निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करू शकतात का? एखाद्या राज्यातील निवडणूक जिंकण्यासाठी देशहितापेक्षा व्यक्तिगत यश व पक्षहित मोठे असू शकते का? असे प्रश्न गुजरात निवडणुकीत अलीकडे जी वक्तव्ये प्रचारादरम्यान मोदी यांनी केली त्यावरून प्रत्येक भारतीयाला पडले असतील यात शंका नाही.

नरेंद्र मोदी निवडणुकीत स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात हे तर खरेच, ती त्यांच्या राजकारणाची खासियतच आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन किमान तीनशेहून अधिक सभा घेतल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्यांच्याच पक्षाच्या प्रचारात पाहुण्यासारखे दिसत असत. यापूर्वी भाजपची मुलूखमदान तोफ असलेले नेते अटलबिहारी वाजपेयी हेसुद्धा कधी एखाद्या राज्यातील निवडणुकीसाठी झोकून देऊन प्रचार करताना दिसले नाहीत. नरेंद्र मोदी यांचे तसे नाही. ते छोटय़ामोठय़ा निवडणुकीत सगळी ताकद लावून प्रचार करतात. आता अशा छोटय़ामोठय़ा निवडणुकांत लक्ष घातल्याने पंतप्रधानांची प्रतिमा खालावते असेही म्हणता येते व दुसरीकडे एवढा मोठा नेता, पंतप्रधान प्रत्यक्ष निवडणुकीच्या समरांगणात उतरून दोन हात करण्यास तयार असतो तो खरा लढवय्या आहे, असाही अर्थ काढता येतो. निवडणुकीत जे पंतप्रधान एवढा वेळ खर्च करतात ते सरकार चालवण्याच्या कामाला किती वेळ देतात असाही एक आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण या मुद्दय़ावर काही ठोस पुरावे किंवा आकडेवारी नाही. गुजरात निवडणुकीमुळे संसदेचे अधिवेशन नेहमी नोव्हेंबरमध्ये होते ते डिसेंबपर्यंत लांबणीवर गेले, ते चुकीचेच होते. पण ती राजकारणाची अगतिकता होती.

निवडणुकीच्या रणधुमाळीत दंड थोपटून उभे राहणे हा राजकीय नेत्याचा गुण मानला जातोच. त्याला कमजोरी समजले जात नाही. पण राजकारण हा काही आखाडा नव्हे. राजकारणात ‘नीती’ असावी लागते. मर्यादाशीलता हे त्याचे अभिन्न अंग आहे. तसे पाहिले तर आखाडय़ाचेही आपले काही नियम असतात, मर्यादा असतात. एखादा नेता केवळ ‘निवडणूक जिंकून देऊ शकतो’ म्हणून तो मोठा ठरत नाही. जो नेता देश व समाजाची उन्नती घडवतो तोच खरा मोठा नेता असतो. चार वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला होता त्याची कारणे ते दमदार वक्ते होते, चांगली भाषणे देत होते, काँग्रेसला सडेतोड उत्तरे देत होते, काँग्रेसच्या कारभाराची लक्तरे काढत होते, ही नक्कीच नव्हती. नरेंद्र मोदी हे पक्षहित व स्वहितापेक्षा देशहिताला जास्त महत्त्व देतात याचा भरवसा लोकांना वाटला म्हणून त्यांना लोकांनी मते दिली. आताच्या परिस्थितीत गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो; कोटय़वधी लोकांच्या मनात मोदींविषयी असलेल्या विश्वासाला आताच्या काही वक्तव्यांमुळे गेलेला तडा कसा सांधणार?

यात प्रश्न केवळ सभ्यता व शालीनतेचा नाही. नरेंद्र मोदी कधीच कुलीन, शालीन पंथातले नव्हते किंवा त्यांनी कधी त्याची फिकीर केली नाही. विरोधकांवर टीका करताना खालची पातळी गाठणे, त्यांची टिंगलटवाळी करणे अशा गोष्टी ते करीतच राहिले आहेत. एकदा तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त लिंगडोह यांचीही कुचेष्टा केली होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या एक-दोन वर्षांत असे वाटले होते की, ते आता या खालच्या पातळीवरून एका संयमी, पोक्त पातळीवर आले आहेत, पण नोटाबंदीनंतर त्यांनी शिस्त व मर्यादा सोडली असे दिसून येते. आता गुजरात निवडणुकीच्या प्रचारात तर त्यांनी आपल्या पदाचा आबही न राखण्याइतक्या खालच्या पातळीची वक्तव्ये केली. या असल्या वक्तव्यांबाबत काँग्रेस काही धुतल्या तांदळासारखी आहे असे नाही. मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांच्या राजकारणाला ‘नीच’ असे संबोधणे हेही राजकीय सभ्यतेच्या संकेतांचे उल्लंघनच होते. परंतु यात फरक इतकाच आहे की, काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांच्यावर या प्रकरणी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला पण मोदी यांनी ते स्वत जे काही बोलले किंवा पक्षाकडून जी वक्तव्ये केली गेली त्यावर खेदही व्यक्त केला नाही.  सभ्यता व शालीनता हा वेगळा मुद्दा आहे, खरा प्रश्न सत्याचा आहे. या प्रकरणात मोदी घसरले एवढेच दिसते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच जगात थापेबाज व खोटारडय़ांचे मेरुमणी आहेत असे आतापर्यंतचे चित्र होते, पण गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांची ती खासियत मिळवण्याच्या शर्यतीत आपले पंतप्रधान मोदी आघाडीवर राहिले. नोटाबंदीच्या प्रकरणात खोटय़ा आकडय़ांची फेकाफेक, तसेच गुजरात निवडणुकीत पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप हे सगळे पाहिले तर मोदी यांच्या बोलण्यावरचा लोकांचा विश्वास उडायला लागतो. केवळ निवडणुकीतील लाभासाठी मोदी असत्याच्या कुठल्याही परिसीमा गाठू शकतात असेच दिसते. आपल्या या बोलण्याचा देशाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो याचा विचार ते करतात की नाही असा प्रश्न पडतो. ट्रम्प यांचा खोटारडेपणा ऐकून आपण हसतो, मग मोदींची ही वक्तव्ये त्यापेक्षा वेगळी आहेत का? सारे जग आपल्याला हसायला तर लागणार नाही ना? अशा शंका येतात.

