यंदा अवर्षणाची स्थिती खूप वाईट आहे. मराठवाडय़ात डिसेंबर-जानेवारीत पिण्याचे पाणी मिळणार नाही अशी अवस्था आहे. ज्या राज्याने रोजगार हमी योजनेची देणगी देशाला दिली, त्याच राज्यात मनरेगाचे फायदे मजुरांना मिळताना दिसत नाहीत असे चित्र सामोरे आले आहे. आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र व तेलंगणातील अवर्षणग्रस्त भागात जी संवेदना यात्रा काढली होती त्यातून भीषण वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
असे म्हणतात, की कॅमेऱ्याने काढलेले छायाचित्र खोटे बोलत नाही. खरे तर छायाचित्राबाबत असे खोटे विधान दुसरे असूच शकत नाही. छायाचित्र जेवढे दाखवते, तेवढेच लपवतेही. छायाचित्र आपल्याला जे सत्य दाखवत असते ते एका कोनातून दाखवत असते. छायाचित्र आपल्याला जग ज्या कोनातून दाखवते त्याच कोनातून जगाचे दर्शन आपल्याला घडू शकते, त्यामुळे त्याला मर्यादा आहेत. छायाचित्रामुळे आपल्याला एक दृष्टी जरूर मिळते पण ती भ्रामक असू शकते, किंबहुना छायाचित्र दिशाभूल करू शकते. अवर्षणाच्या बाबतीत मनात दोन प्रतिमा समोर येतात; एक म्हणजे ज्यात जमिनीला खोल व मोठय़ा भेगा पडल्या आहेत, एकही पान-फूल दिसत नाही. तिथे बसलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या व कपाळावरील चिंतेच्या रेषा मन अवघडून टाकतात. दुसरे चित्र ते ज्यात पश्चिम बंगाल व आफ्रिकेतील भीषण दुष्काळाचे. मानवी सांगाडय़ासारखी माणसे, पोट पुढे आलेली मुले. त्यांचे खोल गेलेले डोळे, चारी बाजूने मृत्यूचे तांडवच जणू. अवर्षण किंवा दुष्काळाच्या या प्रतिमा आपले लक्ष वेधतात व आपण त्यात काही तरी शोधायला पाहत असतो जे आपल्याला अभिप्रेत असते. या प्रतिमा आपल्याला जणू असे सांगत असतात, की तुम्ही जो दुष्काळ, जे अवर्षण शोधता आहात ते इथे तुम्हाला दिसणार नाही. दुष्काळ किंवा अवर्षणाच्या बाबतीत प्रतिमा तुम्हाला स्थितीचे खरे दर्शन घडवत नाहीत व त्याची अपेक्षाही न ठेवलेली बरी. दुष्काळ किंवा अवर्षण आपोआप दर्शन देत नाही, तो शोधावा लागतो. देशातील दुष्काळ व अवर्षणग्रस्त भागातील अनेक भागांचा दौरा केला असता माझ्यासाठी नवी शिकवण तर हीच मिळाली आहे, की दुष्काळ किंवा अवर्षण दिसत नाही ते शोधावे लागते, त्याचा वेध घ्यावा लागतो.
दुष्काळ किंवा अवर्षण बघायचे असेल, तर रस्त्यावर उभे राहून शेतांवर नजर फिरवू नका, प्रत्यक्ष शेतात जा. एखाद्या अनुभवी शेतकऱ्याबरोबर बसा व त्याची विचारपूस करा, त्याची दु:खे जाणून घ्या. दुष्काळ व अवर्षणाबाबत जनजागृतीसाठी आम्ही तीन राज्यांत संवेदना यात्रा काढली होती. दुष्काळाचे व अवर्षणाचे गांभीर्य लोकांसमोर यावे हा त्यामागचा हेतू होता. कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा या भागातील ज्या जिल्ह्य़ांमध्ये आम्ही गेलो, तेथे आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले असता विनाशच विनाश दिसून आला. या भागात कपाशीच्या म्हणजे कापसाच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आजकाल लोक बीटी कॉटन बियाणे लावतात. काही ठिकाणी कापसाचे एकतृतीयांश पीक नष्ट झाले आहे तर काही ठिकाणी दहावा भागही उरलेला नाही. गेल्या १५-२० दिवसांत थोडा पाऊस झाला, त्यामुळे पाने हिरवी दिसत होती, पण फुले कोमेजली होती.
