तीन वर्षांपूर्वी आक्रोशाची आग असलेली ‘निर्भया’ आता जीवनदात्री ‘ज्योती’ बनली आहे, तिचा प्रकाश कमी झालेला नाही, आता ती केवळ आग नाही तर प्रकाशही देत आहे.. पण गेल्या आठवडय़ात जंतरमंतर येथे जी निदर्शने झाली, त्यावरून तर आपण या ज्योतीच्या प्रकाशातून काही शिकलो असे वाटत नाही. मुद्दा केवळ सुटकेपुरताच मानायचा का? स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आणि अत्याचारांवर जरब बसवण्यासाठी न्या. वर्मा समितीने केलेल्या शिफारशी धूळ खात पडल्या, याची आठवण कुणाला आहे का? महिलांच्या सुरक्षेबाबतची निष्क्रियता लपवण्याची संधी आपण सरकारला देतच राहणार का?

‘निर्भया’ आता ज्योती बनली आहे. तिला बदला नको तर बदल हवा आहे. तीन वर्षांपूर्वी दिल्लीत चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला प्रसारमाध्यमांनी ‘निर्भया’ असे संबोधणे सुरू केले. गेल्या आठवडय़ात तिच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की, आम्ही तिची ओळख लपवू इच्छित नाही. आमच्या मुलीचे नाव ज्योती सिंह होते. आमच्या मुलीला यापुढे ज्योती या नावानेच ओळखले जावे, अशी इच्छा तिच्या आई-वडिलांनी बोलून दाखवली. ‘निर्भया ते ज्योती’ हा प्रवास एका नावाचा आहे; तो केवळ नावाचा बदल एवढाच मर्यादित राहील की त्यामुळे खरोखरच समाजात बदल होईल, हा प्रश्न आहे. गेल्या आठवडय़ात या हत्याकांडातील गुन्हेगार मुलाच्या सुटकेवरून जी निदर्शने झाली व संसदेत चर्चा होऊन अखेर राज्यसभेनेही बालगुन्हेगार कायद्यात बदल सुचवणारे विधेयक मंजूर केले, त्यानंतरही सामाजिक बदलाची अपेक्षा करणारा प्रश्न उपस्थित करणे सयुक्तिक आहे.
तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील रस्त्यांवर हिंसेला बळी पडलेल्या मुलीला बिचारी मानण्याऐवजी तिला ‘निर्भया’ नाव देणे हा एका संकल्पाचा भाग होता. या घटनेने व्यथित होऊन पेटून उठलेल्या युवा पिढीच्या आक्रोशाने महिलांविरोधातील हिंसाचाराला देशातील एक मोठा प्रश्न म्हणून सामोरे आणले. लोकांच्या श्रद्धांजलीने निर्भयाला हौतात्म्याचा मान मिळाला. निर्भयाच्या मृत्यूने पेटवलेली मशाल सगळ्या देशात महिलांच्या असुरक्षिततेविरोधात संकल्पाची प्रतीक बनली. या निर्भयाने अनेक महिलांना भीती व लोकलज्जेच्या जोखडातून मुक्त केले. असे असले तरी ‘निर्भया’ या शब्दातच भय हा शब्द आहे. त्यामुळे ‘निर्भया’ हे नाव आपल्या सगळ्यांना संताप, आक्रोश व सुडाच्या दिशेने घेऊन जाते. ज्योती हे नाव मात्र सकारात्मक विचाराकडे आपल्याला खेचून नेते. निर्भया ज्या भयापासून मुक्त होऊ इच्छित होती त्याकडे आपले लक्ष वेधते, तिथे मागे वळून पाहण्याचा विचार मनात येतो. ‘ज्योती’ नावात मागे न पाहता पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो. ‘निर्भया’ एका सुडाचे आव्हान देते, पण ‘ज्योती’ जगात बदल घडेल अशी आशा दाखवते. तीन वर्षांपूर्वी आक्रोशाची आग असलेली ‘निर्भया’ आता जीवनदात्री ‘ज्योती’ बनली आहे, तिचा प्रकाश कमी झालेला नाही, आता ती केवळ आग नाही तर प्रकाशही देत आहे.. पण आपण या ज्योतीच्या प्रकाशाकडे बघायला तयार आहोत का?
गेल्या आठवडय़ात जंतरमंतर येथे जी निदर्शने झाली, त्यावरून तर आपण या ज्योतीच्या प्रकाशातून काही शिकलो असे वाटत नाही. त्या लोकांवर निर्भयाचीच छाया होती. ज्योतीने निर्माण केलेली दृष्टी त्यांच्यात अनुभवाला येत नव्हती. तीन वर्षांपूर्वी इंडिया गेट येथे जी निदर्शने झाली त्यात मी सहभागी होतो, आम्ही लाठय़ा खाल्ल्या व त्यात गळ्याचे हाड मोडले. त्यामुळे आजही मी निदर्शकांचा संताप समजू शकतो. आता त्या घटनेला तीन वर्षे लोटली, तरी महिलांच्या सुरक्षेत काही सुधारणा झालेली नाही. प्रत्येक दिवशी महिला व मुलींविरोधात िहसेच्या बातम्या येतच आहेत. सरकार व राजकीय पक्ष यांच्यात या प्रश्नावरून खो-खो सुरू आहे. अशा परिस्थितीत जेव्हा एका गुन्हेगाराच्या सुटकेची बातमी येते तेव्हा संताप येणे नैसर्गिक आहे. मुलीच्या आईने आमचा लढा व्यर्थ ठरला, असे म्हटले तर तेही बरोबरच आहे, तिची व्यथा मी समजू शकतो.

