मला डोनाल्ड ट्रम्प व मेरिल स्ट्रीप यांच्यात नुकतेच जे वादविवाद झाले त्यात अजिबात रस नाही; पण सत्ता व सत्य यांच्यातील संघर्षांत मात्र जरूर रस आहे. कुणाच्या डोक्यावर मुकुट आहे याच्याशी काही देणे-घेणे नाही. मला त्या आवाजाच्या पडसादांशी नाते जोडावेसे वाटते जो आवाज तो मुकुट उधळू शकतो, सिंहासन हलवू शकतो. माझे मन भारतात अशा आवाजाचा शोध घेत होते..

तुमच्यापासून काय लपवायचं. मी कालपर्यंत मेरिल स्ट्रीपचं नावही ऐकलं नव्हतं. मेरिल स्ट्रीप हॉलीवूडची किती प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिला किती पुरस्कार मिळाले आहेत हे मला माहिती नव्हते. मी इंग्रजी चित्रपटही फार क्वचित पाहतो. कामचलाऊ इंग्रजी मी लिहू-बोलू शकतो; पण दु:ख, प्रेम व शोकात इंग्रजी साथ सोडते, त्यामुळे कविता, कथा व चित्रपटाचा रसास्वाद करताना हिंदी अनुवादाचा आधार मला घ्यावा लागतो.

त्यामुळे मेरिल स्ट्रीप ठाऊक असण्याचे कारण नव्हते. तिच्याविषयी कालच कळले. ती भेटली ती चित्रपटातून नाही, तर तिच्या सहा मिनिटांच्या व्हिडीओतून. गोल्डन ग्लोब पुरस्कार कार्यक्रमात तिला जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्यासाठी तिला बोलावण्यात आले होते. तिने पुरस्काराबद्दल धन्यवाद म्हणून थांबायचे ना.. पण ती िहमतबाज स्त्री. तिने अमेरिकेत जे घडते आहे त्यावर टीकाटिप्पणी करायला सुरुवात केली. सगळे प्रेक्षक सुन्न होऊन ऐकत राहिले, भारावून गेले. तिच्या बोलण्यात राजकीय घोषणाबाजी नक्कीच नव्हती, शिवीगाळ नव्हती; पण तिचा इशारा स्पष्ट होता, निशाणाही स्पष्ट होता, तो म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व अमेरिकेतील नवी कुसंस्कृती. तिने केलेला प्रहार इतका शक्तिशाली होता की, दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांना उत्तर देणे भाग पडले. गेले काही दिवस मेरिल स्ट्रीपचा हा व्हिडीओ म्हणजे दृश्यचित्रफीत सगळ्या जगातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. माझ्या फेसबुक पानावरूनही बारा तासांत ही व्हिडीओ लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचली. मी राजकारणाच्या प्रेमात पडणारा नाही. मी तर फक्त एवढंच बघत होतो की, त्या देशातील एक अभिनेत्री अत्यंत शक्तिशाली अशा व्यक्तीविरुद्ध म्हणजे ट्रम्प यांच्याविरुद्ध किती हिमतीने बोलत होती. मला ट्रम्प व स्ट्रीप यांच्यात जे वादविवाद झाले त्यात अजिबात रस नाही; पण सत्ता व सत्य यांच्यातील संघर्षांत मात्र जरूर रस आहे. कुणाच्या डोक्यावर मुकुट आहे याच्याशी काही देणे-घेणे नाही. मला त्या आवाजाच्या पडसादांशी नाते जोडावेसे वाटते जो आवाज तो मुकुट उधळू शकतो, सिंहासन हलवू शकतो. अमेरिकेतील त्या अभिनेत्रीचे भाषण माझे डोळे व कान अगदी सावधपणे पाहात व ऐकत होते. माझे मन भारतात अशा आवाजाचा शोध घेत होते. मला बेला भाटिया व नंदिनी सुंदरचा आवाज ऐकू येत होता. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये गेली अनेक वष्रे भारत सरकार व राज्य सरकार यांनी लोकशाही मोडीत काढली आहे. नक्षलवाद्यांबरोबर अहिंसक आंदोलकांना तुडवले जात आहे. मोठे पक्ष एकमेकांशी संधान बांधून आहेत. माध्यमांचे तोंड बंद आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांचे काय होईल हे सांगता येत नाही. या परिस्थितीत या दोन महिलांनी जोखीम पत्करून बस्तरचे खरे वास्तव व सत्य देशापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

शांतिप्रिय बेला भाटियाला नक्षली घोषित करण्यात आले. दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापक नंदिनी सुंदर यांच्या विरोधात बंदुका बाळगल्याचे खटले गुदरण्यात आले तरीही त्या बोलत आहेत, पण आपण ऐकत आहोत का?

