हेमंत प्रकाश राजोपाध्ये

‘इति ह आस’ (हे असे होते / घडले) या व्युत्पत्तीद्वारे ‘इतिहास’ या शब्दाची व्याख्या आपल्याकडच्या परंपरागत वैचारिक विश्वात केली जाते. थोडक्यात, ‘भूतकाळात घडलेल्या घटनांच्या तपशिलांची जंत्री म्हणजे इतिहास’ अशी एक ढोबळ धारणा ‘इतिहास’ या शब्दाविषयी दिसून येते. भारतीय किंवा उपखंडातील इतिहासाविषयी चर्चा करताना ‘उपखंडामध्ये इतिहास लिहून ठेवण्याची वा तत्कालीन घटनांच्या नोंदी लिहून ठेवण्याची प्रथा नसल्याने उपखंडात/भारतात राहणाऱ्या लोकांमध्ये ऐतिहासिक दृष्टीचा अभाव राहिला’ असा एक मतप्रवाह दिसून येतो. हे मत मांडताना अर्थातच उपखंडातील ऐतिहासिक परंपरांची तुलना केली जाते ती पाश्चात्त्य- म्हणजे ग्रीक इतिहास लेखनाच्या किंवा चिनी राजघराण्यांविषयीच्या नोंदी तपशीलवार लिहून ठेवणाऱ्या परंपरांशी!

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!

त्या दृष्टीने पाहता साधारणत: इ. स. सहाव्या-सातव्या शतकांपर्यंत आपल्याकडे राजकीय घराणी व घडामोडी यांच्याविषयीचे तपशील, नोंदी लिहून ठेवण्याची व्यवस्था राजाश्रयाने वा कुणा धनाढय़ सावकाराच्या पाठबळाने निर्माण झाल्याचे दिसत नाही. सातव्या शतकादरम्यान मात्र राजवंशांची माहिती, वंशावळ्या, राजकीय संघर्ष, सामाजिक घडामोडी यांची जंत्री मांडणाऱ्या वेगवेगळ्या स्रोतांची मालिका निर्माण झाल्याचे दिसून येते. अर्थात या स्रोतांची मांडणी बहुतांशी अतिरंजित व काहीशा अतिमानवीय कल्पनांच्या चौकटी वापरून झाल्याचे दिसते. भूतकाळात घडलेल्या घटनांच्या नोंदी वा तपशील लोकविश्वात आणि मानवी व्यवहारांमध्ये अशा रीतीने प्रसृत होण्याची प्रक्रिया नेहमीच रोचक आणि तितकीच जटिल असते. लेखन-वाचन अथवा साक्षरतेच्या प्रसारावर सामाजिक रूढी आणि अन्य कारणांमुळे मर्यादा असलेल्या भारतीय उपखंडासारख्या भू-सांस्कृतिक संदर्भात या प्रक्रिया आणखी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात. याचं कारण असं की, अतिंद्रिय-गूढवादी शैलीत किंवा प्रशस्ती, भक्ती, आदरजनित गौरवाच्या रूपात राजकीय-सामाजिक घडामोडी आणि सांस्कृतिक प्रक्रियांविषयीच्या नोंदी मौखिक स्वरूपात जेव्हा अनेक पिढय़ांतून संक्रमित केल्या जातात तेव्हा त्या त्यांच्यासोबत पुष्कळदा काही प्रक्षेप, अधिक्षेपयुक्त पुरवण्या घेऊन पुढील पिढय़ांच्या हाती सुपूर्द होतात. त्या संक्रमित होताना संबंधित सर्व पिढय़ांतून त्या विवक्षित घटनांविषयी अथवा आख्यानांविषयी निर्माण झालेल्या सांस्कृतिक-सामाजिक स्मृतींना संबंधित देशकालाचे आणि तत्कालीन अर्थव्यवहार व संस्कृतिकारणानुरूप कोंदणेदेखील मिळतात. असे तपशील आणि स्मृती समाजापर्यंत पोहोचताना केवळ इतिहास अथवा संबंधित घटनांची जंत्री पोहोचवण्यापेक्षा संबंधित घटनांविषयी सामाजिक-सांस्कृतिक धारणा निर्माण करण्याचे काम करतात.

