News Flash

पाणी-व्यवस्थापन : डच खासियत!

१९१६ मधील हिमवादळाच्या तडाख्यामुळे झौदरझे प्रांतातले अनेक बांध फुटले आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला

नेर्दलड्समध्ये सुमारे एक लाख कि. मी. लांबीची सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित झाली आहे.

डॉ. विश्वास अभ्यंकर – अ‍ॅमस्टरडॅम, नेर्दलड्स
यंदाच्या पावसाळ्यात दररोज स्काइपवर बोलताना पुण्यात राहणाऱ्या माझ्या आई-बाबांना व सासू-सासऱ्यांना माझा पहिला प्रश्न असे- ‘आज पाऊस पडला का?’ समोरून उत्तर यायचं, ‘नाही!’ किंवा ‘आली होती एक बारीकशी सर.’ पुण्यात कधी नव्हे तो एवढा दुष्काळ मी पाहत होतो. दर दिवसाआड पाणी येणार, ही कल्पनाच भयंकर होती. फक्त पुण्यातच ही परिस्थिती होती का? तर तसं काही नव्हतं. उत्तरेत पावसामुळे नद्यांना पूर येत होते आणि मध्य भारतात सारं काही कोरडं! याउलट, इथे नेर्दलड्समध्ये वर्षभर कधीही पाऊस पडतो. त्यामुळे पाणी मुबलक! तेव्हा म्हटलं बघावं तरी, की डच लोक कसं काय पाण्याचं व्यवस्थापन व नियोजन करतात ते. पाणी डचांच्या रक्तातच नाही, तर जीन्समध्येच आहे. पवनचक्क्या, बंधारे आणि पूर-प्रतिबंधक तटांमुळे या देशाची प्रभावी जागतिक प्रतिमा निर्माण झाली आहे. या देशाची फक्त ५०% जमीन समुद्रसपाटीपेक्षा उंचीवर आहे. तीही फक्त एक मीटर! समुद्रसपाटीच्या खाली असल्याने इथे अनेक शहरांत पाणी साठू नये म्हणून मानवनिर्मित कालव्यांचं जाळं आढळतं; ज्यामुळे इथे जलवाहतूक खूप प्रगत आहे. देशातल्या नद्या जिथे समुद्राला मिळतात तिथे प्रत्येक ठिकाणी मोठाल्ले दरवाजे बांधलेले आहेत; ज्यामुळे नदी व समुद्राचं पाणी मिसळत नाही. गरजेनुसार ते उघडले की पाणी साचून राहायचा प्रश्नच नाही. म्हणूनच नद्या आणि कालव्यांचं पाणी बहुतकरून गोडंच आहे.
सन १४०० पर्यंत हॉलंडमधील बहुतेक जमिनी ओल्या, पाणथळ आणि दलदलीच्या होत्या. केवळ वाळूच्या टेकाडांमुळे समुद्रापासून त्या वेगळ्या होत्या. अनेकदा प्रलयंकारी पुरामुळे गावेच्या गावे नष्ट होत. १४२१ मध्ये महाभयंकर पुरात ७० गावे वाहून गेली आणि हजारो लोक बुडून मेले. याच काळात पवनचक्क्यांचा उगम झाला. प्रथम या चक्क्यांचा उपयोग गहू व धान्ये भरडण्यासाठी होत असे. पण नंतर समुद्रापासून संरक्षण करणारे बंधारे व धरणं बांधून समुद्राचं पाणी मुख्य जमिनीपासून अडवण्यात आलं. तलाव, पाणथळ जागा व ओल्या जमिनींमधून पवनचक्क्यांच्या साहाय्यानं पाणी उपसून समुद्रात टाकण्यात आलं. यामुळे लोकांचं राहणीमान सुधारलं. १६ व्या शतकात या पवनचक्क्यांच्या रचनेत थोडासा बदल करून त्यांचा उपयोग रंगांची पूड बनवणं, तेल गाळणं, मसाले दळणं, कागद बनवणं, इतकंच नाही तर लाकूड कापण्यासाठीही होऊ लागला. या लाकडाच्या वखारींमुळे व्यापारी व नाविकांना बोटी, जहाजं बांधणं शक्य झालं आणि जलवाहतूक, दळणवळण सुधारल्यामुळे १७ व्या शतकात जागतिक बाजारपेठेत हॉलंड देश अग्रस्थानी गेला. १९ व्या शतकाच्या प्रारंभी या देशात सुमारे ९००० पवनचक्क्या होत्या. कालौघात त्या नष्ट झाल्या तरी काही पवनचक्क्या अजूनही किन्डरडैक, स्कीदाम आणि झान्स स्कान्स परिसरात पाहायला मिळतात.
