‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करत भारतीय समाजाच्या सांस्कृतिक-राजकीय आणि सामाजिक इतिहासातील वेगवेगळ्या पदरांना उलगडत आपण ‘धर्मव्यवस्थां’च्या गाभ्याकडे येऊन ठेपलो. धारणा हा शब्द ज्या ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनला आहे, त्याच ‘धृ’ या धातूमध्ये धर्म या शब्दाचे मूळ आहे. यापूर्वीच्या भागांमध्ये ‘धर्म’ या शब्दाविषयीच्या चच्रेला प्रारंभ करताना आपण ‘धृ’ या धातूचे ‘धारण करणे’, ‘सुस्थापित करणे’ किंवा ‘आधार देणे’ असे वेगवेगळे अर्थ पाहिले. त्या अनुषंगाने मानवी भावविश्वाचा महत्त्वाचा भाग असलेले श्रद्धाविश्व आणि समाज-नियमन करण्यासाठी रूढ झालेल्या विशिष्ट संकेतांची चौकट असे धर्म या शब्दाचे दोन अर्थ आपण अगदी थोडक्यात पाहिले. या संकल्पनेचे मूळ, त्याविषयीचे आदिम समज आणि स्वरूप आणि त्यांविषयीच्या धारणांमध्ये होत गेलेले बदल पाहाण्यासाठी सुरू केलेल्या चच्रेत आपण समाजनियमनपर चौकटीचे मूळ ‘ऋत’ या कल्पनेवर कसे बेतलेले याचा आढावा घेतला. आणि त्यानंतर धर्म शब्दाच्या श्रद्धापर अर्थछटेच्या विकसनाचा इतिहास पाहाताना ‘ऋण’ या संकल्पनेविषयी चर्चा केली. समाजधारणा करणाऱ्या संकल्पनांवर बेतलेली समाजव्यवस्था निर्माण होताना ऋत किंवा ऋण यांसारख्या संकल्पनांची व त्यांच्या मुळाशी असलेल्या आधारभूत धारणांची व्याप्ती आणि अर्थ यांच्यात होणारे बदल धर्म या संस्थेच्या आकलनासाठी महत्त्वाचे ठरतात. त्याच अनुषंगाने ‘धर्म’ शब्दाविषयीच्या आदिम परिभाषा व त्या संकल्पनेचे उपलब्ध साधनांत नोंदले गेलेले आदिम स्वरूप काय होते, याविषयी आपण या भागात चर्चा करणार आहोत.

गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो. ऋत तत्त्वाच्या आधारे वरुण या देवतेच्या प्रशासनाखाली विश्व संचालन होत असल्याची ऋग्वेदीय धारणा हे धर्माचे आदिम रूप हे आपण पाहिले. ऋग्वेदीय सूक्तांतून प्रतििबबित होणाऱ्या समाजव्यवस्थेकडे पाहिले असता त्या काळात सप्तसिंधूंच्या खोऱ्यातील या ऋषीसमाजाला स्थिरत्व प्राप्त होऊन तिथे या समाजात वेगवेगळ्या सामाजिक मूल्यांच्या विकसनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येते. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ऋग्वेदात आढळून येणारी धर्म ही संकल्पनादेखील विकसनशील असल्याचे आढळते. ऋग्वेद ५.१५.२ या मंत्रात म्हटल्याप्रमाणे,

ऋतेन ऋतं धरुणं धारयन्त यज्ञस्य शाके

परमे व्योमन्।

दिवो धर्मन्धरुणे सेदुषो नृञ्जातैरजातॉं

अभि ये ननक्षु:।।

(अर्थ :  सर्वोच्च अशा आकाशलोकात अतिशय प्रभावी असा यज्ञ करताना त्यांनी (अंगिरस ऋषीसमूहाने) सत्याला आधार दिला, सत्याच्या आधारेच सत्य तत्त्वाला त्यांनी तो आधार दिला व त्या सत्याच्या आधारे ते श्रेष्ठ अशा (देव) लोकांना जाऊन मिळाले, जे लोक त्या (सत्याच्या) आधाराद्वारे निर्माण झालेल्या आसनावर विराजमान होते व ते भौतिक जन्म घेऊनदेखील अजन्मा अशा अवस्थेला पावले होते.)