या धारणांच्या चौकटी पुढील प्रत्येक पिढीत पोहोचतात त्या बहुगुणित (Reciprocate) होऊनच! या बहुगुणित होण्याच्या प्रक्रियांना पुन्हा त्या-त्या काळातील संस्कृतिकारण, राजकारण यांचे संदर्भ देशाकालानुरूप चिकटतात. मग तो इतिहास हा केवळ इतिहास न राहता बहुरंगी, बहुग्रंथी असा धारणांचा बहुरूपदर्शी ‘कॅलिडोस्कोप’ बनतो. त्यातून पाहणाऱ्याला भूतकाळाविषयीची दृश्ये त्यामुळेच वेगवेगळ्या रूपांत दिसतात. या धारणांच्या अभिव्यक्तीला राजकीय-सांस्कृतिक-वांशिक चौकटींच्या किनारी मिळाल्या, की या धारणा अस्मितेत परिवर्तित होण्यासाठी वेळ लागत नाही. या अस्मितांच्या गदारोळात मानवी भूतकाळाप्रमाणेच वर्तमानातील घटना आणि भवतालाविषयीचे भानदेखील हरपून जाण्याचा धोका निर्माण होतो.

गेले नऊ महिने ‘धारणांच्या धाग्यां’चे अनेकविध पदर उलगडताना आपण भूतकाळातील अशा अनेक जटिल प्रक्रिया आणि त्यातून विकसित झालेल्या धारणांच्या चौकटी चाचपत आलो. उत्तर-प्राचीन आणि मध्ययुगाच्या प्रारंभकाळातल्या उपखंडातील राजकीय व्यवस्थांतील उलथापालथी, ऐतिहासिक राजकुलांचे संघर्ष, उपखंडाबाहेरील व्यापारी समूहांशी होत असलेले इथले व्यापारी आणि राजकीय पटलावरील व्यवहार अशा अनेक गोष्टी आपण गेल्या काही लेखांत पाहिल्या. हे पाहताना सातव्या शतकात अरबस्तानात स्थापन होऊन वाढीला लागलेल्या इस्लाम धर्माचे आगमन भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर झाल्याचे आपण पाहिले. दक्षिण भारतातल्या केरळ-कर्नाटक प्रांतांत व्यापारी व्यवहारांतून इस्लाम प्रवेशता झाला, तर इथल्या राजकीय चौकटींत इस्लामचा प्रवेश झाला तो पश्चिम किनाऱ्यावर राष्ट्रकूट राजांनी नेमलेल्या अरब अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय चंचुप्रवेश झाला. इस्लामचे आगमन भारतीय उपखंडाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले. या लेखमालेच्या प्रारंभीच्या लेखांत पाहिल्यानुसार ग्रीकांच्या आगमनामुळे उपखंडातील सांस्कृतिक धारणांना नवे आयाम आणि अर्थ मिळण्यास प्रारंभ झाला. (पाहा : या लेखमालेतील ‘धर्म, धम्म आणि श्रद्धा’ हा लेख, ४ मे २०१८) इस्लामच्या आगमनामुळेसुद्धा त्याच पद्धतीचा प्रभाव अधिक प्रकर्षांने उपखंडातील संस्कृतिकारणावर झाल्याचे दिसून येते.

