13 August 2020

News Flash

फ्लोरिडात ‘विनी द पू’ संकटात!

अमेरिकेत डिस्नेनी या पुस्तकावरून १९६० च्या सुमाराला कार्टून्स केली आणि ती तुफान लोकप्रिय झाली.

१९७६ सालापासून फ्लोरिडात अस्वलांच्या शहरातल्या वावरावर लक्ष ठेवलं गेलं आहे

एकंदरीत अमेरिकन लोकांना पशुपक्ष्यांचं, झाडा-वेलींचं प्रेम भरपूर आहे. कुत्रा आणि मांजर हे जरी त्यांच्या विशेष आवडीचे प्राणी असले तरी लहान मुलांची गोष्टींची पुस्तकं आणि डिस्नेच्या कार्टून्समधून इतर प्राणीही लोकांच्या परिचयाचे आणि आवडीचे झालेले दिसतात. ब्लॅक बेअर या जातीची अस्वलं ही मूळची अमेरिकेतली रहिवासी. १९०२ साली प्रेसिडेंट थिओडोर (टेडी) रुझवेल्ट शिकारीला गेले होते. त्यांच्याबरोबर बरेच लोक होते. इतर सर्वाना शिकार मिळाली, परंतु रुझवेल्टना काहीच शिकार मिळाली नव्हती. बरोबर असलेल्या अधिकाऱ्यांनी एक अस्वल जखमी करून झाडाला बांधलं आणि रुझवेल्टना त्याची शिकार करण्याची विनंती केली. रुझवेल्ट यांनी अर्थातच ती विनंती मानली नाही. वर्तमानपत्रांत ही बातमी आली आणि मग कार्टून्समध्ये हे बेअर ‘टेडी बेअर’ या नावाने (जे रुझवेल्ट यांच्या पहिल्या नावाचं संक्षिप्त रूप होतं!) नियमितपणे दिसायला लागलं. त्याचा आकार मात्र लहान पिल्लाचा झाला. लवकरच मार्केटमध्ये स्टफ्ड खेळण्याच्या रूपात टेडी बेअर सगळ्या दुकानांमध्ये आलं.. अजूनही असतं.
ए. ए. मिल्न या इंग्लिश लेखकांनी १९१४ साली आपल्या मुलांच्या खेळण्यांवरून ‘विनी द पू’ नावाचं प्राण्यांवरचं पुस्तक लिहिलं. ‘विनी द पू’ हे अस्वल या गोष्टींतला हीरो. या पुस्तकाचे पुष्कळ भाग त्यांनी लिहिले आणि ते खूप लोकप्रिय झाले. अमेरिकेत डिस्नेनी या पुस्तकावरून १९६० च्या सुमाराला कार्टून्स केली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. अमेरिकन लोकांच्या ब्लॅक बेअरच्या जवळिकीची ही सुरुवात होती.
जगातील ५५ टक्के काळे बेअर्स कॅनडामध्ये, ४० टक्के अमेरिकेत आणि पाच टक्के मेक्सिकोमध्ये आढळतात. अमेरिकेत फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, मेन आणि आणखी जवळजवळ २५ राज्यांमध्ये ब्लॅक बेअर्स आहेत. ब्लॅक बेअर्स बहुतेक वेळा काळ्या रंगाची असली तरी तपकिरी आणि श्वेत रंगाची ब्लॅक बेअर्सही दिसतात. अमेरिकेतील हा आकाराने मोठा असलेला प्राणी जास्तकरून भाज्या, फळं, कीटक, लहान प्राणी खातो. अमेरिकेत आढळणारं काळं अस्वल तसं निरुपद्रवी आहे. कँपिंगला जाणाऱ्या लोकांना ब्लॅक बेअरपासून सावध राहावं लागतं याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या खाण्या-पिण्याच्या चिजा. फ्लोरिडातली अस्वलं नरभक्षक नाहीत; पण त्यांचा प्रचंड आकार लोकांना घाबरवतो. अन्नाच्या शोधात असलेल्या या अस्वलांना कॅम्पर्सजवळ असलेल्या अन्नपदार्थाचे सुवास आकर्षित करतात. जाणकार कॅम्पर्सना सांगतात की, सोबतचे खाद्यपदार्थ तंबूत ठेवले तर अधांतरी टांगून ठेवा, तंबूपासून दूर ठेवले तर मजबूत पेटीत बंदोबस्तासह ठेवा, बेअरला पळवण्याकरता मोठा आवाज करा आणि तिखटाच्या स्प्रेचा उपयोग करा.