सोयाबीन हे या भागातील दुसरे मोठे पीक आहे. ज्यांनी सोयाबीन पेरले त्यांचे नुकसान झाले. अध्र्याहून अधिक पीक नष्ट झाले. तूर, ज्वारी यांसारख्या पारंपरिक पिकांचे नुकसान झाले आहे, पण अपेक्षेपेक्षा कमी आहे. या वेळी शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त वेळा पेरण्या केल्या. मे-जून महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसला. त्यांनी महाग बियाणे, खते, कीटकनाशके यांचा वापर करून पेरण्या केल्या, पण तोपर्यंत पाऊस बंद झालेला होता. काही शेतकऱ्यांनी एकदोन महिन्यात पुन्हा पेरणी केली. काहींनी तीन-तीन वेळा पेरणी केली, पण खरीप पिकात शेतकऱ्यांना जो खर्च होता त्यापेक्षा उत्पन्न कमीच मिळाले. कापसाच्या एका एकरात १०-१५ हजार रुपये शेतकऱ्यांनी खर्च केले, पण नंतर त्यांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली.
अवर्षण बघायचे असेल, तर गावातील बोअरवेल पाहा. मालकाकडून बोअरवेलची कहाणी ऐका. तेलंगणातील मेडक जिल्ह्य़ात मकरापेट गावात ९१४ बोअरवेल आहेत, पण त्यातील केवळ १५० चालू आहेत. निजामाबादमधील जुक्कल गावात सगळ्या बोअरवेल अपयशी ठरल्या आहेत. मग पसे गोळा करून लोकांनी कोरडय़ा तलावात बोअरवेल खोदल्या. कारण निदान पिण्याचे पाणी तरी मिळेल अशी अपेक्षा होती. गावातले लोक भूजलस्तराची गोष्ट बोलत नाहीत, बोअरवेलला पाणी नाही अशी तक्रार ते करतात. तेलंगणात काही बोअरवेल २००-३०० फूट खोल आहेत. मराठवाडय़ात तर स्थिती खूप वाईट आहे. परभणी जिल्ह्य़ात एका गावात ६०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल पाहायला मिळाल्या, पण त्यात पाणी नाही. भूजलाची पातळी घसरत चालली आहे, पण १५ दिवसांच्या पावसाने आता त्या काही काळ जिवंत राहतीलही. जलस्तर कमी होत आहे व बोअरवेल खोदल्या जात आहेत. शेतकऱ्यांचा पसा व मन बुडत चालले आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे संकट काही दिवस दूर आहे. आज पिण्याचे पाणी आहे, पण डिसेंबर-जानेवारीत पाणी राहील की नाही याची शाश्वती नाही.
अवर्षण पाहायचे असेल, तर तुम्ही पशूंना शोधा. अजून हे अवर्षण माणसांसाठी दुष्काळ बनलेले नाही, पण पशूंच्या बाबतीत ते दुष्काळात रूपांतरित होऊ लागले आहे. चारा आहे, पण जनावरांना तो पोटभर मिळत नाही. कारण तेवढी आíथक ताकद शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. ज्या तीन राज्यांत आम्ही गेलो. तिथे वारंवार एकच गोष्ट दिसली की लोक त्यांचे गाई, बल, म्हशी या प्राण्यांना विकत होते किंवा दुसरीकडे पाठवण्याच्या प्रयत्नात होते. कर्नाटकात हंचिनाळ येथील देवकी अम्माने बलजोडी ६५ हजार रुपयांना खरेदी केली व ३० हजार रुपयांना विकण्याची वेळ आली. गाई विकलेल्या नाहीत तर त्या पशूंसाठीच्या चारा छावण्यांत पाठवण्यात आल्या आहेत, ही महाराष्ट्रातील स्थिती आहे. चारा छावण्यांमध्ये चारा व्यवस्थित मिळत नाही, त्यामुळे गाईंचे दूध कमी होत चालले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत ही पाळीव जनावरे उपासमारीने मरतील अशी भीती वाटते.
