– ‘कोण हाय रे तिकडं?’

– ‘कोण नाय म्हाराज.’

– ‘का? सगळ्यांनी कुठं काळं केलं?’

– ‘कसुरीला माफी असावी म्हाराज. पण हल्ली काळं केल्यावर कोणी तोंड लपवत नसतं!’

– ‘अरे मग गेले कुठं सगळे?’

-‘कोणी प्रचाराला गेले, कोणी प्रसाराला गेले, कोणी टीव्हीवर गेले, कोणी ट्विटरवर गेले, आणि बाकीचे सगळे िलचिंगला गेले. मी एकलाच उरलोय, म्हाराज!’

– ‘लिचिंगला? म्हंजे? आम्ही नाय समजलो! हे चीनमध्ये येतं का? आपल्याकडं तर असलं काही कधी ऐकलं नाही.’

-‘म्हाराज, तसंपण तुम्हाला सगळंच उशिरानं ऐकायला येतं! अहो, िलचिंगला म्हणजे मंडळी शिकारीला गेली आहेत.

– शिकारीला आणि आम्हांला न घेता? परधानजी, धिस इज नॉट फेअर! आम्ही तातडीने याचा निषेध करतो.’

– ‘ओके. द्या!’

– ‘काय द्या?’

– ‘निषेध करताय ना? मग द्या!’

– ‘काय तुमच्या मराठीचं स्टॅण्डर्ड परधानजी! द्या काय म्हणता? निषेध करा म्हणावं!’

– ‘हॅहॅहॅ! म्हाराज, तुम्ही रोज पेपर वाचता ते काय आजचा रंग बघायला का हो? किती हा अज्ञान अंधकार? तुम्ही ना सारखे सारखे दौऱ्यावर जाता. आणि मग इथला गृहपाठ कच्चा राहतो! अहो, निषेध करताय ना तुम्ही? मग पुरस्कार नको परत करायला?’

– ‘आँ? सुनिबि पास केलंय का आपण?’

– ‘अँ’

– ‘सुधारित निषेध बिल!’

– ‘म्हाराज, तुम्ही पह्य़लांदा हे बंद करा पाहू. कायम आपलं असं शॉर्टफॉर्मात बोलायचं, नाय तर  जाह्य़रातीच्या भाषेत.. आमचा किती ट्रिपल जी होतो..’

– ‘कॅय होतो?’

– ‘ट्रिपल जी..! गडबड, गोंधळ, घोटाळा! आणि आपण कसलाही कायदाबियदा केलेला नाही. हल्ली ती साथ सुरू झालीय. पुरस्कार परत करण्याची. आपली सगळी लेखक-कवी मंडळी पुरस्कार परत करून राह्य़लीत..’

– ‘दे आर राईट परधानजी!’

– ‘काय पण काय म्हाराज? दे आर लेफ्ट! सगळे फुल्याफुल्याफुल्या डावे आहेत! मला हेच समजत नाही, ही सगळी विचारवंत, बुद्धिमंत, लेखक मंडळी एवढे का ट्रॅफिकचे रूल पाळतात? उजवीकडं पाहून डावीकडून चालतात! ही सगळी ब्रिटिश पद्धती बरं का म्हाराज ट्रॅफिकची! ती बंद करून स्वदेशी सुरू केली पाहिजे.’

– ‘परधानजी, अहो, त्यांचं बरोबर आहे असं म्हणायचं होतं मला. ते पुरस्कार परत करणारच ना! म्हणून मी कधीपासून म्हणतोय, पह्य़लांदा एक चांगली हौसिंग पॉलिसी आणा.’

– ‘म्हंजे आता हौसिंग पॉलिसी आणून या लेखकांना साहित्य सहवास द्यायचा की काय? म्हाराज, आर यू ट्राईंग टू ब्राईब देम? तुम्हांला ते काय विकाऊ वाटले?’

‘छा छा! असं कसं म्हणेन मी? सगळेच काही विकले जात नाहीत. काही काही वाकलेसुद्धा जातात! पण मला म्हणायचं होतं ते जरा डिफ्रन्ट होतं. मला म्हणायचं होतं, या लेखकांची घरं केवढुशी? जादात जादा टू बीएचके. त्याच्यात कुठं ठेवणार ते हे पुरस्कार? आता आमचंच बघा. आम्हांला जाईल तिथं या तलवारी आणि गदा मिळतात. लोकांना वाटतं आम्ही रोज सकाळी उठून तलवारीचे दोन हातच करीत असतो! कुठं ठेवायचा हा शस्त्रसाठा? त्या बिचाऱ्या लेखकांचं पण असंच होत असणार. ते काही नाही. त्यांच्या भावनांचा मान आपण ठेवलाच पाहिजे. ते काही नाही. आताच्या आता आड्डर काढा. त्यांच्यासाठी जागोजागी पुरस्कार परती केंद्रं सुरू करा. त्याला आधार िलक करा. यापुढं सगळ्या लेखकांना ऑनलाइन पुरस्कार द्या. आणि पहिल्यांदा एक करा. त्यांना आपण पुरस्कार कसे समारंभपूर्वक देतो, तसेच पुरस्कार परतीचे समारंभपण सुरू करा.’

– ‘पण म्हाराज, त्यांच्या निषेधाचं काय? ते म्हणतात आम्हांला सध्याच्या वातावरणात लिहिता येणं शक्य नाही.

– नवरात्रातल्या डीजेमुळं आमच्या राजकन्येलाही लिहिता येणं शक्य नव्हतं. मग काय तिनं तिला मिळालेला रेकॉर्ड डान्स स्पध्रेचा पुरस्कार परत करायचा का? काही नाही हो, लिहिता येईना वातावरण वाकडं! त्यांना म्हणावं, ही अशी कारणं चालणार नाहीत. आणि आम्ही वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना? स्वच्छता मोहीम घेतलीय. सोलर दिवे बसवतोय. ते काही नाही. लिहिता येणं शक्य नाही म्हणजे काय? आधी म्हणावं, लिहिणं बंद करा. मग आम्ही निषेधाचं पाहू..’

– ‘हे बाकी झ्याक बोललात म्हाराज. आधी लिहिणं बंद करा, मग पुढचं बघू.. म्हाराज, मानली बोवा तुमची दूरदृष्टी! म्हंजे कसं, ना रहेगा बास अन् ना लगेगा रूम फ्रेशनर!’

– ‘म्हंजे?’

– ‘म्हंजे.. मेकइनइंडियावाल्या वाघाचे पंजे! अहो, एकदा का या लेखकांनी लिहिणं बंद केलं, की त्यांच्या पुरस्कार परतीला विचारतो कोण? आपण लगेच म्हणायचं, हे लेखकच नाहीत. यांनी गेल्या दोन महिन्यांत काय लिहिलंय? दाखव अफिडिव्हीट! आणि एकदा का यांचं लिहिणं बंद झालं, की पुढं कोणी लेखकच उरणार नाही. म्हंजे मग ना रहेगा लेखक, ना होगी पुरस्कारवापसी! एक दगड में दोन दोन लिचिंग! कसं?’

-balwantappa@gmail,com