09 August 2020

News Flash

बीइंग वुमन..

आता किमान दीड दशक तरी दुबईतच राहावे लागेल असा आयुष्याचा रोडमॅप निश्चित झाला होता.

१८१९ साली ब्रिटिश सैन्याने अरब बंदरांवर हल्ले केले तेव्हा अरब पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इथल्या स्त्रियाही लढल्या होत्या.

आता किमान दीड दशक तरी दुबईतच राहावे लागेल असा आयुष्याचा रोडमॅप निश्चित झाला होता. सर्वाचे प्रेम घेऊन तिथे गेले. पण आठ महिन्यांनी एका घरगुती समारंभानिमित्ताने भारतात परत आले. रात्री गप्पांचा फड जमला. खरे तर तो माझ्या मुलाखतीचाच कार्यक्रम. साधारण प्रश्न होते ते- तिथे भीती वाटत नाही ना? बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? स्त्रियांवर खूप बंधने आहेत का? वगैरे वगैरे.. या प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर होते- अजिबात नाही. उलट, जास्त सुरक्षित वातावरण आहे. स्त्रियांकडे आदराने पहिले जाते. मी काहीच तक्रार नाही म्हटल्यावर भोवतालच्या मंडळींनी आपला मोर्चा दुबईतील स्थानिक महिलांच्या दिशेने वळवला आणि आपला मुद्दा रेटून मांडण्यास सुरुवात केली. त्यांच्या मते, तिथल्या अरबी महिलांचे आयुष्य कष्टप्रद असते, शोषण आणि अत्याचारांच्या विविध पायऱ्यांवर त्या उभ्या दिसतात. दुबई हे असे शहर आहे, जिथे स्थानिकांचे प्रमाण कमी आहे आणि जगभरातून आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यात इथला स्थानिक समाज तसा स्वत:च्याच कोषात जगणारा आणि गोपनीयताप्रिय. भाषेची भिंतही मधे उभी. नातेवाईकांच्या या प्रश्नांचा तिढा मला सोडवता आला नाही, पण प्रश्नांचे जंजाळ घेऊन जेव्हा दुबईला परतले तेव्हा याची माहिती घेण्याचं ठरवलं. ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या अरबी मैत्रिणीची भेट घेतली. तिने माझे प्रश्न ऐकल्यावर सांगितले की, दुबईत एक छान वुमन्स म्युझियम आहे. तिथे तू जा, ते बघ आणि आमच्या संस्कृतीची किमान माहिती घे आणि मग आपण यावर चर्चा करू.
‘वुमन्स म्युझियम’ हा शब्द आणि त्याद्वारे डोळ्यांसमोर उभे राहणारे कल्पनाचित्र तरी रम्य होते. त्याच आठवडय़ाच्या सुटीत तिथे जाण्याचा प्लॅन ठरला आणि या तीन मजली दुबई वुमन्स म्युझियममध्ये मी शिरले आणि समोर आला तो आखाती स्त्रियांचा लखलखता इतिहास!
१८१९ साली ब्रिटिश सैन्याने अरब बंदरांवर हल्ले केले तेव्हा अरब पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इथल्या स्त्रियाही लढल्या होत्या. पुढे १९५६ साली जेव्हा अरब राष्ट्रवाद आणि तंटे जोरात सुरू होते तेव्हा एमिराती स्त्रियांनी रेडिओ व वर्तमानपत्रांतून आपली मते, आपला आवाज जनतेपर्यंत पोचवला. त्यांचे चेहरे जरी झाकलेले असले तरी त्यांचा आवाज कधीच दाबून ठेवला गेला नाही. १९७१ मध्ये जेव्हा इराणने घुसखोरीचे प्रयत्न केले तेव्हा इथल्या शाळकरी मुली त्याविरुद्ध मोर्चा काढून प्रथमच रस्त्यावर उतरल्या होत्या. असे कित्येक दाखले हेच सिद्ध करतात, की एमिराती स्त्रियांचे सक्षमीकरण खूप आधीपासून झाले होते. त्यांच्या पासपोर्टमध्ये फोटो यायला जरी १९७५ साल उजाडले असले तरी १९५६ पासून पासपोर्टवरील त्यांच्या सह्या त्यांच्या सुशिक्षित असल्याची ग्वाही देतात.