आपण मागील लेखात पाहिलेल्या उत्तर भारत आणि दख्खन प्रांतातील राजकीय संघर्षांच्या पृष्ठभूमीचा आढावा घेता एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते. ती अशी की, गुप्त-वाकाटकांच्या साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पूर्ण उपखंडावर आधिपत्य गाजवणारे तितक्या ताकदीचे राजकुल वा समुद्रगुप्त-चंद्रगुप्तासारखा बलाढय़ राजा उत्पन्न झाला नाही. मात्र गुप्तोत्तरकालीन राजकीय इतिहासाची साधने पाहिल्यास आपल्याला एक लक्षणीय गोष्ट दिसून येईल, की काश्मीर किंवा नेपाळसारख्या छोटय़ा, तुलनेने कमी महत्त्वाच्या राजकुलांच्या इतिहासाच्या नोंदी ठेवणाऱ्या साहित्यकृती या काळात जन्माला आल्या. चालुक्य-राष्ट्रकूट राजांविषयीची तत्कालीन वर्णने करणाऱ्या प्रशस्ती पाहिल्या तरी मर्यादित भौगोलिक अवकाशात या राजांचा राजकीय प्रतिस्पध्र्याशी झालेला संघर्ष, राजकुलांतर्गत आणि दोन राजकुलांतली सत्तास्पर्धा यांचे वर्णन एखाद्या जगज्जेत्या सम्राटाच्या पराक्रमाइतके वा पौराणिक देवावताराच्या पराक्रमाचे वर्णन वाटावे इतपत रंजित करून मांडलेले दिसते. अशा वर्णनांत राजांचे उल्लेख करताना पृथ्वीवल्लभ-लक्ष्मी/श्रीवल्लभ वगरे विशेषणे त्या राजांना उद्देशून वापरलेली दिसतात. केंद्रीय, एकछत्री अंमल नाहीसा होऊन विभागीय प्रांतांतील वेगवेगळ्या आर्थिक-राजकीय परिप्रेक्ष्यात उदयाला आलेल्या स्थानिक राजांनी युक्त असलेल्या या व्यवस्थेला सामाजिक शास्त्रांत ‘सामंतशाही’ (Feudalism) असं म्हटलं जातं. यात राजाच्या साक्षात अधिकारव्यवस्थेत एक मोठा प्रदेश असे आणि व्यवस्थेच्या सुकरतेसाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हातात काही प्रदेश चालवण्यासाठी दिलेले असत. शिवाय स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि स्थानीय सांस्कृतिक-धार्मिक अधिकार बाळगणारे, विवक्षित समूहांचा पाठिंबा मिळवण्याची शक्ती बाळगून असलेले समूहप्रमुख अशांच्या हातात सत्तेचे अनौपचारिक वा औपचारिक विकेंद्रीकरण झालेले दिसून येई. यात राजाचे अधिकार, त्याच्या अधिकाऱ्यांचे अधिकार यांची चौकट बऱ्याच प्रमाणात निश्चित केली गेली असली, तरी स्थानीय जमिनी-वहिवाटीविषयीचे अधिकार आणि नियंत्रण हे बऱ्याचदा स्थानिक जमीनदार, श्रेष्ठी मंडळींच्या हाती असत.

यात सामान्य प्रजा आणि नागरिकांच्या हातात संबंधित स्थानीय धनदांडगे जमीनदार, राजकीय व्यवस्थांचे अधिकारी आणि राजा-राजकुल यांद्वारे चालवण्यात येणाऱ्या काहीशा विस्कळीत आणि अधिकारशाहीच्या दर्पाने युक्त अशा व्यवस्थेत चरितार्थ चालवण्याशिवाय काहीही गत्यंतर नसे. इस्लामपूर्व राजवटीप्रमाणेच इस्लामी राजवटीमध्ये राजकीय, आर्थिक बाबींविषयीचे किंवा जमिनी-करपद्धतीविषयीच्या चौकटी बनवायचे व हवे तसे बदल करण्याचे अधिकार  हे संबंधित अधिकारी, स्थानिक जमीनदार-जहागीरदार यांच्या आणि अंतिमत: राजाच्या हातात असत. ही व्यवस्था आपल्याला अगदी शिवछत्रपतींच्या शासनव्यवस्था हाती घेण्याच्या काळापर्यंत दिसून येते. मागील लेखात पाहिल्यानुसार, या स्थानिक राजकीय सत्तांच्या संघर्षांत छोटी गावे, त्या गावांतील प्रार्थनास्थळे, मठ, स्त्रिया, मुले आणि सामान्य प्रजा भरडली जात असे. चालुक्य, कदंब, राष्ट्रकूट, कर्कोटक, चोळ, पांडय़ वगरे साऱ्याच राजांनी शेजारच्या राज्यांवर, जवळच्या भूप्रदेशावर हल्ले करून तिथली शहरे चिरडली, तर कुठे शहरांचे अक्षरश: पीठ केले. धार्मिक अधिकारांच्या जोरावर आणि धार्मिक स्थळांसाठी वा कर्मकांडांच्या निमित्ताने मिळालेल्या जमिनींच्या उत्पन्नामुळे आर्थिक सत्ताही प्राप्त केलेले ब्राह्मण किंवा सामरिक सामथ्र्य आणि पराक्रमाच्या जोरावर बलवत्तर झालेले, क्षत्रियत्वाचा दावा करणारे राजपूत वगरे समूह यांच्या हातात या राजकीय अधिकारांच्या उतरंडीमध्ये बरीचशी अधिसत्ता गेल्याचं दिसून येतं. थोडक्यात, सामंतशाहीच्या सरंजामी व्यवस्थांमध्ये हिंदू अथवा मुस्लीम- कोणत्याही धर्माच्या अनुयायाची सत्ता असली, तरीही सामान्य (हिंदू व मुस्लीम) प्रजा नेहमीच त्या राजकीय हक्कदारांच्या अधिकारांच्या बोजाखाली दबूनच राहिली.

