प्रत्यक्षात धर्मनिरपेक्ष राजकारण म्हणजे अल्पसंख्याकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे. सुरुवातीला अल्पसंख्याकांच्या न्याय्य हितांचे रक्षण करण्यापासून हे राजकारण सुरू झाले, पण नंतर योग्य-अयोग्य याच्या सीमारेषा पुसट झाल्या.

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्या वेळी एका धर्मनिरपेक्ष मित्राशी माझी गाठ पडली. त्याच्या चेहऱ्यावर उदासी होती. तो हताश वाटत होता.  आदित्यनाथांचा विषय काढताच तो उसळून म्हणाला, ‘‘देशात खुलेपणाने धार्मिकतेचा विजय होत आहे आणि तुमच्यासारखे लोक धर्मनिरपेक्षतेवर टीका करतात तेव्हा जरा जड वाटू लागते. मी बेचैन होतो.’’ टीका तर ज्याच्याविषयी आस्था असते त्याच्यावरच आत्मीयतेपोटी केली जाते. जर तुम्ही कुठल्या विचारधारेशी संलग्न असाल तर त्या विचारसरणीमधील दोष व संकटे याबाबत तुम्ही  प्रामाणिकपणे विचार करणे हे तुमचे कर्तव्य आहे. धर्मनिरपेक्षता हा या देशातील पवित्र सिद्धांत आहे. ज्यांना त्याबाबत आस्था आहे त्यांनी त्यावर पाखंडी राजकारण होत असेल तर त्याचा बुरखा फाडणे आवश्यक आहे, किंबहुना ते त्यांचे कर्तव्य आहे. माझा मित्र काही समाधानी नव्हता. त्याला काही केल्या माझे म्हणणे पटेना.

तो म्हणू लागला, आता या सगळ्याची जिलबी करून गोंधळ घालू नकोस. सरळ सरळ सांग, आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याने तुला भीती वाटत नाही का? मी साधेपणाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. मी सांगितले की, भीती तर वाटत नाही, पण वाईट जरूर वाटते. ज्याला या देशाचा अभिमान वाटतो त्याला अशा कुठल्या नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळाले तर त्यात शरम वाटली तर त्यात अयोग्य काय. ज्याला योगात सम्यक भाव महत्त्वाचा असतो हे माहिती आहे, तो आदित्यनाथांना योगी कसे मानू शकतो. जो धर्माला आत्म्यात नाही तर कपडय़ात शोधण्याचा घृणास्पद प्रकार करतो त्याला धार्मिक कसे म्हणता येईल.

आता त्याच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी थोडी आत्मीयता दिसत होती. तो म्हणाला, की सरळ सांग ना, की मोदी, अमित शहा व संघ परिवार देशाचे तुकडे करण्यावर टपले आहेत.

मी त्याच्याशी सहमत नव्हतो. धर्मनिरपेक्षतावादी असे मानतात, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गैरप्रचार, संघ परिवाराची कुटिल कारस्थाने व भाजपचे राजकारण यामुळे आज धर्मनिरपेक्षतावादाला संकटात टाकले आहे; पण इतिहासात जे लोक हरतात ते आपल्या विरोधकांना दोष देत राहतात. देशात धर्मनिरपेक्षतावाद स्वत:च्याच एकांगी विचाराने कमकुवत बनला आहे, धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या ढोंगी राजकारणामुळे धर्मनिरपेक्षतावाद संकटात आहे.

मी जे सांगितले ते त्याला समजले नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते, म्हणून मी जरा अधिक स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. संकटाच्या या क्षणी धर्मनिरपेक्ष राजकारण दिशाहीन आहे, ते भीतीने थिजून गेले आहे. लोकमानसात व रस्त्यावर येऊन धार्मिक राजकारणाला विरोध करण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष राजकारणी लोक सत्तेच्या वर्तुळात त्याला विरोध करण्याचा सोपा मार्ग निवडीत आहेत. भाजपच्या प्रत्येक लहानसहान पराभवात धर्मनिरपेक्षतावादी हे आपला विजय शोधत आहेत. प्रत्येक मोदीविरोधकाला ते नायक बनवायचा मोह टाळू शकत नाहीत. धर्माधिष्ठित राजकारण त्यांच्या कुटिल कारस्थानासाठी संकल्पबद्ध आहे एवढेच खरे आहे. त्यामुळे आत्मविश्वास व संकल्प, निर्धार नसलेले  धर्मनिरपेक्ष राजकारण असत्याचा आधार घेण्यात अपरिहार्यता मानते आहे. धार्मिक राजकारण नवे डावपेच शोधत आहे, आपली लढाई आपल्याच मैदानात लढत आहे. धर्मनिरपेक्षता काही सीमारेषांनी बद्ध आहे, दुसऱ्याच्या हद्दीत जाऊन लढाई हरण्याचा अभिशाप तिला आहे. धार्मिक राजकारण हे आक्रमक असते, तर धर्मनिरपेक्षता ही बचावात्मक असते.