स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत युएई हा देश खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे. १९३५ पासूनच मुलींच्या शिक्षणाचे शारजा इथे पहिले पाऊल उचलण्यात आले. कुवैत सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी निधी आणि संसाधने उपलब्ध करून दिली. आणि मग बघता बघता शारजा, दुबई आणि सगळ्या एमरेट्समध्ये मुलींसाठी शाळा सुरू झाल्या. सुरुवातीला १३:१ असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनीचे प्रमाण दहा वर्षांत २:१ वर येऊन ठेपले. याचे श्रेय यूएईचे राष्ट्रपिता शैख झायद यांना जाते. त्यांनी लोकांना भेटून, त्यांची समजूत घालून त्यांना मुलींना शिकायला पाठवण्यासाठी प्रोत्साहित केले. ते म्हणत, ‘स्त्रिया केवळ समाजाचा अर्धा हिस्सा नाहीत, तर त्या पुढच्या पिढीचे संगोपन करायची जबाबदारी उचलतात. भक्कम शिक्षणसंस्था उपलब्ध करून दिल्यास त्या जबाबदार नागरिक घडवू शकतात.’ मोफत प्राथमिक शिक्षणाबरोबरच स्थानिक महिलांना उच्च शिक्षणासाठीही शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. इथल्या शिक्षित स्त्रियांनी सुरक्षा दल, वैद्यकीय, शैक्षणिक, तांत्रिकी अशा प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवला आहे.
राजकारणात एमराती स्त्रियांचे योगदान खूप पूर्वीपासून राहिले आहे. शैख झायद यांच्या आई शैखा सल्मा बिंत बुट्ती यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. लहान असल्यापासूनच आपल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेम जागे ठेवले. त्यांनी शैख झायद व त्यांच्या भावांकडून कुराणाला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करवून घेतली, की ते हे राष्ट्र एक करण्याचा प्रयत्न करतील व शांती आणि सुव्यवस्था याच तत्त्वांवर राज्य करतील. पुढे २००६ साली यूएईमधल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत डॉ. अमल अल् कुबैईसी या निवडून आलेल्या पहिल्या महिला होत्या. त्याचबरोबर आठ अन्य महिलांची या राजांनी नियुक्ती केली. ४० जागांमधील ९ जागा महिलांना मिळाल्याने तब्बल २२.५ टक्के महिला होत्या.
तेलाचा साठा मिळण्याआधी स्थानिकांच्या उदरनिर्वाहाची दोन साधने होती- मच्छिमारी आणि गोताखोरी अर्थात पेर्ल डाइविंग. या व्यवसायांसाठी घरातले पुरुष खूप दिवस समुद्रात असत. अशावेळी स्त्रियांनी फक्त त्यांची घरेच सांभाळली नाहीत, तर व्यापाराचे कौशल्यसुद्धा संपादन केले. कधी मासे आणि खजूर विकून, तर कधी खजूरच्या पानांच्या गृहोपयोगी वस्तू बनवून, कधी कापडाचा आणि अत्तरचा व्यापार करत, तर कधी भरतकामाची सर्जनशीलता दाखवत त्यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली. शैखा बिन्त राकन बीन कम्वाल यांनी १९ व्या शतकापासून औषधे, अत्तर आणि सौंदर्यप्रसाधनांचा उद्योग केला. त्या स्वत: जडीबुटी एकत्र करून ही औषधे बनवत. तर शैखा सना बिन्त मने अल मक्तूम यांनी