लंडन
भर गर्दीच्या वेळी लंडनच्या रस्त्यावर दिसणारी लोकांची लगबग जगातील कोणत्याही मोठय़ा शहराला साजेशीच असते. सायकलस्वार, मोटारींच्या वाहतुकीतून मार्ग काढणारे स्कूटरस्वार, बसवाले, मध्येच रस्ता अडवणारे ट्रक आणि त्यांच्या मधून चाललेली पादचाऱ्यांची धावपळ.. या सर्वात प्रकर्षांने जाणवतात ते अचानकपणे गडप होणारे लोकांचे लोंढे. एका भुयारी मार्गातून शिरून दुसऱ्या मार्गाने बाहेर पडणारे, संपूर्णत: तिसरेच असणारे हे प्रवाशी पाहिले की कधी कधी हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेत गेल्याचा भास होतो. लंडनच्या भुयारी मार्गामध्ये एक नवेच आणि वेगळे विश्व अनुभवायला मिळते. लंडन आणि लंडनच्या बाहेरून प्रवास करणाऱ्या लोकांना या मायानगरीमध्ये आणायचे आणि पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी नेण्याचे काम लंडनचे भुयारी मार्ग गेल्या १५० वर्षांहूनही अधिक काळ करीत आहेत.

लंडनची भुयारी रेल्वे ‘टय़ुब’ (Tube) म्हणूनच सर्वत्र प्रसिद्ध आहे. जानेवारी १८६३ साली पॅडिंग्टन ते फारिंग्टन या दोन स्थानकांदरम्यान जगातील पहिली भुयारी रेल्वे धावली. तेव्हापासून जतन केलेली, कोळशावर चालणारी ही रेल्वे दोन वर्षांपूर्वी पुन्हा चालवून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अर्थात काळानुसार आता या भुयारी रेल्वेचे विद्युतीकरण झाले आहे. मेट्रोपोलिटन, सेंट्रल, सर्कल, नेकरलू, नॉर्दर्न अशा जवळपास अकरा वेगवेगळ्या मार्गावरून ही टय़ुब लोकांना इच्छित स्थळी पोहोचवते. सोयीसाठी या मार्गाना लाल, काळा, हिरवा, पिवळा आदी रंगांमध्ये रंगवून लंडनचा भुयारी रेल्वेमार्ग आकर्षक करण्यात आला आहे. १९३१ साली हॅरी बेक या रेल्वेच्या कर्मचाऱ्याने शहरातल्या उत्तर आणि दक्षिणेतल्या भुयारी रेल्वेमार्गाचा नकाशा बनवला. आजही त्याचा मूळ ढाचा तसाच आहे; केवळ स्टेशन्स आणि इतर मार्ग जोडले गेले आहेत. लंडनमध्ये प्रथमच येणाऱ्यापाशी हा नकाशा असला की आपले कान आणि डोळे यांचा योग्य वापर करत लंडनमध्ये कुठेही फिरता येईल याची दक्षता या भुयारी रेल्वेच्या आखणीत पुरेपूर घेतलेली दिसते. बऱ्याचदा मध्यवर्ती लंडनमध्ये एका स्टेशनपासून पुढच्या एक-दोन स्टेशनपर्यंत आरामात चालण्याजोगे अंतर असते. किंबहुना, गर्दीच्या वेळेस लोकांना पायी जाण्याचा उपदेशही केला जातो. उदाहरणार्थ, चारिंग क्रॉसला असलेली नॅशनल आर्ट गॅलरी पाहून झाल्यावर चालत केवळ पाच-सात मिनिटांत कॉव्हेट गार्डनला ऑपेरा पाहायला जाता येईल. टय़ुबचा वापर करायचा झाला तर थोडी खटपट करावी लागेल. गर्दीच्या वेळी एक-दोन मिनिटांनी धावणाऱ्या या टय़ुबमध्ये लोक धक्काबुक्की करायला मागेपुढे पाहत नाहीत. कधी कधी तर लोक रागाने वाट न देणाऱ्या इसमाला त्याच्या कुटुंबीयांची आठवण करून देतात. भुयारी रेल्वे असल्याने दार बंद झाल्याशिवाय गाडी पुढे हलत नाही. त्यामुळे दारात अडकलेला हात, पाय किंवा पर्स यांची सुटका झाल्यावरच गाडी पुढे सरकते. दाराला चिकटून असणारे इतरांना ‘move inside’ असा सल्ला देतात. थोडी शाब्दिक बाचाबाची झाल्यावर सगळेजण मग वाचनात मग्न होतात. कारण- ‘keep calm and carry on!l या सगळ्या धावपळीतही टय़ुबमधून प्रवास करणाऱ्यांचे काही अलिखित नियम आहेत. त्यातील महत्त्वाचा म्हणजे चांगला परफ्युम वापरणे! सकाळच्या वेळी अंगदाटीने प्रवास करताना स्वत:चा तसेच इतरांचा प्रवास सुवासिक व्हायला हवा, हे महत्त्वाचे! वयोवृद्ध आणि अपंग प्रवाशांना भरगर्दीतही वाट करून दिली जाते. गरोदर महिला लंडन भुयारी मार्ग चालविणाऱ्या कंपनीने दिलेला ‘Baby on Board’ हा बॅच लावतात. या बॅचमुळे लोकांचीसुद्धा गफलत होत नाही आणि उगाच चुकीच्या व्यक्तीला जागा देऊन हसेही होत नाही.

उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र टय़ुबने प्रवास करणे म्हणजे जिवाचे हालच जणू. जरी प्रशासनाने या भुयारी मार्गात काही ठिकाणी हवेचे मार्ग उपलब्ध केले आहेत, तरीही ऐन उन्हाळ्यात ही हवा आणखीनच तापते. त्यात लोक ‘It’s so hot!’ असा श्वास टाकून तापमान आणखीनच वाढवतात. पण पर्याय नसतो. लंडनमध्ये जर जलद प्रवास करायचा असेल तर हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन फारच उपयोगी ठरते.
लंडनच्या जडणघडणीत या टय़ुबचा महत्त्वाचा वाटा आहे. नवनव्या वाटा शोधून या भुयारी रेल्वेने लंडनचा प्रवास विस्तारला आहे. टय़ुब लोकांच्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत जीवनाचाही महत्त्वाचा घटक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेकांनी या भुयारी मार्गात शत्रूच्या माऱ्यापासून आसरा शोधला. लोक घर शोधतानाही त्यांच्या मनपसंत मार्गाचा विचार करतात. नॉर्दर्न लाइनवर राहणाऱ्या व्यक्तीने सेंट्रल लाइनचा विचार करणे म्हणजे लिव्हरपूल फुटबॉलच्या फॅनने आर्सनलला पाठिंबा देण्याइतकेच अशक्य! लंडनच्या मध्यवर्ती भागात असणारी ही भुयारी रेल्वे लंडनमूधन बाहेर पडताना टूथपेस्टमधून पेस्ट बाहेर पडावी तशी दिसते.

या भुयारी रेल्वेचे स्वत:चे सामाजिक तसेच आर्थिक विश्व आहे. प्लॅटफॉर्मवर काही जागा राखून ठेवलेल्या आहेत- जेथे गायक, वादक, जादूगार त्यांची कला प्रदर्शित करतात. या जागेचे त्यांना प्रशासनाला भाडे द्यावे लागते. अनेकदा काही तबलावादकही मी पाहिले आहेत. धावपळीतही एखादे आवडीचे गाणे असेल तर लोक थांबून, थोडेसे नाचून आणि वर बक्षिसी देऊन या कलाकारांचा हुरूप वाढवतात. अर्थात येथे काहीही काम न करता केवळ पैसे मागणारेसुद्धा असतात. पण प्रवाशांना त्रास न होता हे आवाहन केले जाते.

हल्लीच एका महिलेने प्रत्येक प्रवाशाजवळच्या रिकाम्या जागेवर एक टिश्यूचा पॅक ठेवून एका छोटय़ा कागदावर- हे टिश्यूचे पॅक विकत घेऊन तिचे कुटुंब सांभाळण्यासाठी मदत करावी, अशा आशयाचा मदतीचे आवाहन करणारा मजकूर लिहून ठेवला होता. अर्थात भुयारी रेल्वेचा हा प्रवास नेहमीच सुकर असेल याची शाश्वती नाही. लोकांचे वाढते लोंढे आणि जुने, पण अजूनही टिकाऊ तंत्रज्ञान यांचा ताण पडून कधी कधी एखादा मार्गच बंद पडतो. अशा वेळी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यंदा टय़ुबच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा संप करून लोकांच्या त्रासात भर टाकली. अर्थात त्यांनी या संपाची महिनाभर आधी नोटीस दिली होती. त्यामुळे लोकांनी पर्यायी मार्गाचा विचार केला होता. लंडनची ही टय़ुब बंद असते ती केवळ ख्रिसमसच्या दिवशी. होय, त्या दिवशी सबंध लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे मार्ग बंद असतात. ख्रिसमसच्या काळात वर्दळही कमी असते. एकदा सिग्नलला गाडी थांबलेली असताना उत्साही चालकाने ख्रिसमसचे गाणे गुणगुणायला सुरुवात केली आणि प्रवाशांचे मनोरंजन केले. लोकांचेही या टय़ुबवर जीवापाड प्रेम आहे. काही प्रवाशांनी तर या टय़ुबवर कवितासुद्धा केल्या आहेत. टफनेल पार्क स्टेशनच्या प्रवेशद्वारावर दररोज एक नवी कविता स्टेशनमास्तर प्रसिद्ध करीत असे.
कालानुरूप लंडनची टय़ुब अत्याधुनिक होत आहे. काही रेल्वेचे डबे वातानुकूलित होणार आहेत. ऑटोमॅटिक तिकिटे मिळण्यापासून अत्याधुनिक लिफ्ट यांमुळे लोकांचा प्रवास सुकर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण दरवेळेस गाडी सुरू होताना प्रसन्नपणे ‘Good Morning’ म्हणून लोकांना ‘mind the doors’ असे म्हणणारे चालक लंडनच्या टय़ुबचा आत्मा कायम ठेवतील.
प्रशांत सावंत- wizprashant@gmail.com