13 August 2020

News Flash

कॉफी आणि बरंच काही..

वारसा आणि संस्कृती या गोष्टी प्रत्येक अरब व्यक्तीच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असतात.

अरब बँक, अरब हॉटेल असो वा समारंभ, खजूर आणि कॉफी यांची उपस्थिती असतेच असते.

वारसा आणि संस्कृती या गोष्टी प्रत्येक अरब व्यक्तीच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असतात. देशाची संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज

आणि त्याबद्दल खोल जागरूकता हे इथल्या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. अरब म्हटल्यावर भाषा, पेहराव, शिष्टाचार या पटकन नजरेत येणाऱ्या खुणांशिवाय आठवतात ते खजूर आणि कॉफी. अरब घर असो वा

अरब बँक, अरब हॉटेल असो वा समारंभ, खजूर आणि कॉफी यांची उपस्थिती असतेच असते.

वाळवंटाच्या रखरखीत आणि खडतर जीवनमध्ये प्रचंड ग्लुकोजचा साठा असलेल्या आणि मुबलक प्रमाणात पिकणाऱ्या खजुराचे महत्त्व तर निर्विवाद आहेच, पण आज आपण कॉफीचा आस्वाद घेणार आहोत. १५व्या शतकात येमेनच्या सूफी मठामध्ये कॉफीचा वापर प्रथम सुरू झाला आणि १६व्या शतकापर्यंत कॉफीचा हवाहवासा वाटणारा सुगंध येमेननजीकच्या सगळ्याच अरब देशांमधे दरवळू लागला. आज कॉफी जगभर प्रसिद्ध आहे किंबहुना ती बऱ्याच जणांच्या दैनंदिनीचा एक सहज भाग झाली आहे, पण तिला पहिल्यासारखा दिलेला मानसन्मान अरब देशात आजही पाहायला मिळतो. घरी आलेल्या प्रत्येकाला कॉफी व खजूर देण्याची इथे प्रथा आहे. नाजूक कलाकुसर केलेल्या सूराहीमधून छोटय़ा छोटय़ा कान नसलेल्या कपामध्ये फक्त काही घोटच कॉफी दिली जाते. मोठय़ा मगमधून कॉफी पिणाऱ्या मला प्रथम या छोटय़ाशा कपाची आणि त्याहून त्यातील तळाशी असलेल्या त्या थोडय़ा कॉफीची गंमतच वाटली. मग पहिला घोट घेताच कारण उमजले. ही कोरी कॉफी थोडी उग्र आणि कडवट असते. त्यात बऱ्याचदा वेलची, लवंग आदी मसालेही मिसळलेले असतात. तसेच ती खूप गरम असताना दिली जाते, त्यामुळे देणारा माणूस थोडी थोडी देत असतो. जोवर तुम्ही हाताने इशारा करून ‘बस झाले’ असे सांगत नाही तोवर कॉफी देत राहण्याची पद्धत आहे. इतक्या उष्ण देशात कॉफीचा आग्रह जरा आश्चर्यजनक वाटू शकतो, पण कॉफीला ‘हॉट ड्रिंक दॅट कूल्स यू’ असे म्हणतात, हे मला इथे आल्यावर कळले. कॉफीमुळे जो जास्त घाम येतो, त्यामुळे शरीराचे तापमान कमी व्हायला मदत होते.

कॉफीप्रमाणेच ‘शाय’ किंवा ‘चाय’- म्हणजे तुमचा आमचा चहासुद्धा इथल्या संस्कृतीत चांगलाच रुळलाय. चीनमधून पर्शियन लोकांनी चहा अरब जगात आणला. तेव्हाच त्याचे नाव ‘चाय’ असे पडले. ज्याचा फारसी भाषेत शब्दश: अर्थ ‘हिरवा रस’ असा होतो. दूध न घातलेल्या चहाला ‘सुलेमानि’ असे म्हणतात, जो इथले स्थानिक खास पसंत करतात. तर भारतीय पद्धतीचा दूध आणि वेलची, केशर वा इतर मसाले घातलेला चहासुद्धा इथे ‘करक चाय’ म्हणून सर्वत्र मिळतो. सुपरमार्केटमध्ये तर एकाहून एक फ्लेवरचे चहा उपलब्ध असतात. व्यापाराच्या दृष्टीनेही चहाला यूएईमध्ये विशेष महत्त्व आहे. चीन, भारत, श्रीलंका आणि केनियामधून आयात केलेला चहा, बऱ्याच देशांना पुन्हा निर्यातही केला जातो. अधिकृत आकडेवारीप्रमाणे, यूएई हा देश स्वत: दररोज २० किलो चहा वापरतो, तर प्रत्येक दिवसाला जगभर ३ अब्ज कप चहा पुरवतो. पण तुम्ही चहा/कॉफी घेतच नसाल तर? तर मात्र जरा अवघड आहे. चहा किंवा कॉफी ऑफर केल्यावर ‘नाही’ म्हणणे इथे अपमानकारक आणि उद्धटपणा मानला जातो. त्यामुळे औपचारिकता म्हणून का होईना घोटभर चहा घ्यावाच लागतो.

