ्या दृष्टिकोनातून होऊ शकते. कुठलीही हत्या होते तेव्हा तीन प्रकारचे गुन्हेगार असतात. ज्यांच्या हातून हत्या होते ते. जे लोक हत्येचा कट रचतात ते व जे हत्येच्या प्रकरणात वातावरणनिर्मिती करतात ते. यात पहिल्या व दुसऱ्या प्रकारचे गुन्हेगार कोण आहेत ते शोधण्याचे काम पोलिसांचे आहे हे मान्यच. पण हत्येसाठी वातावरणनिर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांचा आपण शोध घेतला नाही तर आपण कर्तव्यच्युतीचे पाप करीत आहोत असे म्हणायला हरकत नाही. आपण आता गप्प बसलो तर आणखी अशाच विवेकवादी लोकांच्या हत्येचा मार्ग अप्रत्यक्षपणे मोकळा करून दिल्यासारखे होईल. गौरी लंकेश एक व्यक्ती नाही तर विचार होत्या. त्यांची हत्या ज्यांनी कुणी केली असेल त्याच्यामागेही एक व्यवस्था असेल, तिचाही काही विचार असेल. हत्या कुणी केली हे केव्हा स्पष्ट होईल हे सांगता येत नाही, पण हे निर्घृण कृत्य करणारे कुठल्या व्यवस्थेचे, विचारांचे पाईक असावेत यावर आपण चर्चा करू शकतो.
गौरी लंकेश एक पत्रकार होत्या, कन्नडमधील ‘लंकेश पत्रिके’च्या त्या संपादक. या वेगळ्या वृत्तपत्राची सुरुवात त्यांचे वडील पी. लंकेश यांनी १९८० मध्ये केली होती. ‘लंकेश पत्रिके’ हे व्यावसायिक वृत्तपत्र नव्हते. आंदोलनकारी विवेकवादी विचारसरणीच्याच बाण्याने त्यांची पत्रकारिता प्रेरित होती. सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडताना सत्यान्वेषण करण्याची परंपरा त्या वृत्तपत्राला आहे. ‘लंकेश पत्रिके’ने राज्य व देशातील सांप्रदायिक शक्तींवर कठोर प्रहार केले. त्यामुळ गौरी लंकेश यांचा भाजप व रा.स्व. संघाच्या लोकांशी संघर्ष उघडपणे सुरू होता. भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता, त्यात त्यांचा विजयही झाला होता. त्यावर अपीलही दाखल करण्यात आले होते. गौरी लंकेश यांनी राज्यात सांप्रदायिकता, जातीयतावादी शक्तींविरोधात मोहीम चालवली होती. हिंदुत्ववादी म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांनी त्यांना धमक्याही दिल्या होत्या. त्यांनी शेवटच्या मुलाखतीत असे सांगितले होते की, आता जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यातून एकच स्पष्ट होते की, गौरी लंकेश यांच्या हत्येमागे हिंदू धर्माच्या नावाखाली दबंगगिरी करणाऱ्या व्यवस्थेचा व विचारांचा हात असावा.
गौरी लंकेश यांची हत्या ही केवळ एक घटना नाही. त्याआधी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे तर कर्नाटकात प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या होत्या. ते कुणी राजकीय कार्यकर्ते किंवा पत्रकार नव्हते. ते केवळ विज्ञान व तर्काधिष्ठित विचारांचे समर्थन करीत होते. त्यासाठी आंदोलन करीत होते. हिंदूत्वाच्या ठेकेदारांना ही विवेकवादी विचारसरणी रुचली नाही. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी अजून पकडले गेलेले नाहीत. गौरी लंकेश यांची हत्या वरकरणी तरी या मालिकेतील हत्या आहे असे वाटते. कर्नाटक सरकारने या दृष्टिकोनातून तपास करणे ही आता त्यांची जबाबदारी आहे.