तिच्या आवाजात कंप होता; पण तरी मेरिल स्ट्रीप बोलत होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे नावही तिने घेतले नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात एका अपंग पत्रकाराची खिल्ली उडवली, त्याच्या व्यंगावर बोट ठेवले. त्याचा उल्लेख करून मेरिल म्हणाली की, ही गोष्ट माझ्या मनाला काटय़ासारखी बोचली की, देशाच्या सर्वोच्चपदाची दावेदार व्यक्ती एका कमी आर्थिक, शारीरिक ताकदीच्या व्यक्तीची अशी खिल्ली उडवते. जेव्हा सत्ताधारी एखाद्या कमजोर व्यक्तीला त्यांच्या सत्ताबलाच्या आधारे अपमानित करतात तेव्हा सगळ्या समाजालाच धाकदपटशाच्या संस्काराचा रोग लागतो.

माझ्या डोळ्यासमोर अनेक चित्रे तरळत आहेत. दिल्लीत १९८४ मध्ये शिखांची कत्तल झाली तेव्हा देशाचे पंतप्रधान असे म्हणाले होते की, जर वृक्ष उन्मळून पडला तर जमीन हादरणारच. गुजरातेत २००२ मध्ये दंगली झाल्या त्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते की, दंगलग्रस्त लोक मदत छावण्यांत बिर्याणी झोडत आहेत. आपल्या सर्वाच्या हातावर रक्ताचे डाग आहेत; पण देशातील काही प्रसिद्ध लोक शीख कत्तलीचा कसून निषेध करतात.

गुजरातचे हर्ष मंदर लिहितात की, आता ‘सारे जहाँ से अच्छा’ मला गाता येणार नाही, पण आपण खरोखर त्यांची आठवण ठेवली आहे का? देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर जे हल्ले होत आहेत त्याविरोधात लढणारे प्रा. गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लेखकांनी दक्षिणायन अभियान सुरू केले आहे. त्याबाबत आपल्याला माहिती तरी आहे का?

मेरिल स्ट्रीप तर प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची कथा मांडत होती. माझ्यासमोर टीव्हीचा काळा पडदा आहे. त्यातून रवीश कुमारचा आवाज येतो आहे. हा अंधारा पडदाच आज प्रसारमाध्यमांची खरी छबी आहे. रामनाथ गोएंका पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक राजकमल झा यांनी केलेले एक छोटे वक्तव्य अजूनही डोळ्यासमोर आहे. राष्ट्रध्वजाच्या आडून चालणाऱ्या सेल्फी पत्रकारितेवर त्यांनी आसूड ओढताना सांगितले होते की, सरकारने जर एखाद्या पत्रकारावर टीका केली तर ते सन्मानपदक समजावे. त्याच कार्यक्रमात अक्षय मुकल या पत्रकाराने पंतप्रधानांच्या हातून पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. मला बालपणी वाचलेली एक गोष्ट आठवते, जेव्हा विश्वविजेता सिकंदर एका साधूला विचारता झाला की, तुला काय हवे? त्यावर साधू म्हणाला, माझा प्रकाश अडवू नकोस, बाजूला हो. राजा व साधूची ही गोष्ट किती जणांना आठवते?

मेरिल स्ट्रीपची भाषा संयमित आहे, नम्रतेची आहे; पण ती कमजोर मुळीच नाही. माझ्या कानात प्रशांत भूषणचा आवाज रुंजी घालत होता. प्रशांत हे सर्वोच्च न्यायालयात आहेत व समोर सरन्यायाधीश खेहर आहेत. बिर्ला व सहारा समूहाची काही कागदपत्रे ही पंतप्रधानांसह देशातील अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत व या प्रकरणात पसे घेतले गेल्याचा आरोप त्यात होता. सुनावणी खेहर यांच्यासमोर होणार होती. प्रशांत हे मनातून न्या. खेहर यांचा आदर करीत होते; पण त्यांनी खुल्या न्यायालयात संयमित, नम्र व निर्भीड स्वरात सांगितले की, न्यायाधीश साहेब मला तुमच्या निष्पक्षपातीपणावर जराही संदेह नाही, पण या न्यायालयाचा एक जबाबदार घटक असल्याने माझी ही जबाबदारी वाटते की, यातील एक धोका तुमच्यासमोर मांडला गेला पाहिजे. जेव्हा तुमच्या बढतीची फाइल पंतप्रधानांच्या कार्यालयात पडून आहे, अशा काळात या प्रकरणात तुम्ही निकाल देण्यात घाई करण्याने जनतेत चुकीचा संदेश जाईल. प्रशांत भूषण यांच्या या वक्तव्याने मेरिल स्ट्रीप जे बोलली त्यानंतर जे वातावरण होते तसाच सन्नाटा पसरला असेल यात मला शंका नाही. मी प्रशांतजींना सलाम केला. तुम्हीही केलात का..

संपूर्ण कक्षात टाळ्या वाजत होत्या, डोळ्यात पाणी होते माझ्याही. डोळ्यात पाणी होते; पण छाती अभिमानाने फुगली होती. ते असहायतेचे नव्हे तर सामर्थ्यांचे अश्रू होते.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com