राज्यातल्या पशुपक्ष्यांची काळजी वाइल्डलाइफ कमिशन घेतं. निसर्गातल्या सर्व प्राणिमात्रांचा समतोल राखणं, वेळोवेळी त्यांची गणना करणं, ही महत्त्वाची कामं या खात्याची असतात. तीन वर्षांपूर्वी या खात्याने अस्वलांची संख्या बरीच घटली होती म्हणून काळ्या अस्वलांच्या शिकारीवर बंदी आणली होती. याच खात्याने ब्लॅक बेअरच्या शिकारीचा आठवडय़ाचा प्लॅन आखला तेव्हा ७० टक्के नागरिकांनी त्याला विरोध केला. कोर्टाच्या पायऱ्याही चढून झाल्या. पण काही उपयोग झाला नाही. सरकारी खात्याच्या म्हणण्याप्रमाणे अस्वलांची संख्या वेगाने वाढत होती आणि ती थोडी कमी होणं आवश्यक होतं. जंगलातून अस्वलं आता शहरात येऊ लागली आहेत आणि ही बाब गंभीर आहे. काहींचं म्हणणं आहे की, त्यांच्या तीव्र घ्राणेंद्रियांमुळे त्यांना शहरातल्या डस्टबिन्समधील कचऱ्याचा वास बरोबर येतो. ती बंद करून त्यांना कुलपं लावली तर अस्वलांना थांबवता येईल. घरातले ट्रॅश कॅन्स दाराबाहेर ठेवण्यापेक्षा घराच्या गराजमध्ये ठेवा. बर्ड-फीडर्स वापरू नका. तुमच्या बागेत जर तयार फळं, भाज्या असल्या तर त्या तशाच झाडांवर राहू देऊ नका. बाहेर ठेवलेल्या ग्रिल्स स्वच्छ करून ठेवा. जमल्यास इलेक्ट्रिक फेन्सेस वापरा. यासाठी मोशन अ‍ॅक्टिव्हेटेड अलाम्र्स खूप उपयोगी ठरतात. थोडक्यात, बेअर्सना लांब ठेवायला त्यांना मारून टाकायची गरज नाही, असं प्राणिमित्रांचं म्हणणं आहे.
मुळात शहरांचा विस्तार वाढला की जंगलतोड होते आणि वन्यप्राण्यांची जंगलातून पीछेहाट सुरू होते. कधी कधी अशी वेळ येते की, त्यांना खाणं पुरवायला पुरेशी जंगलं शिल्लक राहत नाहीत. जंगलात राहणाऱ्या श्वापदांची तीक्ष्णं घ्राणेंद्रियं, श्रवणेंद्रिय, त्यांचा धावण्याचा वेग त्यांना मनुष्यवस्त्यांकडे खेचून आणतो. फ्लोरिडात नेमकं असंच झालं आहे. १९७६ सालापासून फ्लोरिडात अस्वलांच्या शहरातल्या वावरावर लक्ष ठेवलं गेलं आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये १४ वेळा लोकांना अस्वलांनी उपद्रव दिला आहे. यातल्या बहुतेक घटनांमध्ये उपद्रवाला कारण माणूसच ठरला आहे. अस्वलाची मादी तिची पिल्लं ९-१० महिन्यांची होईपर्यंत त्यांना खूप जपते. माणसं किंवा इतर प्राणी तिच्या पिलांच्या जवळ येत आहेत असा तिला पुसटसा संशय आला तरी ती हिंस्र होते. १४ घटनांपैकी सात-आठ घटना अशाच होत्या. शहरातल्या लोकांनी अस्वलांना खायला घालायला सुरुवात केली की अस्वलं सोकावतात आणि मुक्तपणे मनुष्यवस्त्यांमध्ये यायला लागतात. आपली शिकार होऊ शकते हे अस्वलांना समजत नाही. नेमक्या याच गोष्टींचा फायदा घेऊन वन्य जनावरांच्या खात्याने त्यांची वाढती संख्या कमी करण्याची योजना आखली.
फ्लोरिडातल्या अस्वलांची शिकारीचं नियोजन करण्यापूर्वी त्यांच्या सवयींचा विचार केला गेला. जास्तकरून हिवाळ्याचे चार किंवा कधी कधी पाच-सहा महिने जंगलातल्या झाडा-फळांवर अवलंबून असणाऱ्या अस्वलांना सक्तीचा उपास घडतो. या दिवसांमध्ये मग अस्वलं लांबलचक झोप काढतात. फ्लोरिडामधल्या अस्वलांना शहरात भक्ष्य शोधायला फारसा त्रास पडत नाही. त्यामुळे त्यांना लांबलचक झोपेची गरज भासत नाही. मात्र, तरी ती पेंगुळलेली असतात. ही त्यांची अवस्था शिकाऱ्याच्या पथ्यावर पडणारी होती. २१ वर्षांनंतर अस्वलांची संख्या कमी करायची योजना सरकारी खात्यांनी ठरवली. फ्लोरिडामध्ये अस्वलांची संख्या ३००० असल्याचा अंदाज केला गेला. ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा फ्लोरिडाने आता कुप्रसिद्ध झालेल्या ‘बेअर हंट’साठी मंजूर केला.