गौरी लंकेश या केवळ पत्रकार नव्हत्या; कर्नाटकातील एका वेगळ्या वैचारिक परंपरेच्या वारसदार होत्या. कर्नाटकच्या बाहेरील लोकांना तेथील वैचारिक परंपरा माहिती असेलच असे नाही. कर्नाटकातील अनेक साहित्यिकांवर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा सखोल प्रभाव आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शिमोगा शहरातील यू. आर. अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी व पी. लंकेश यांनी कन्नड साहित्यात एक नवीन विचारधारा प्रवाहित केली. जातिव्यवस्थेला विरोध, महिलांप्रति असमानतेविरोधात लढा, शेतकरी आंदोलनाला साथ ही या वैचारिक परंपरेची काही वैशिष्टय़े होती. त्या परंपरेची छाप तेथील कन्नड साहित्यावर पडली. त्यांच्यानंतर देवनूर महादेव, सिद्धलिंगय्या व नागराज यांनी या परंपरेची ज्योत तेवत ठेवली. ‘लंकेश पत्रिके’ हे वृत्तपत्र या चळवळीच्या वारशाचा एक भाग आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येचा अर्थ लावताना या सगळ्या इतिहासाचा मागोवा घेणे प्रासंगिक ठरावे. जर ‘लंकेश पत्रिके’ हे वृत्तपत्र इंग्रजी असते तर विरोधकांना त्याच्याशी फारसे देणे-घेणे नव्हते, पण प्रादेशिक भाषेत ते निघत होते. त्यात हिंदू संस्कृतीची प्रतीके, वाक्प्रचार यांच्या वापरातून प्रभावीपणे लोकांना समजतील अशा रीतीने विचार मांडले जात होते. त्यामुळे लोकांपर्यंत ते पोहोचत होते, त्यांना ते समजत होते हीच लंकेश यांच्या विरोधकांची खरी दुखरी नस होती.
कर्नाटकात बाराव्या शतकापासून महान समाजसुधारक बसवण्णा यांनी हिंदू समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात संघर्ष सुरू केला होता, ही परंपरा जुनी आहे. नेमकी तीच हिंदुत्वाच्या ठेकेदारांना विचलित करणारी आहे. इंग्रजीतील धर्मनिरपेक्ष बुद्धिजीवी लोकांची खिल्ली उडवणे या ठेकेदारांना अगदी सोपे आहे पण आपल्याच सांस्कृतिक परंपरेतील महिला जेव्हा काही प्रश्न विचारते व त्याला उत्तर देणे मुश्कील होते तेव्हा ती बाब या ठेकेदारांचे माथे भडकवणारी होती. हिंदू जातीयवाद्यांना नेहरूंची हत्या करण्यात अजिबात स्वारस्य नव्हते म्हणून त्यांनी गांधीजींची हत्या केली. हिंदू धर्माच्या सांस्कृतिक वारशावर राजकीय हक्क सांगणाऱ्यांना गांधीजींची हत्या आवश्यक वाटत होती. या हिंदुत्ववादी ठेकेदारांना धर्म व संस्कृतीच्या खऱ्या वारशाचा पाठपुरावा करणे अवघड होते. त्यांचा सगळा वारसा दांभिकतेवर आधारित आहे.
शारदोत्सवाला प्रारंभ होण्याआधी गौरी लंकेश यांची हत्या होण्यामागे एक अस्पष्ट संकेत मला दिसतो. गौरी हे माता दुर्गेचे नाव आहे. तीच दुर्गा काली या नावानेही ओळखली जाते. आताचा महिना हा माता दुर्गेच्या आगमनाचा आहे. नवरात्री व दुर्गापूजेच्या आधीच गौरी लंकेश यांची झालेली हत्या भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे. दक्षिणेत लंकेश म्हणजे रावणाची, भगवान शिवाचा भक्त म्हणून पूजा केली जाते. गौरी तिच्या दुसऱ्या रूपात पार्वती आहे, शिवाची अर्धागिनी. शिवपार्वतीचा शक्तिसमुच्चय व स्त्रीशक्तीचा वाढता आविष्कार यामुळे भयभीत होऊन काही लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली, असे मला वाटते.
