‘संस्कृती’ हा शब्द मानवी इतिहासाविषयीच्या लोकप्रिय धारणांच्या चौकटीतला एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. इतिहासाविषयीच्या अस्मिता आणि आकस दोन्ही समांतर आणि टोकाच्या जाणिवा या शब्दाविषयीच्या धारणांतून आकाराला येतात. ‘सं’ हा उपसर्ग (prefix) आणि ‘कृ’ (करणे) हा धातू यांच्या संयोगातून बनलेला हा शब्द मानवी समूहांच्या जाणिवांच्या इतिहासाच्या उत्क्रांतीचे निदर्शन करण्यासाठी बनला असावा. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीमध्ये तुलनेने उशिरा निर्माण झालेला, दोन पायांवर चालणारा, ताठ कणा असलेला मानवप्राणी आपल्या जाणिवा, संवेदनशीलता आणि बुद्धी यांच्या जोरावर इतर प्राण्यांच्या-पशूंच्या तुलनेत आपले वेगळेपण सांगतो, ते या बुद्धिजन्य जाणिवा आणि संवेदनशीलतांतून स्वत:च्या पशुत्वावर केलेली मात आणि त्यातून घडवलेल्या नतिक-मूल्याधिष्ठित धारणांच्या जोरावर. वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर स्वत:च्या मनातील उपजत धारणांना, ऊर्मीना आणि रागलोभादिक संवेदनांना वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर नियमित करण्यासाठी विशिष्ट चौकटींच्या कक्षांत सार्वजनिक जगात वावरताना जाणवलेल्या जाणिवांच्या कसोटीवर घासूनपुसून सं+कृत अर्थात संस्कृत-संस्कारित करण्याच्या अविरत वैयक्तिक अथवा सामूहिक प्रयत्नांचे मूर्त रूप म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागातील संस्कृती. इंग्रजीतला ‘कल्चर’ हा शब्द आणि क्रियापद संस्करण अथवा संस्कार या शब्दाचे अक्षरश: प्रतिरूप. म्हणूनच धारणांच्या विकसनाचा आपण पाहात असलेला हा प्रवास वेगवेगळ्या काळात उपजलेल्या संवेदनांच्या चौकटीत सिद्ध केलेल्या मूल्यांच्या विकसनांची आणि मानवी समाजाच्या संस्करणाच्या बहुविध प्रक्रियांचीच अभ्यासचर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय उपखंडामधल्या मानवी समूहांच्या या इतिहासाची चर्चा करत इथवर येताना, गेल्या भागातल्या राजव्यवस्था आणि त्याअनुषंगाने राजनीती, दंडनीती आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बलहिंसा इत्यादींच्या वापराविषयीच्या चौकटी आखणाऱ्या राज्यव्यवहारशास्त्रपर ग्रंथातील काही महत्त्वाच्या तत्त्वांचा आढावा घेतला. स्वत:च्या आणि आपल्या राज्याच्या राजकीय आकांक्षांच्या पूर्तीसाठी, संरक्षणासाठी कूटनीती, दंड, हिंसा इत्यादी साधनांचा वापर हा राजनीतिज्ञ आचार्याना मान्य असून, त्यांनी त्याविषयी केलेल्या सूचना आणि कूटनीतिपर चाले, त्याविषयीचा विवेक आणि ऐतिहासिक उदाहरणांद्वारे त्याची केलेली चर्चा यांचा परामर्श आपण घेतला. इ.स.पू. ६०० ते इ.स. ६०० या काळातल्या या राजकीय-सामाजिक इतिहासात यज्ञीय पशुहिंसा, युद्धातील नरिहसा आणि मृगया-शिकार, इत्यादी खेळांतून होणारी पशुहिंसा अशा वेगवेगळ्या स्तरावरील हिंसा आणि त्यांच्या समर्थनांविषयीच्या चर्चा त्या त्या शास्त्राविषयीच्या ग्रंथात दिसून येतात. विविध स्तरावरील हिंसेच्या-बलप्रयोजनाच्या या प्रकारांना राजकीय-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात राजधर्म-यज्ञधर्माच्या कोंदणात बसवून (‘यज्ञीय हिंसा ही हिंसा ठरत नाही’ यासारख्या समजुतींद्वारे) त्यांना प्रमाणित करण्यात आले. आणि राजाच्या किंवा धर्मविधींच्या अधिकाराच्या चौकटीत त्या हिंसांना गौरवास्पदच स्थान प्रदान