यासंदर्भात टीकाकार म्हणतात, ही मंजुरी फ्लोरिडाच्या गव्हर्नरनी फक्त जमीन विकासकांना खूश करण्यसाठी आपल्या वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन कमिशनर्सच्या (ज्यांना बायोलॉजी, झूऑलॉजी या विषयातलं काहीही ज्ञान नाही आणि शिकारीमध्ये गती नाही, जे गव्हर्नरच्या शब्दाबाहेर नाहीत, ज्यांचे बिल्डर्स, डेव्हलपर्स, जमीनदार, रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्याशी हितसंबंध आहेत.) हाती दिली. ३२० अस्वलं मारण्याची योजना आखली गेली. फ्लोरिडामधल्या शिकाऱ्यांना प्रत्येकी १०० डॉलर्स फी घेऊन आणि फ्लोरिडाच्या बाहेरच्या शिकाऱ्यांना प्रत्येकी ३०० डॉलर्स फी घेऊन शिकारीची परवानगी दिली गेली. एकूण ३,७७८ लायसन्सेस दिली गेली. एका शिकाऱ्याला फक्त एकच बेअर मारायची आणि बंदूक किंवा धनुष्यबाण अशा दोनच प्रकारे शिकार करण्याची परवानगी होती. कुत्र्यांचा उपयोग करायला परवानगी नव्हती. १०० पौंडांहून कमी वजन असलेल्या अस्वलांना मारायची परवानगी नव्हती. (अस्वल नराचं वजन साधारणपणे ३०० पौंड, मादीचं १५० पौंड आणि पिल्लांचं १०० पौंड असतं.) आईच्या दुधावर वाढणाऱ्या पिलांना आणि त्याच्या आयांना मारण्याची परवानगी नव्हती.
पण आठ दिवस चालणारा हा शिकारीचा प्लॅन दोनच दिवसांत थांबला. दोनच दिवसांत ३२० अस्वलं मारली गेली होती. प्रत्येक मारलं गेलेलं अस्वल चेक स्टेशनवर नेऊन त्याचं वजन करून त्याच्या केसाचं आणि दाताचं सँपल घेतलं गेलं.
अस्वलांना बंदुकीच्या गोळ्या झेलायचा अनुभव अगदीच नवीन होता. बहुतेक वेळा त्यांच्याकडून काहीही प्रतिकार झाला नाही. नियम धुडकावून लावून लहान पिल्लं आणि त्यांच्या आयाही सर्रास मारल्या गेल्या. ‘अस्वलांची शिकार म्हणजे गार्बेज ट्रकला गोळ्या घालण्याइतकीच मर्दुमकी!’ अशा तऱ्हेच्या टिप्पण्या बऱ्याच केल्या गेल्या. जमीन विकासकांना निर्धोकपणे आपलं काम करण्याची सोय झाली. ३२० शिकाऱ्यांना अस्वलाची शिकार करण्याची फुशारकी (१६ वर्षांचा एक युवक १०० पौंडांच्या एका बेअरला- म्हणजे पिल्लाला मारल्याची खबर वार्ताहरांना मोठय़ा अभिमानाने देत असताना आजूबाजूच्या काही समंजस लोकांनी त्याला लगेच थांबवलं. पण त्याला पेनल्टी झाली किंवा नाही, ते कळलं नाही.), राज्य सरकारला ईझी मनी कमावण्याची संधी (३,७८८ लायसेन्सेस ३,७८,९०० डॉलर्सना दिली गेली!) अशा सगळ्या जमेच्या बाजू आणि त्या बदल्यात निरुपद्रवी, आळसावून झोपलेल्या अस्वलांची शिकार! शिकार बऱ्याच वेळा शिकारीचा थरार अनुभवण्याकरिता, अस्वलाच्या मांसाकरिता केली गेली. बऱ्याच जणांचे प्लॅन्स मारलेल्या अस्वलाचं शिर भिंतीवर लावण्याचे किंवा त्याची रग (जाजम) म्हणून घराच्या दिवाणखान्यात वापरण्याचे असले तर त्यात नवल वाटायला नको.
अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये हरणांची अशीच परिस्थिती आहे. जंगलतोड केल्याने शहराच्या वाढत्या वस्त्या हरणांच्या राहण्याच्या निसर्गदत्त जागा हिरावून घेतात. हरणं भक्ष्याच्या शोधात शहरांकडे येतात. बागांची, पिकांची नासधूस करतात. त्यांची संख्या पुरेशी वाढली की त्यांच्या शिकारीची लायसेन्सेस राज्य सरकारतर्फे व्यवस्थित पैसे घेऊन दिली जातात. आणि मग वन्यप्राणी (विशेषत: ज्यांना शिकार करता येत नाही आणि ज्यांना माणसांची भीती वाटत नाही.) माणसाची शिकार होतात. अशा शिकारीसारख्या घटना माणसाचं उत्क्रांतीच्या सगळ्यात वरच्या कडीचं असलेलं स्थान सहज सिद्ध करतात.
शशिकला लेले – फ्लोरिडा
naupada@yahoo.com (समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 1:01 am

Web Title: bears killed in florida
Next Stories
1 पाणी-व्यवस्थापन : डच खासियत!
2 ‘नामी’ पदयात्रा
3 भुयारी लंडन
Just Now!
X