या मंत्राचा अर्थ तसा काहीसा कठीण आणि गुंतागुंतीचा असल्याने आपण थोडक्यात त्याचा सारांश पाहू या. मंत्रातील मुख्य भाग हा की अंगिरस नामक ऋषिसमूहाने सत्याच्या आधारावर बेतलेल्या कर्मकांडाच्या/यज्ञाच्या मदतीने विशिष्ट अशी उन्नत अवस्था प्राप्त करून घेतली असे सूक्तात म्हटले आहे. थोडक्यात, सत्य या तत्त्वाच्या आधारावर या विश्वाचा डोलारा बेतलेला आहे. आणि हे सत्य तत्त्व हेच ऋषिसमाजातील यज्ञ या कल्पनेचे उन्नत स्वरूप असल्याची धारणा या सूक्तात व्यक्त झाली आहे. यज्ञ हा स्वर्गप्राप्तीचा मुख्य मार्ग, पर्यायाने वेदधर्म असल्याने हा धर्म हे तत्त्व देवलोक आणि स्वर्गलोकाचाही आधार असल्याची धारणा ऋषिसमाजात होती. त्यामुळे ऋग्वेदीय समाजात धर्म हा यज्ञ किंवा कर्मकांड या स्वरूपात अभिव्यक्त झाल्याचे दिसते. या अशा स्वरूपाची धर्माची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिभाषा ऋग्वेदात विविध ठिकाणी केल्याचे दिसून येते. यज्ञ हाच धर्म असल्याचे सांगताना कुठे अग्नि हा विश्वाचे नियमन करतो, त्याच्या आधारावर स्वर्ग आणि पृथ्वी लोक व हे विश्व अस्तित्वात आहे अशा धारणा ऋग्वेदात जागोजागी (ऋग्वेद १०.१७०.२, १०.८८.१ अशा सूक्तांत) दिसून येतात. काही सूक्तांत अग्नीची ही भूमिका सोम या देवतेला देऊन सोम हा यज्ञाच्या आधारे विश्वनियमन करतो अशी कल्पना दिसून येते. अशा सूक्तांत कल्पिल्याप्रमाणे सोम हा केवळ विश्वाचे नियमन करतो असे नसून, तो देवतांना विशेषत: इंद्राला आधारभूत ठरणारा महत्त्वाचा घटक असल्याचे ऋषींनी म्हटले आहे. यज्ञविधींमध्ये सोमवल्ली पाटय़ावर वाटून तिचा रस पिणे या विधीला यज्ञव्यवस्थेत आत्यंतिक महत्त्व असून; तो रस देवतांना शक्ती प्रदान करतो अशी ऋषिसमाजाची धारणा असल्याने, सोम हा परम-पावक असल्याचे ऋषिसमाजात मानले गेले होते. त्या पावनत्वामुळे सोमाच्या ठायी विश्व धारण करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच तो यज्ञाचा, पर्यायाने धर्माचा मुख्य आधार आहे, अशी त्यांची धारणा होती.

धर्म ही संकल्पना स्वर्गलोकाचा किंवा देवलोकाचा यज्ञस्वरूप आधार होती अशी ऋषींची जशी धारणा होती त्याचप्रकारे यज्ञाला देखील काही आधार असणार असेही त्यांना वाटत होते. आणि यज्ञाचा हा आधार काय? तर तो धर्मच, असंही ऋग्वेद सांगतो. हे नमूद करणारा आजच्या आपल्या नित्यपठणातील मंत्रपुष्पांजलीमध्ये येणारा पुरुषसूक्तातील मंत्र पाहूया:

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।

ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या:

सन्ति देवा:।।

(अर्थ : यज्ञाच्या साहाय्याने देवांनी यज्ञ केला आणि तोच खरा पहिला धर्म होता. त्या धर्माच्या महिम्यामुळे ते देव (नाकम् अर्थात दु:खहीन अशा) स्वर्गलोकाला गेले, जिथे आधीच पोहोचलेले साध्य असे प्राचीन देवसमूह अस्तित्वात होते.)