करण्यात आल्याचं दिसतं. पृथ्वीच्या लाभासाठी आणि पालनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या या शास्त्रांनी अधिकारप्राप्त राजाला सर्वसामथ्र्यवान राहाण्यासाठी सुचविलेल्या नीतिमार्गाच्या पृष्ठभूमीवर मानवी इतिहासांत विशिष्ट अधिकार (authority), बल (power) आणि समूहविवेक यांच्या संतुलनाविषयीच्या कल्पनांचा इतिहास व त्यातील विरोधाभास पाहात- तपासत राहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. विशिष्ट वर्णाना असलेल्या अधिकारकक्षेत प्रवेश केल्याबद्दल शंबूक या वन्य समूहातील मनुष्याचा मर्यादापुरुषोत्तम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रामाने केलेला वध असो. किंवा शांतीचे आणि समावेशकतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या सम्राट अशोकाने आपला राज्यातील वन्यजमातींविषयीची शत्रुत्वाची भावना आणि त्यांविषयी शिलालेखांतून दिसून येणारं लक्षणीय चित्रण, त्यांच्यातल्या संघर्षांचे उल्लेख असोत, उपखंडातील इतिहासात विविध समूहांतले संघर्ष, सामूहिक अस्मिता आणि व्यवस्थांतून निर्माण झालेले मतभेद आणि संघर्ष लक्षणीय ठरतात. हे संघर्ष तत्कालीन प्रादेशिक-सामाजिक व्यवस्थाविषयीच्या धारणा आणि मूल्यप्रणालींच्या चष्म्यातून पाहिले असता अनेक रोचक बाबी दृष्टीस येतात. पुरोहित वर्गाला झालेल्या आश्रम-अग्रहारांच्या वाटपातून त्या त्या लाभधारकांचा आणि संबंधित वन्यप्रदेशातील वन्य जमातींचा झालेला संघर्ष, अशोककालीन राजव्यवस्थेला वाटत असलेला सीमावर्ती वन्यजमातींविषयीचा वैरभाव, महाभारतात खांडववनप्रसंगीचे नागांचे शिरकाण.. अशा वेगवेगळ्या प्रसंगातून हे संघर्ष ठळक दिसून येतात. उपखंडातील प्राचीन काळातील बलवत्तर ठरलेल्या राजकीय व्यवस्थेचे प्रमाणीकरण हे वैदिक धर्माच्या चौकटीत घडून आले. रामायण-महाभारतात वर्णन केलेले वर्णाश्रमधर्मी राजे किंवा वर्णधर्मानुसार क्षत्रिय (खत्तीय) जातीतील राजपुत्राने, बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे पालन करणारा प्रमुख राजा अशोक हे त्याअर्थाने प्रस्थापित-नागर समाजाचेच प्रतिनिधी ठरतात. या पृष्ठभूमीवर त्यांचा वन्य जमातीतील मानव समूहांविषयी असलेला वैरभाव हा लक्षणीय ठरतो. आश्रम-अग्रहार किंवा मठांना दिलेल्या वन्य प्रदेशांतील जमिनी, त्यांचे अर्थकारण आणि त्या वन्य प्रदेशांत पूर्वीपासून रहिवास असलेल्या वन्य समूहाचे संघर्ष हे बलवत्तर समाजाकडून वन्य समूहांच्या अधिवासाच्या, आजीविकेच्या आणि संस्कृतीच्या व्यवस्थांसमोर बलवत्तर ठरल्या. अर्थात, तत्कालीन नागर व्यवस्थांमधील समूह आणि वन्य समूह यांच्या संपर्कातून केवळ वन्य संस्कृतींचा नाशच झाला असे म्हणणे काहीसे अस्थायी ठरेल. कोणत्याही दोन मानवी समूहांचा संपर्क आल्यावर त्यातून होणाऱ्या संघर्षांसोबतच, सांस्कृतिक आदानप्रदान आणि वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात आकाराला येणारे संबंध ओघाओघाने आकाराला येतात. उपखंडामधल्या प्राचीन इतिहासात वरील समूहांच्या संपर्कातून राजकीय-सामाजिक संघर्षांना समांतर असे आदानप्रदान आणि काही प्रमाणात समावेशनदेखील झाले असणार याविषयी काही शंका नाही.

मराठीतील सर्व धारणांचे धागे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before exploring new ways history of violence in india
First published on: 26-08-2018 at 11:56 IST