योगेंद्र यादव
First Published on September 7, 2017 3:17 am
- Sep 9, 2017 at 5:02 pmह्या गौरी लँकेशा नि हिंदू धर्मावर किती गरळ ओकली आणि खालच्या दर्जाच्या वयक्तिक ट्विट्स टाकल्या होत्या. हे कसली संवेदनशील. तुमचा धर्मावर विश्वास नाही समजू शकतो, हिंदुत्ववाद्यांना विरोध करता हेय हि ठीक, पण एक पातळी असते.. पुन्हा हिचे स्वतःच्या नातेवाईकांशी आणि इतर दाव्यांबरोबर पटायचे नाही. डावे आणि मुसलमान ह्यात साम्य आहे. इतर कुणी असले कि तेय एक होऊन भांडतील, नंतर आपापसात लाथाळ्या झडतील.Reply
- Sep 9, 2017 at 9:42 amGauri’s full name is ‘Gauri Lankesh’ and her weekly publication was called ‘Gauri Lankesh Patrike’. Patrike like the Hindi word ‘Patrika’ means journal or paper in Kannada.Reply
- Sep 9, 2017 at 7:50 amयादव सुद्धा 'असंतांचे संत' आहेत हे पुन्हा सिद्ध झाले!लोकसत्ताला हिंदुत्वावर टीका करण्याची संधी साधणारा हमदर्द मिळाल्याचा केवढा आनंद, भले अद्याप खरे गुन्हेगार कोण हे कुणालाही माहिती नसो आणि राज्यात नतद्रष्ट काँग्रेसी शासन असो !Reply
- Sep 8, 2017 at 12:25 pmया दाढीवाल्याचे कोणाशीही पटत नाही. एकापेक्षा जास्त माणसे ज ी की जमवून घ्यावे लागते.तेच यांना जमत नाही. यांनी कधी संस्था उभारणी केली नाही. तेव्हा इतरांच्या संस्थांवर टीका करायची एवढे माहित.उगीच नाही केजरीवालांनी यांच्या मागील बाजू वर पादत्राणाचा ठसा उमटवला.आता जाऊन गौरी पॅट्रीकला चिकटतोय.Reply
- Sep 8, 2017 at 2:50 amअरे योगेंद्र गौरी लांकेश यांचे पूर्ण नाव 'गौरी लांकेश पॅट्रिक' आहे ते का लपवून ठेवताय? ख्रिस्ति भामट्यांची असली पिवळी पत्रकारिता आजची नाहीये. हे प्रयत्न स्वातंत्र्यपूव काळापासून चालू आहेत. तिला हुतात्मा ठरवण्या मागे तिच्या विषयी कळवळा कमी आणि भारतीय हिंदू समाजावर ओकायला मिळण्याची संधी जास्ती दिसतेय तुमच्या संपादकीय मध्ये....Reply
- Sep 8, 2017 at 12:11 amह्यावर अग्रलेख का नाही लिहिला लोकसत्ताने , आश्चर्य आहे सगळे प्रिंट मीडिया ने ह्याच दाखल घेतली आणि लोकसत्ता कडून एक हि अग्रलेख नाहीReply
- Sep 7, 2017 at 10:57 pmयोगेंद्र यादव हे सत्य विश्लेषण करणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक आशेचा किरण आहे.पोस्ट-ट्रूथ सत्योत्तर नाही सत्याभासोत्तर जगात विवेकी विचार असणारा माणूस आज गूदमरतो आहे.हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारे व्यक्तीलासंपवून विचार संपवू शकत नाहीत.पण या विदुषी गौरी लंकेश यांच्या हत्येचा खेद वाटतो नव्हे हा लोकशाहीचा काळ नाही यापेक्षा बारावे शतक बरे बसवण्णानी दिलेला व्यवस्था विरोधी लढा त्या काळातील सनातन लोकांनी ज केले.अक्का नागम्मा, अक्का महादेवी यांना स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून हक्क मिळवून देण्यासाठी विश्वाविरुद्ध लढेन म्हणणारा बसवण्णा आजही जिवंत आहे.नव्हे त्याला देवत्व प्राप्त झाले आहे.आज दाभोलकर, पानसरे ,कल ्गी व आज गौरी लंकेश यांच्या हत्या लोकशाही व्यवस्थेला प्रशनांकित करणारे आहे. व्यक्तिस्वातंत्र्यवादी समाजाने अगदी खुलेआम सत्याभासोत्तर युगात प्रवेश केला. म्यानमार राष्ट्राध्यक्ष शांततेसाठीचा नोबेल असणाऱ्या विदुषी सुकी एका मोठ्या जामातीला विस्थापित केले जात आहे.दक्षिणायनच्या माध्यमातून गणेश देवीनी सर्व समविचारी लोकांना एकत्र करून चर्चा घडवून आणली होती.तसे एकत्र आले पाहिजे.Reply
- Load More Comments