१७०७ साली पान्नेर्देन कालवा खणला गेला; ज्यामुळे ऱ्हाईन नदीचं पाणी विभागलं गेलं आणि जलवाहतूक व पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं गेलं. १७९८ मध्ये मूलभूत सुविधा पुरवठा आणि पर्यावरण मंत्रालयाचा भाग असणाऱ्या ‘रैक्स्वातरस्त्रात’ संस्थेची स्थापना झाली. तीमार्फत सरकारी बांधकामं, पाण्याचं व्यवस्थापन, जलमार्ग व रस्त्यांची बांधकामं, पूर-निवारण व प्रतिबंधक उपाययोजना करणं ही कामं केली जात. पुढे १८२० साली राजा विल्हेम (पहिला) यानं सर्वप्रथम वाफेच्या शक्तीचा वापर करून रॉटरडॅम शहराच्या ईशान्येला असलेल्या झौद्प्लासपोल्डर भागातून समुद्राचं पाणी हटवून तिथली जमीन परत मिळवली. समुद्रसपाटीपासून सुमारे २३ फूट खोल असणारा हा भूभाग आहे. १८५० साली अ‍ॅमस्टरडॅम शहरासाठी पहिल्यांदा पाणीपुरवठा प्रणाली बांधली गेली. देशाचं रक्षण करणाऱ्या वाळूच्या टेकाडांमधून कालवा खणून त्यातून झिरपणारं स्वच्छ पाणी एका मोठय़ा तलावात साठवलं गेलं व वाफेवर चालणाऱ्या पंपाद्वारे त्यातलं पाणी पाइपलाइनमधून शहराला पुरवण्यात आलं. नेर्दलड्समधल्या घराघरात पाणी पोहोचलं ते अगदी अलीकडे- २० व्या शतकाच्या प्रारंभी! आश्चर्य म्हणजे १९०० मध्ये या देशात सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली बांधली गेली. तोपर्यंत घराघरातून सांडपाणी गोळा करण्यासाठी माणसं नेमली जात होती, किंवा घराबाहेरच्या नाल्यातच ते टाकण्यात येत असे. आता त्याच नेर्दलड्समध्ये सुमारे एक लाख कि. मी. लांबीची सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित झाली आहे. २०१२ पासून तर प्रगत अशी नेरेदा यंत्रणा वापरली जात; ज्यामध्ये मैला पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी जैविक पद्धतीचा अवलंब केला जातो.
१९१६ मधील हिमवादळाच्या तडाख्यामुळे झौदरझे प्रांतातले अनेक बांध फुटले आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. त्याच सुमारास चालू असलेल्या पहिल्या महायुद्धामुळे अन्नाचादेखील तुटवडा होता. या दोन्हींवर उपाय म्हणून १९१८ मध्ये झौदरझे कायदा संमत करण्यात आला. ज्याची तीन उद्दिष्टं होती- नेर्दलड्सच्या मध्य भूभागाचं उत्तरेकडील समुद्रापासून संरक्षण करणं, शेतीसाठी नवीन जमिनी उपलब्ध करून घेऊन अन्नाचं उत्पादन वाढवणं व पूर्वी तिथे अस्तित्वात असलेल्या खाऱ्या पाण्याच्या खाडीचं तलावात रूपांतर करून पाण्याचं व्यवस्थापन करणं. त्यासाठी धरणं बांधणं, पाणी उपसून जमिनी मिळवण्याची कामं जोमानं सुरू झाली. या प्रकल्पाद्वारे सुमारे १६५० चौ. कि. मी. भूभाग पाण्यापासून परत मिळवला गेला. पुढचा प्रश्न होता व्यवस्थापन केलेल्या पाण्याचं शुद्धीकरण करायचा. जलद व धीम्या वाळूच्या गाळणीतून व क्लोरिन आणि ओझोन वायूचा वापर करून पाण्याचं शुद्धीकरण केलं जाऊ लागलं. हल्ली क्लोरिनचा वापर बंद असून अतिनील किरणं आणि ओझोन वायूने पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं. त्यामुळेच अगदी बेधडक नळाचं पाणी पिण्यासाठी वापरता येतं.