अर्थात, या जगातला पहिला धर्म हा देवतांनी केलेला यज्ञ होता आणि त्याचे रूपांतर मानवी समाजातील यज्ञात अर्थात यज्ञ-धर्मात झाले. ऋग्वेदातील यज्ञपर कर्मकांड विकसित होऊ लागलेल्या समाजात काही भौतिक लाभांसाठी देवतांना प्रसन्न करून घेणे, व त्यासाठी विशिष्ट चौकटींनी युक्त असलेले, वर म्हटल्याप्रमाणे आदर्शभूत मानल्या गेलेल्या देवतागणांनी केलेल्या यज्ञासारखे कर्म पार पाडणे यावर ऋषिसमाजाचा कटाक्ष असल्याचे दिसून येते.

हे यज्ञकर्म हा विश्वाचा आणि देवलोकाचादेखील आधार आहे, कारण यज्ञाद्वारे इंद्रादिक देवतांना हविर्भाग अथवा सोम अर्पण केला जातो, त्यातून त्यांना शक्ती प्राप्त होते. म्हणून यज्ञीय अग्नि हा देवतांपर्यंत हवी पोहोचवणारा/त्या हविद्र्रव्याचे वहन करणारा पर्यायाने धर्माचेच वहन करणारा असा धर्माचा आधार आहे, अशी ऋग्वेदीय ऋषिसमाजाची पक्की धारणा होती.

धर्म हा शब्द प्रामुख्याने यज्ञपर अर्थाने वापरला गेल्याचे या सूक्तांतून दिसत असले तरी ऋग्वेदांतच धर्म हा शब्द देवतांचा स्वभाव याअर्थीदेखील वापरला गेला असल्याचे ऋग्वेदात दिसून येते. मागच्या लेखांत म्हटल्याप्रमाणे ऋतनियमांचे परिपालन करत ठरलेल्या गतीने उदयास्त पावणारे मित्र/सूर्य, उषस् किंवा रुद्र या देवतागणाचे उग्र स्वरूप असे देवतास्वरूप पावलेल्या सृष्टीतील शक्तींचे हे स्वभाव सृष्टिनियमनाची गती धारण करतात अर्थात त्यांचा धर्म आचरतात. किंवा माता-पित्यांची उपमा दिले गेलेले स्वर्ग आणि पृथ्वी सृजनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ऋग्वेद ५.८५.४ मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाशाद्वारे सोडले गेलेले पर्जन्यरूपी रेत/वीर्य पृथ्वी धारण करते व त्यातून सृष्टिनिर्मिती होते. द्युलोक किंवा द्युपिता (द्यू म्हणजे स्वर्ग) आणि पृथ्वी माता या प्रतिकातून निदíशत केलेला विश्वसृजनाचा खेळ हादेखील विश्वातील एक धर्म असल्याची ऋग्वेदातील ऋषिसमाजाचा समज असल्याचे दिसून येते. आणि अर्थात, याच प्रक्रियेच्या आधारावर विश्वाची धारणा होत असल्याने द्यावापृथिवी (द्युलोक आणि पृथ्वी) यांच्या प्रतीकातून मानवी जीवनातील सृजनप्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कुटुंबव्यवस्थेला आणि पर्यायाने व्यापक समाजव्यवस्थेला ऋषिसमाजाने व त्यांच्या पुढील पिढय़ांतील वारसदारांनी (हे वारसदार जैववंशजच / biological descendants होते असे ठाम सांगता येत नाही) ‘धर्म’ अशी संज्ञा दिल्याचे दिसून येते. या चच्रेचा सारांश काढावयाचा झाल्यास खालील तीन मुद्दे ठळकपणे दिसतात :

१) धर्म या इंडो-इराणीय भाषासमूहातील शब्दाचा मूळ धातू असलेला ‘धृ’ हा विशिष्ट तत्त्वांची धारणा, आधार देणे, सुस्थापित करणे अशा अर्थाचा आहे.