फार डोक्यावरून जाणाऱ्या गोष्टी करता राव.. या मुद्रेत मित्र होता. तो हे ठरवू शकत नव्हता, की आता मी त्याचा शत्रू की मित्र. त्यामुळे शेवटी मी इतिहासाची साक्ष काढण्याचे ठरवले. स्वातंत्र्यापूर्वी धर्मनिरपेक्ष भारताचे स्वप्न हे राष्ट्रीय आंदोलनाचा एक भाग होते व सगळ्या धर्मात सामाजिक सुधारणा व्हाव्यात असे अपेक्षित तरी होते. स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतावादाची देशाच्या मातीशी असलेली नाळ तुटली. धर्मनिरपेक्षतावाद्यांनी असा समज करून घेतला की, राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेचे आश्वासन दिलेले आहे, त्यामुळे त्यावर आधारित भारत हा धर्मनिरपेक्ष भारतच आहे. त्यासाठी आता वेगळे काही करायची गरज नाही.  सेक्युलरवाद म्हणजे धर्मनिरपेक्षता असे म्हटले जाते, हा याच उधार-उसनवारीचा परिणाम आहे. धर्म, पंथ यापासून फटकून राहणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असे समीकरण रूढ झाले.

धर्मनिरपेक्षता म्हणजे नास्तिक बनणे किंवा अनेक भारतीय लोकांची जी आस्था आहे त्यापासून फटकून राहणे असा घेतला गेला. धर्मनिरपेक्षता ही भारताच्या जनमानसापासून तुटत गेली. आता माझ्या मित्राला राहवले नाही. तो म्हणाला की, याचा अर्थ धर्मनिरपेक्षता हे मतपेढीचे राजकारण आहे असेच तुला वाटते आहे. मी म्हणालो, पण ते कटुसत्य आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात धर्मनिरपेक्षता हा काहीसा जोखमीचाच सिद्धांत होता. स्वातंत्र्यानंतर तो सोयीच्या राजकारणाच्या दावणीला बांधला गेला. निवडणुकीच्या राजकारणात अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी धर्मनिरपेक्षता हे एक गुळगुळीत घोषवाक्य बनले.

स्वातंत्र्यानंतर मुस्लीम समाज उपेक्षा, मागासलेपणा व सापत्नभावाचा शिकार ठरला. देशाचे विभाजन झाल्याने या नेतृत्वहीन समाजाला शिक्षण व रोजगार संधीची गरज होती, पण त्यांच्या या मूलभूत गरजा पूर्ण न करताच त्यांची मते हडपण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचे पांघरूण केले गेले. मुसलमानांची मते आपल्या मुठीत ठेवणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता असा चुकीचा अर्थ रूढ झाला. मुस्लिमांना भीतीच्या छायेत ठेवायचे, दंगे व हिंसाचाराची भीती दाखवायची व त्यांची मते झोळीत पाडून घ्यायची, असा परिपाठ राजकारणात सुरू झाला. परिणामी मुस्लीम राजकारण हे त्यांच्या मूळ प्रश्नांचा विचार न करता त्यांची सुरक्षा, त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिकतेचे रक्षण यात गुंतत गेले. उर्दू भाषा, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, विवाह कायदे याभोवतीच हे राजकारण घोटाळत राहिले. जो खेळ काँग्रेसने प्रथम सुरू केला तो नंतर समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जनता दल संयुक्त व डाव्यांनी सुरू केला.

भीतीपोटी मुस्लीम समाज कथित धर्मनिरपेक्ष पक्षांचा ओलीस बनला. मुसलमान मागासतच गेले व धर्मनिरपेक्षता चारी अंगांनी बाळसे धरू लागली. मुस्लीम समाज उपेक्षा व भेदभावाचा बळी ठरला, पण ते ज्यांना मते देत होते त्या राजकीय नेत्यांचा मात्र विकास होत गेला. मतपेढीच्या या घृणास्पद राजकारणाला धर्मनिरपेक्ष राजकारण असे समजले जाऊ लागले. प्रत्यक्षात धर्मनिरपेक्ष राजकारण म्हणजे अल्पसंख्याकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे. सुरुवातीला अल्पसंख्याकांच्या न्याय्य हितांचे रक्षण करण्यापासून हे राजकारण सुरू झाले, पण नंतर योग्य-अयोग्य याच्या सीमारेषा पुसट झाल्या. प्रत्येक हितरक्षणाला धर्मनिरपेक्षतेचे बिरुद लागले. हळूहळू काही हिंदूंना असे वाटू लागले, की धर्मनिरपेक्ष लोक एक तर अधर्मी किंवा विधर्मी आहेत. त्यांना धर्मनिरपेक्षता म्हणजे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन हाच एक अर्थ अभिप्रेत होत गेला. आपल्याला दावणीस बांधणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असा अर्थ मुस्लिमांना वाटू लागला. त्यापेक्षा, आपल्या समाजाचा स्वतंत्र पक्ष असलेला चांगला असे त्यांना वाटले. अशा प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा एक पवित्र सिद्धांत देशाला थोतांडाचे ग्रहण लावून गेला. याचा अर्थ आपण योगी आदित्यनाथांना धन्यवाद दिले पाहिजेत की, त्यांनी आपले डोळे उघडले असे तुझे म्हणणे आहे तर.

एवढे बोलून मित्र, माझ्या उत्तराची वाट न पाहता पुढे चालू लागला. मला वाटले त्याच्या चेहऱ्यावर आता आधीइतकी हतबलता नव्हती, त्याच्या चालीत एक जोश, डौल होता..

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

लेखक स्वराज  इंडियाचे अध्यक्ष आहेत.