निर्भयाचा आत्मा आपल्याला मशाल हातात घेण्यास सांगतो. निर्भयाच्या बाबत जी घटना घडली त्यात क्रूरता अधिक होती. त्या घटनेत जास्त क्रूरता प्रौढ गुन्हेगारांपेक्षा त्या किशोरवयीन गुन्हेगाराने दाखवली होती, त्यामुळे निर्भयाची आठवणच त्या अल्पवयीन गुन्हेगाराला गजाआड ठेवण्याची अपेक्षा करते.. पण ज्योती आपल्याला तसे करण्यापासून रोखते. आपल्याला पापाचे निर्दालन करायचे आहे, पाप्याचे नाही. तिच्या दु:खापलीकडे जाऊन ती हेच पाहते, की तो अल्पवयीन गुन्हेगारही बालपणी अशाच हिंसेचा बळी ठरला होता, त्या हिंसेतून हिंसेने जन्म घेतला. ज्योतीचा आत्मा आपल्याला हेच सांगत आहे, की आपण हिंसा-प्रतिहिंसेचे हे दुष्टचक्र थांबवले पाहिजे. न्यायाचा उद्देश जर गुन्हेगाराला शिक्षा देण्याऐवजी गुन्हे रोखण्याचा असेल, तर त्या मुलाचा बदला घेण्यापेक्षा त्याला बदलण्याची संधी मिळायला हवी.
सरकार व संसद हे सध्या जे काही करीत आहेत त्यावरून तरी असे काही वाटत नाही. समाजाचे लक्ष केवळ चार गुन्हेगारांवर असून चालणार नाही तर गुन्ह्य़ांना जन्म देणाऱ्या सगळ्या व्यवस्थेवर असले पाहिजे याचीच आठवण ज्योती देत आहे. गेल्या तीन वर्षांत सरकार व राजकीय पक्षांनी महिला सुरक्षेच्या विषयावर अनेक वक्तव्ये केली पण त्या दिशेने एकही ठोस पाऊल टाकले नाही. निर्भया आंदोलनामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत न्या. जे. एस. वर्मा समितीचा अहवाल सादर केला गेला, ती सर्वात महत्त्वाची बाब होती. दिवंगत न्या. वर्मा, न्या. लीला सेठ व गोपाळ सुब्रह्मण्यम यांच्या समितीने महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी अनेक सूचना केल्या होत्या.. पण आजही तो अहवाल धूळ खात पडून आहे. जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्यांना ज्योती हेच सांगू शकते, की त्या मुलाच्या सुटकेऐवजी तो अहवाल असा धूळ खात पडला आहे तो मुख्य मुद्दा चर्चेत आणावा.
ज्योतीचा आत्मा संसदेला काही गोष्टींचे स्मरण करून देत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली बाल गुन्हेगाराचे वय १८ वरून १६ पर्यंत खाली आणले जात आहे. याचा अर्थ असा, की १६ ते १८ या वयोगटांतील मुलांना प्रौढ गुन्हेगार समजून त्यांच्यासारखीच शिक्षा दिली जाईल. लोकसभेत हा बदल करणारे विधेयक मंजूर झाले आहे. फक्त गेल्या आठवडय़ातील निदर्शनानंतर सरकारने आता हे विधेयक राज्यसभेत पुन्हा आणले आणि या वरिष्ठ सभागृहानेही ते घाई-गडबडीत मंजूर करून टाकले. न्या. वर्मा समितीने या प्रश्नावर विचार करून असे म्हटले होते की, बाल गुन्हेगाराचे वय १८ ऐवजी १६ करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे चुकीच्या संगतीने गुन्हे करणाऱ्या मुलामुलींना सुधारण्याची संधीच मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय कायदाही याच्या विरोधात आहे, संसदीय समितीनेही हे वय १८ वरून १६ करण्याच्या विरोधातच शिफारस केली होती. असे असतानाही सरकार व काही राजकीय पक्ष हा कायदा मंजूर करून घेण्यासाठी हटून बसले, जंतरमंतरवरचा आक्रोश शांत व्हावा व महिलांच्या सुरक्षेबाबतची निष्क्रियता लपून जावी हा त्यामागचा हेतू होता.
राज्यसभेत जेव्हा हे विधेयक चर्चेला आले, तेव्हा ज्योती सिंह या मुलीचे माता-पिता प्रेक्षक सज्जात उपस्थित होते. अखेर विधेयक राज्यसभेत मंजूर झालेच. निर्भयाची छाया या विधेयकावर होती. ज्योतीही या वेळी उपस्थित होती का?
निर्भया व ज्योती ही एकाच मुलीची दोन नावे नाहीत असे मला वाटते..
* लेखक राजकीय-सामाजिक विश्लेषक असून ‘स्वराज अभियान’चे प्रवर्तक आहेत.
त्यांचाई-मेल yogendra.yadav@gmail.com