शिपिंगचा व्यवसाय यशस्वीरीत्या केला. आज जो रियल इस्टेटचा व्यवसाय दुबईत झपाटय़ाने वाढत आहे, त्याला प्रारंभीच्या काळात औशा बिन्त हुसैन लूथा यांनी एक वेगळीच कलाटणी दिली. अशा कित्येक स्त्रियांनी कुशलतेने व्यापार केला आणि पुढच्या पिढीसाठी भक्कम पाया घालून दिला. आज कित्येक महिला उद्योगांत आहेत. त्यांच्या कंपन्या आहेत. त्यांची स्वत:ची एक ओळख आहे. त्यांना निर्णय घ्यायची मुभा आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही इथे मानाचे आणि समानतेचे स्थान आहे. इथल्या कायद्यानुसार स्त्री आणि पुरुष यांना समान वेतनाचा हक्क आहे.
अभिव्यक्तीचा आविष्कार म्हणजे कला. प्रथमदर्शनी इथला समाज जरी रूढीप्रिय आणि चौकटीत जगणारा वाटला तरी शेकडो वर्षांपासून इथे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बघायला मिळते. याचे उदाहरण म्हणजे इथल्या सुप्रसिद्ध कवयित्री औशा बिन्त खलिफा- ज्यांना प्रेमाने ‘अरबकन्या’ असे म्हटले जाते. वयाच्या १३ व्या वर्षांपासून त्यांनी लेखन सुरू केले. त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी त्यांना प्रोत्साहन दिले. पण त्यांचा खरा आदर्श होत्या त्यांच्या आजी- ज्यांनी त्यांना आपल्या भावना बेधडक मांडण्याची शिकवण दिली. औशाच्या कवितांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची अचाट कल्पनाशक्ती. त्यांच्या कवितांमध्ये धर्म आणि शास्त्रातील अशा लोकांबद्दल वर्णन दिसते, ज्यांना त्या कधीच भेटल्या नाहीत. त्यांनी निसर्गावर केलेल्या कविता प्रसिद्ध आहेतच; पण त्याकाळीही सुंदर प्रणयकवितांनी त्यांनी वाचकांना मंत्रमुग्ध केले होते. आजही ९० हून अधिक वय असलेल्या औशा काव्यक्षेत्रात सक्रिय आहेत. चित्रकला, फोटोग्राफी, संगीत, नृत्य, फिल्म मेकिंग इ. क्षेत्रांतही इथल्या महिलांनी आपली सर्जकता दाखवून दिली आहे. सरकारने त्यांच्याकरता २०१३ साली पहिले एमिराती वुमन्स आर्ट एक्झिबिशन भरवले.
स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन अविभाज्य घटक आहेत. स्त्रियांचे समाजात तितकेच महत्त्वाचे स्थान आहे, तिला भावना आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत याचे भान ठेवून यूएई सरकारने सुरुवातीपासूनच समानतेचे आणि समतेचे धोरण ठेवले आहे. आज मिडल- ईस्टच्या सर्व प्रदेशांत यूएईचा जेंडर इक्वालिटी रेशो सर्वात जास्त आहे. स्त्रियांचे साक्षरता प्रमाण ९०% आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रमाण ६६% आहे; ज्यात ३०% स्त्रिया महत्त्वाच्या पदांवर आहेत. आणि आश्चर्य म्हणजे यात एक सहजता आहे. इथल्या दूरदर्शी नेत्यांनी हे सातत्याने समाजात रुजवायचे प्रयत्न केले. याच कारणाने स्त्रियांच्या बुरख्यातूनही त्यांचे डोळे लकाकात असावेत. कारण भरारी घ्यायला लागते ती तीक्ष्ण नजर..

शिल्पा कुलकर्णी-मोहिते
shilpa@w3mark.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2015 12:55 am

Web Title: article on being woman
Next Stories
1 भव्यत्वाची जेथे प्रचीती
2 जहाजांचा सेल
3 जाहीर अवहेलना
Just Now!
X