12 August 2020

News Flash

  ब्रिटनची  पोशाखी शिस्त

सुमारे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये माझा कामाचा पहिला दिवस.

सुमारे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये माझा कामाचा पहिला दिवस. मार्चचा महिना असल्याने हवेत गारवा नेहमीपेक्षा जास्तच होता. म्हणून लोकरीचे मिश्रण असलेल्या नव्या सुटाबरोबर मुंबईहून आणलेला बिनबाह्याचा स्वेटरही शर्टवर चढवला होता. काळपट आणि पांढऱ्या रंगाचे चौकोन असलेला हा स्वेटर काळय़ा सूटवर अगदी मॅच होतो अशी घरच्यांची पसंतीची पावती घेऊन विकत घेतलेला. टार्टन पद्धतीचे हे स्वेटर दिसतातही स्मार्ट. ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या बॉसने ‘आज काय गोल्फ खेळायला जाणार का?’ म्हणून विचारणा केली. मी ‘नाही’ म्हटल्यावर सहकाऱ्यांमध्ये काहीशी खसखस पिकली. आणि मग आम्ही कामात गुंतलो. मधल्या चहाच्या ब्रेकमध्ये मी सहकाऱ्यांना स्टीवने मला सकाळी गोल्फविषयी का विचारले, याबद्दल विचारले. तेव्हा मला उलगडा झाला, की हा सारा गोंधळ माझ्या टार्टनचे पॅटर्न असलेल्या स्वेटरने केला होता! इंग्लंडमध्ये टार्टन पद्धतीचे कपडे- ज्याचा उगम स्कॉटलंडमधील लोकरीच्या उद्योगात आहे- ते गोल्फ खेळतानाच वापरतात. ब्रिटिश त्यांच्या कपडय़ांच्या स्टाईल आणि वापराविषयी अतिशय चिकित्सक असतात याची ही पहिली तोंडओळख होती.

इंग्लंडमध्ये औपचारिकता म्हणून वापरात येणारे पोशाख हे अगदी दिवसाच्या प्रहरानुसारही बदलतात. मॉर्निग ड्रेस, आफ्टरनून ड्रेस, इव्हनिंग/ नाइट ड्रेस. याशिवाय ऋतूनुसार बदलणारे पोशाखही आहेत. इथे माणसाचे कपडे थंडी-वाऱ्यापासून संरक्षण करणे, स्त्री-पुरुषांतील वेगळेपण दाखविणे- याव्यतिरिक्त समाजातील वेगवेगळय़ा स्तरांतील (क्लास) लोकांचेसुद्धा प्रतिनिधित्व करतात.

अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर संध्याकाळी कोणत्याही नाटक वा म्युझिकलला जा.. हवेत गारवा नसला तरीही रेशमी वा कॉटनचा छोटा दुपट्टा खांद्यावर टाकून इव्हनिंग गाऊनमध्ये येणाऱ्या महिला हमखास स्टॉलच्या दिशेने जाणार. इकडच्या उच्चभ्रू आणि बहुतांशी कॅथलिक शाळांमध्ये शिकलेल्या मुली आपल्या अंगाचे अवास्तव प्रदर्शन करत नाहीत. माफक मेकअप आणि गळ्यात फार तर मोत्याची छोटीशी माळ- असा पेहराव. वयस्कर बायका एखादा कोटही बरोबर आणतात. त्यांना सोबत करणारे पुरुष एखादा कोट किंवा जम्पर (उन्हाळय़ाच्या दिवसांत) परिधान करतात.

थोडे रंगीत कपडे, स्कर्ट आणि बिनबाह्यांचे ड्रेस घातलेल्या स्त्रिया आणि टी-शर्ट-जीन्स परिधान केलेले पुरुष मंडळी बाल्कनीशी नाते सांगतात. अर्थात् ब्रिटिशांचे कपडे परिधानाचे नियम हे त्यांच्या भाषेसारखेच क्लिष्ट आणि बुचकळय़ात टाकणारे असतात. आणि म्हणूनच काही ब्रिटिश कंपन्या पोशाख परिधानाविषयीची कार्यसत्रेही करतात.