१९३२ साली सरकारनं उत्तर हॉलंड आणि फ्रीस्लंड प्रांतांना जोडणारा आणि झौदरझे भागाला विभागणारा आफ्स्लौतदैक हा ३० कि. मी. लांबीचा बंधारा बांधायचा भलामोठा प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे अैसल्मेर तलाव नावारूपाला आला. अैसल्मेरमध्ये अजून दोन बंधारे बांधण्याचं ठरलं. ज्यांची एकूण लांबी सुमारे ५५ कि. मी. होती. त्यातील एका बंधाऱ्याने फ्रीस्लंडमधील लेमर आणि उर्कचं बेट जोडलं गेलं, तर दुसऱ्या बंधाऱ्याने ओव्हरैसेलमधील फोलन्हूव्ह व उर्कचं बेट जोडलं गेलं. या बंधाऱ्यांमुळेच १९४० साली नोर्दोस्तपोल्डर भागात सुमारे ४८० चौ. कि. मी. क्षेत्रफळाची जमीन उपलब्ध झाली. १९५३ मध्ये आलेल्या भयंकर पुरानंतर हाती घेतलेल्या डेल्टा प्रकल्पांमध्ये १४ प्रदेशांत बंधारे घालून पाणी अडवण्यात आलं. यांपैकी स्कौवन-दौव्हलंड आणि नोर्द-बेव्हलंड या बेटांना जोडणारा वादळी लाटांपासून संरक्षक बंधारा वाखाणण्याजोगा आहे. सुमारे दहा र्वष नऊ कि. मी. लांबीच्या या बंधाऱ्याचं बांधकाम चालू होतं आणि त्यातल्या केवळ चार कि. मी. लांबीच्या भागात स्ल्यूस-गेट प्रकारचे दरवाजे आहेत. एरवी हे सर्व दरवाजे उघडेच असतात; ज्यामुळे समुद्री जीवांचं रक्षण होतं. परंतु वादळाच्या वेळी दरवाजे आपोआप बंद होतात आणि धरणाच्या मागची जमीन सुरक्षित राहते. हे सर्व संगणकाद्वारे नियंत्रित केलं जातं.
आणखी एक गौरवशाली असा मेस्लांतकेरिंग प्रकल्प सरकारनं उभारला. सुमारे ६६ कोटी रुपये खर्चून रॉटरडॅम शहराजवळ ऱ्हाईन नदीवर न्यूव वातरवेग भागात पाणी अडवण्यासाठी २२ मी. उंचीचे आणि २१० मी. लांबीचे दोन स्टीलचे दरवाजे बांधले गेले; ज्याचं नियंत्रण संगणकीय प्रणालीद्वारे केलं जातं. सर्वसाधारण परिस्थितीत हे दरवाजे उघडेच असतात. या दरवाजातून मोठी व्यापारी जहाजं, बोटी अगदी सहजपणे ये-जा करू शकतात. वादळी संकेत मिळाल्यावर किंवा अचानक भरतीच्या वेळी दोन्ही दरवाजे आपोआप बंद होतात; ज्याच्या चार तास आधी सर्व बोटींना सूचित केलं जातं. जगभरात पूर-परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यासाठी डच अभियंत्यांना म्हणूनच पाचारण केलं जातं.
एकूणात, पाणी हे जीवन आणि तेच शत्रू असतानाही डचांनी जगण्यासाठी केलेला हा प्रचंड असा खटाटोप निश्चितच अनुकरणीय आहे यात काहीच शंका नाही. n
wishwas2610@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:01 am

Web Title: sustainable water management in switzerland
Next Stories
1 ‘नामी’ पदयात्रा
2 भुयारी लंडन
3 हनी बन्सची कडवट बाजू
Just Now!
X