२) धर्म या शब्दाचा एक अर्थ भौतिक जीवनातील, निसर्गातील किंवा एकुणात विश्वातील विविध तत्त्वांचा प्रमुख आधार असा आहे तर काही ठिकाणी यज्ञीय कर्मकांडाद्वारे निर्माण केले गेलेले किंवा यज्ञीय कर्मकांडांचा आधारभूत असलेले तत्त्व असा धर्म शब्दाचा एक आदिम अर्थ आहे.

३) वरुण, मित्र वगरे देवतांकडे ऋत-किंवा वैश्विक धर्माचे परिपालन करण्याच्या कार्याला किंवा अन्य सृष्टीतील शक्तींच्या नियमित कार्याला उद्देशूनदेखील धर्म ही संज्ञा वापरली गेली आहे.

वरील परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे मानवी श्रद्धेनुसार कल्पिलेल्या यज्ञादिक परंपरा, देवातादि अतिमानवीय शक्तींची आदर्शभूत मानली गेलेली स्वभाववैशिष्ट्ये किंवा काय्रे आणि त्या आदर्शवादातून किंवा संकेतांतून मानवी जीवनावर त्यांचे अध्यारोप करून निर्माण झालेली समाजव्यवस्था यांना पर्यायाने धर्म अशी संज्ञा दिली गेल्याचे आपल्याला दिसून येते. ऋग्वेद या प्राचीनतम वेदाप्रमाणे यजुर्वेद व अन्य वैदिक साहित्यात कर्मकांडप्रधान व्यवस्था वाढीला लागून ती पुढे ओसरू लागल्याचे दिसते. यज्ञपर कल्पना किंवा ऋग्वेदापासून दिसून येणाऱ्या विश्वसृजनाविषयीच्या कल्पना, देवतांची स्वभाववैशिष्टय़ व भलीबुरी कृत्ये त्यांच्या आधारे मानवी समाजात घडवले गेलेले नीतीनियम अशा विविध घटकांतून ‘धर्म’ नावाची महाकाय व्यवस्था निर्माण झाल्याचे दिसते.

पुढील काही लेखांत याविषयीच्या काही ठळक बाबींचा व वेदांतील नोंदींचा आढावा घेऊन त्याआधारे धर्म या संकल्पनेला पूरक अशा धारणांची निर्मिती कशी होत गेली याची चर्चा करणार आहोत. त्याआधारे कुटुंबव्यवस्था, नीतिमूल्यांची चौकट व समाजाच्या नियमनासाठी निर्माण झालेली धर्मशास्त्रे (books of laws किंवा तत्कालीन संविधाने) इत्यादींची चर्चा करायची आहे. आधुनिक समाजात धर्म, या संकल्पनेला रिलिजन किंवा ‘श्रद्धा’ असा अर्थ प्राप्त होऊन तोच रूढ झाल्याचे दिसते. धर्म या संकल्पनेचे मूळ अर्थ मागे पडून वासाहतिक इंग्रज व अन्य पाश्चात्त्य समाजातील कल्पनांनी धर्म या कल्पनेच्या मूळ अर्थाला झाकोळून कसे टाकले व त्याचे काय परिणाम झाले हेदेखील आपल्याला पुढील भागांतून पाहावयाचे आहे.

rajopadhyehemant@gmail.com

छायाचित्र सौजन्य : http://anudinam.org