‘व्यवस्थित बांधलेला टाय हा आयुष्यात पुढे जाण्यासाठी पहिले पाऊल!’ हे ऑस्कर वाइल्डचे विधान केवळ गमतीचे नाही, तर ब्रिटिश समाजावर केलेले ते सडेतोड भाष्य आहे. या कंठलंगोटाचीसुद्धा विंडसर, अटलांटिक, प्रिन्स अल्बर्ट, निकी, एडिटी अशी बरीच घराणी आहेत. किंबहुना, ‘ब्लॅक-टाय’ इव्हेंटसारखा टेन्शन वाढवणारा दुसरा इव्हेंट नाही. खरं तर ब्लॅक-टाय इव्हेंट म्हणजे संध्याकाळची पार्टी. म्हणजे खाणे-पिणे आणि मजा करो असा माहौल. मात्र, दरवर्षी ऑफिसच्या ख्रिसमस पार्टीच्या ब्लॅक-टाय इव्हिनिंगसाठी काय घालायचे, हा प्रश्न मार्था आणि मरियाला पडलेला असतो. अर्थात महिलांना टाय वापरायचा नसला तरी इव्हिनिंग ड्रेस कोणता घालायचा, तो त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याच्या टायशी मॅच होईल का, या चिंतेने हिवाळ्याच्या दिवसांतही त्यांना घाम फुटतो.

पुरुषांनाही या ब्लॅक-टाय इव्हेंटचा मन:स्ताप होतोच. ड्रेस विकत घ्यावा की भाडय़ाने घ्यावा, टाय कोणता, शर्टचा पॅटर्न, तसेच कमरबॅण्ड वापरायचा की वेस्ट घालायची? पार्टी असो किंवा शोकसभा; प्रत्येक प्रसंगाचे ड्रेसकोड ठरलेले आहेत. अगदी हलकेफुलके प्रसंग.. जसे- घोडय़ांची शर्यत पाहणे, गोल्फ खेळणे, टेनिस बघणे यांसारख्या ठिकाणी पोशाखी नियम पाळलेच पाहिजेत. यंदा फॉम्र्युला वन चॅम्पियन ल्युईस हॅमिल्टनला योग्य पेहेराव नसल्याने विम्बल्डनला टेनिस पाहण्यास मनाई केली गेली.

औपचारिक प्रसंगांच्या ठिकाणी कपडे कसे व कोणते घालावेत, याची शिकवण इंग्लंडची राणी आणि तिचे कुटुंबीय गेली कित्येक वर्षे देत आहेत. राणीचा ड्रेस, तिची हॅट, हॅण्डबॅग यांची चर्चा बऱ्याच फॅशन मॅगझिनमध्ये होते. लेडी डायना आणि सध्या प्रिन्सेस कॅथरिन यांनी तत्कालीन युवतींना कपडे परिधानाविषयी मार्गदर्शन केले आहे. हॅरिस ट्विड जॅकेट घातलेले आणि पिवळ्या किंवा नारिंगी रंगाची पँट घातलेले ब्रिटिश पुरुष बऱ्याचदा त्यांच्या विक्षिप्तपणासाठीच प्रसिद्ध असतात.

आयुष्यात मजा लुटताना काहीएक शिस्त असली पाहिजे असे आपण नेहमीच म्हणतो. ही शिस्त पेहेरावातही असली पाहिजे, हा ब्रिटिश आचारसरणीचा एक महत्त्वाचा भाग. इंग्लंडचा जरी विशिष्ट असा पारंपरिक पेहेराव नसला तरी सूट आणि ड्रेस ही त्यांनी जगाला बहाल केलेली एक मोलाची देणगी आहे. अर्थात् या सुटात आणि बुटांत असलेली व्यक्ती शिस्तीने वागेलच याची शाश्वती नाही. कारण त्या टोपीखाली असलेल्या डोक्यावर या वस्त्राचे नियंत्रण नसते!

wizprashant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2015 7:44 am

Web Title: dressing sens of uk
Next Stories
1 निसर्गाचे रुणझुण गाणे
2 अरबी नृत्याचा ब्लेन्ड
3 पॅरिसचा लेखक-कट्टा
Just Now!
X