इस्लामी सत्ता स्थिर होण्यापूर्वी इथल्या राजांसाठी यज्ञ केल्यानं राजकृपा प्राप्त झालेले पुरोहित समूह आणि युद्धात पराक्रम गाजवून मोबदल्यात भौगोलिक प्रदेशातील अधिकारसूत्रे मिळालेले योद्धे समूह यांच्या समीकरणातून इथल्या सामाजिक व्यवस्थांची व्याप्तीदेखील वाढत गेली. स्थानिक राजांसाठी युद्ध करून त्यात पराक्रम गाजवणाऱ्या वेगवेगळ्या समूह-कुटुंबांनी भवतालातील वैदिक-अर्धवैदिक-पुराणप्रणीत स्मार्त धर्मव्यवस्थांचे आचरण करत क्षत्रियत्वावर दावा करण्यास सुरुवात केली. बऱ्याचशा मध्ययुगीन राजकुलांचे संस्थापक स्थानिक लोकासमूहांतून येऊन या रीतीने क्षत्रियत्व प्राप्त करते झाल्याची पुष्कळ उदाहरणे इतिहासात उपलब्ध आहेत. अशा स्थानिक नेत्यांना-अधिकाऱ्यांना क्षत्रियत्व प्राप्त करवून देणारे अथवा वैदिक-पौराणिक/स्मार्त व्यवस्थेत प्रवेश करवून देणारे वेगवेगळे विधीही यादरम्यान आकाराला आलेले दिसून येतात. वेगवेगळ्या काळात इथे आलेल्या शक-पहलव-हूण-सिथियन वगरे समूहांनी इथल्या धर्मव्यवस्थांचा अंगीकार केल्याची उदाहरणे ग्रीक क्षत्रप आणि कुशाण राजांपासून आपल्या इतिहासात दिसून येतात. त्यांनी नव्याने मिळवलेले क्षत्रियत्व किंवा ब्राह्मणत्व इथल्या सामाजिक व्यवस्थांच्या व जाति-वर्णव्यवस्थांच्या गतिमानतेला आणि सामाजिक धारणांना नवे आयाम देत गेलं.

उपखंडातील वेगवेगळ्या सामूहिक धारणा-अस्मिता (Identities) यांचा मागोवा घेत गेलं, की अशा अनेक प्रक्रियांद्वारे इथल्या सांस्कृतिक-सामाजिक व्यवस्थांच्या हक्कदारांच्या उद्गमाविषयीची निराळीच वास्तवे समोर येतात. आधुनिक काळात या वास्तवांच्या ऐतिहासिकतेला अभिजन-बहुजनवादाचे, ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचे मापदंड लावताना घडून आलेल्या प्रक्रियांच्या विश्लेषणातून या मापदंडांच्या मर्यादा आणि गुंतागुंतीही स्पष्ट होतात. ‘धारणांच्या धाग्यां’च्या उकलीचा हा प्रवास अंतिम टप्प्यावर येत असताना आपल्याला उर्वरित भागांत या प्रक्रियांपकी संस्कृतायझेशन, क्षत्रियीकरण-राजपुतीकरण-यादवायझेशन या संकल्पना (अर्थात पर्यायाने जातिव्यवस्था) आपल्याला लक्षात घ्यावयाच्या आहेत. त्यानंतर मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील हिंदू आणि मुसलमान या अस्मितांचे औचित्य तपासत आजचा भारतीय राष्ट्रवाद आणि संस्कृतीविषयक धारणांपर्यंत यायचं आहे. या प्रक्रियांचा संक्षेपात आढावा घेण्यासाठीची आवश्यक बठक आपण प्राचीन आणि मध्यपूर्वयुगीन ऐतिहासिक घडामोडींच्या चच्रेतून बनवायचा प्रयत्न केला आहे. वेळ आणि जागेच्या मर्यादेमुळे इस्लामी सुलतानशाही, मुघलशाही, मराठय़ांचा इतिहास वगरे बहुचर्चित विषय विस्ताराने न पाहता त्या काळातील मोजके महत्त्वाचे संदर्भ या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ांचा विचार करताना आपल्याला तपासायचे आहेत.

(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ‘ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)

rajopadhyehemant@gmail.com