दुबईचे वातावरण उष्णकटिबंधीय, वाळवंटाचे असल्याने बरीच पारंपरिक शीतपेये येथे प्रचलित आहेत. प्रामुख्याने रमझानच्या महिन्यात दिवसभर निर्जल उपास केल्यामुळे उपास सोडताना इफ्तरीला आकर्षक रंगातील आणि तितकीच स्वादिष्ट शीतपेये मिळतात. यात खास आवडीची म्हणजे ‘जेल्लब’ आणि ‘कम्मरदीन’. जेल्लब द्राक्षाची काकवी आणि गोड, थंड गुलाब जलाचे मिश्रण असते. काही प्रांतात त्यात खजुराचा रसही मिसळला जातो. पण या कॉकटेलमध्ये जेव्हा पाइन आणि मनुकांचे भरपूर तुकडे घातले जातात तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने जेल्लब असे म्हणता येते. कम्मरदीन किंवा कम्मर-अल-दिन हा जर्दाळूचा ज्यूस असतो. आंबापोळीसारखीच इथे जर्दाळू सुकवून केलेली पोळी मिळते, तिला रात्रभर पाण्यात भिजवून कधी खजूराबरोबर तर कधी गुलाब जलाबरोबर घुसळले जाते. आणखी एका शीतपेयाने माझे लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे ‘तमार हिंदी’. हे पेय चिंचेच्या कोळापासून बनवतात. आंबट, गोड आणि थंड अशा या पेयाच्या फक्त वासानेही तोंडाला पाणी सुटते. आश्चर्य म्हणजे तमार हिंदी या शब्दाचा अर्थ आहे ‘भारतीय खजूर’ आणि त्यावरूनच इंग्रजीमध्ये ‘टॅम्रिंड’ हा शब्द पुढे प्रचलित झाला. पण चव, सुगंध, नाव याव्यतिरिक्त याची खासियत आहे ते विकणारा किंवा वाटणारा विक्रेता, आणि त्याची भलीमोठी सूराही. पाठीवर जवळजवळ त्याच्याच उंचीची लखलखीत आणि सुशोभित सूराही घेऊन तो आपल्या मिश्यांना पीळ देत, हसत-खेळत मस्ती करत रस्त्यावर हे पेय विकताना दिसतो. हे मुळात इजिप्शियन पेय आहे.

ही झाली इथे सहज मिळणारी पेये, पण ड्रिंक्स म्हटल्यावर आठवतात ती अल्कोहोलिक ड्रिंक्स, ज्यांना येथील बऱ्याच प्रांतात बंदी आहे. इस्लाम धर्मात अल्कोहोल वज्र्य आहे, आणि इस्लामिक धर्माच्या माणसांसाठी इथे हा एक शिक्षापात्र गुन्हा आहे. अल्कोहोल या शब्दासोबत मात्र अरब जगाचे जुने नाते आहे. अशी समजूत आहे की, इस्लामपूर्व काळात अल्कोहोल हा शब्द अरेबिक अल-कोहोलमधून प्रचलित झाला. अल-कोहोल एक प्रकारचे काजळ होते, ज्यात एथेनॉल (अल्कोहोलचे शास्त्रीय नाव) मिसळले जात. पुढे अल्कोहोलवर बंदी आल्याने नॉन-अल्कोहोलिक पेये कदाचित जास्त प्रचलित झाली असावीत. आज सुपरमार्केटमध्ये दालने भरभरून वेगवेगळ्या प्रकारची पेये बघायला मिळतात. लबान (ताक), ज्यूस, निरनिराळे अर्क, सॉफ्ट ड्रिंक्स, रूट बियर, असंख्य प्रकारचे चहा, कॉफी. मुळात अरबी माणूस हा तसा अगत्यशीलच. त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरात अरबी व्यक्तीशी भेट झाली आणि त्याने तुम्हाला पेय ऑफर केले नाही असे होत नाही. जर कधी यूएईमध्ये आलात आणि अगदी अरबी व्यक्तीशी तुमची भेट झाली नाही तरी इथल्या मातीतल्या अरबी हॉटेलना अथवा कॅफेना आवर्जून भेट द्या आणि इथल्या अन्य पेयांबरोबरच इथल्या कॉफीची काहीशी अनवट, कडवड पण दीर्घकाळ जिभेवर रेंगाळेल अशी चव चाखण्यास विसरू नका!

-शिल्पा कुलकर्णी-मोहिते, दुबई
shilpa@w3mark.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2015 1:28 am

Web Title: article on arab country
Next Stories
1 तिसऱ्या जगातील नागरिकांच्या समस्या
2 कोलंबस आणि अमेरिका
3 सेल्फी  ‘स्वयं’सेवक
Just Now!
X