अवर्षणाचे दुष्काळात कसे रूपांतर होते हे पाहायचे असेल, तर मजुरांशी बोला. त्यात शेतमजूर आहेत, अल्पभूधारक शेतकरी नंतर मजूर म्हणून काम करीत आहेत. पिकेच गेल्याने त्यांना मजुरी मिळत नाही. महिलांची मोलमजुरीही हिरावली गेली. अशा स्थितीत मजूर मोठय़ा आशेने सरकारकडे पाहतात. रोजगार हमी योजना ‘मनरेगा’ या मजुरांना काम मिळावे म्हणूनच तयार करण्यात आली. आज मनरेगाच्या मजुरीची आवश्यकता या लोकांना आहे, पण ही योजना कुठे फारशी दिसत नाही. रोजगार हमीत तेलंगणाची स्थिती अपेक्षेपेक्षा बरी आहे. तेथे अनेक मजुरांना जॉबकार्ड आहे. अनेकांना तीन-चार आठवडे रोजगार मिळत आहे. पसेही पटकन दिले जात आहेत. कर्नाटकात जॉबकार्ड आहेत, पण मजुरांना पुरेसे काम मिळालेले नाही. तीन-चार महिन्यांचे पसे मिळालेले नाहीत. या दोन्ही राज्यांत अवर्षण काळात रोजगार हमीची कामे उपलब्ध करण्यात फारसे यश आलेले नाही.
ज्या महाराष्ट्राने रोजगार हमी योजनेची देणगी देशाला दिली, त्या महाराष्ट्रात याच योजनेची दैनावस्था आहे. रोजगार हमीच्या आधारावरच मनरेगा योजना बेतलेली आहे. महाराष्ट्रात आज मनरेगाची थट्टा चालली आहे. अनेक मजुरांना या योजनेविषयी माहितीच नाही. मोठय़ा प्रमाणात जॉबकार्ड तयार झालेले नाहीत, काहींच्या जॉबकार्डचे नूतनीकरण झालेले नाही. अनेक लोकांना कामच नाही. या अवर्षणात सरकारने रोजगार हमी म्हणजे मनरेगा लागू करण्याचा प्रयत्नच केलेला दिसत नाही. रोजगार हमीचा उद्देशच मुळी दुष्काळी काळात रोजगाराची हमी देणे हा आहे.
ग्रामीण गरिबांसाठी ही योजना आहे, त्यांना मदत व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. आज अवर्षण असताना गरजेच्या वेळी ही योजना राबवली जाते आहे असे दिसत नाही. अनेक लोकांना तर १५-२० दिवसांचा रोजगारही मिळाला नाही. त्यांची अवस्था वाईट आहे. भारत सरकारने रोजगार हमी म्हणजे मनरेगा योजनेत १०० दिवसांऐवजी १५० दिवसांचा रोजगार देण्याची घोषणा जरी केली असली, तरी सध्याची परिस्थिती पाहता त्यामुळे ग्रामीण गरिबांची थट्टाच झाली आहे.
तुम्हाला अवर्षण पाहायचे असेल, तर महिलांच्या नजरेतून पाहा. ज्या महिला रोज डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणतात, त्यांच्याशी बोला. आता त्यांना आणखी दूरवरून पाणी आणावे लागते. आता त्यांची व्रतवैकल्ये-उपासतापास वाढले आहेत. किती तरी मुलींनी शाळेत येणे बंद केले आहे. अनेक घरांत पती-पत्नींची भांडणे वाढली आहेत. भांडणतंटे वाढले आहेत, बायकांना घरात मारहाण होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादी मुलगी सासरी गेल्यानंतर तिला माहेरी आणायला खूप वेळ लागत आहे. गाव व छोटय़ा वस्त्यांमध्ये अन्नाची चोरी वाढली आहे. गुंडागर्दी वाढली आहे.
सूखा पसर रहा हैं.. हमारी आँखों के सामने.. लेकिन हमारी नजरों से ओझल..
अवर्षण बघायचेच असेल, तर कॅमेऱ्याने काढलेल्या छायाचित्रातून बघू नका, मनाच्या नजरने ते बघायला पाहिजे.

लेखक राजकीय-सामाजिक विश्लेषक असून ‘स्वराज अभियान’चे प्रवर्तक आहेत.
त्यांचा ई-मेल yogendra.yadav@gmail.com