सत्य-असत्य हा राजकारणाच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. पंतप्रधान होताना मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. एक सकारात्मक कार्यक्रम मांडला. आता त्याचा हिशेब मांडण्याची वेळ आली आहे. नेमके त्याच वेळी ते या कार्यक्रमापासून दूर गेलेले दिसतात. देशाला विकासाचे ‘गुजरात प्रारूप’ देण्याचा दावा करणारे मोदी आता गुजरातच्या विकासावर चकार शब्द काढत नाहीत. त्यांनी विकासाचा मुद्दा सोडून दिला आहे. गुजरातेत गेली २२ वर्षे भाजपची सत्ता होती त्याचा हिशेब देण्याऐवजी राहुल गांधी यांचा धर्म, पाकिस्तान व हिंदू-मुसलमान प्रश्न यात रुची दाखवण्यात मोदी धन्यता मानत आहेत. लोकसभेला त्यांनी आशा पल्लवित केल्या पण आता ते गुजरातमध्ये आशेचे वातावरण निर्माण करण्याचे सोडून भीती पसरवण्याचे राजकारण करीत आहेत. काँग्रेस म्हणजेच मुसलमान व पाकिस्तानधार्जणिा पक्ष अशी प्रतिमा निर्माण करण्याचा खेळ मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यांतून केला. त्यांनी याचा परिणाम पुढच्या पिढय़ांवर काय होईल याचा विचार केलेला दिसत नाही. दुसरे म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी ते ‘कुठल्याही’, ‘कितीही’ खालच्या थराला जाऊन ‘काहीही’ बोलू शकतात हे त्यांनीच सिद्ध केले.

आता यात सर्वात मोठा प्रश्न देशप्रेम व देशद्रोह हा आहे. मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री व विद्यमान उच्चायुक्त यांच्याशी झालेल्या चच्रेचा जो मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी प्रचारासाठी पुढे आणला त्यात त्यांनी जे आरोप केले ते आपल्या देशहितावर आघात करणारे आहेत. ही सगळी कहाणी कपोलकल्पित आहे एवढाच यातील मुद्दा नाही. देशाचे माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी लष्करप्रमुख यांच्यासह एकूण १५ जण पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री व उच्चायुक्त यांच्याशी चर्चा करताना गुजरात निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे षड्यंत्र आखतात हा आरोपच हास्यास्पद आहे. केवळ हास्यास्पद आरोप हा यातील मुद्दा नाही, यामुळे जगात आपले हसे झाले हेही आपण बाजूला ठेवू. आता जर मोदींच्या म्हणण्याप्रमाणे अशी कटकारस्थाने झालीच आहेत असे म्हटले तर भारत सरकारने पाकिस्तानी उच्चायुक्तांना तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली पाहिजे. तशी केली नाही तर पंतप्रधान मोदी यांनी केलेले आरोप खोटे सिद्ध झाल्यासारखेच आहेत. पण यात भारतीय पंतप्रधानांची वैचारिक उंचीच कमी असावी अशी शंका येते. १९७१ च्या युद्धात मर्दुमकी गाजवणारे लष्करप्रमुख जनरल कपूर यांना या चिखलफेकीत ओढून मोदी यांनी लष्कराचा अपमान केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तान्यांशी सोटेलोटे करून देशातील सत्ताधारी पक्षाविरोधात कट करण्याचा आरोप किती गंभीर आहे याची कल्पना मोदी यांना असण्याची अपेक्षा आहे. जर मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी केलेला आरोप खरा असेल तर डॉ. सिंग यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची हिंमत सरकार दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे. जर तसा खटला भरणार नसतील तर मग स्वत: पंतप्रधानच देशहिताशी खेळ करण्यात दोषी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही का? गुजरातची जनता या प्रश्नाचे द्यायचे ते उत्तर तर देईलच, पण सगळ्या देशाने या प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित आहे.

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com